कझिन हा शब्द सर्वसमावेशक आहे, लिंगभेदविरहितही आहे. कझिन म्हणजे मामा, मावशी, काका, आत्या यांपैकी कोणाचाही मुलगा किंवा मुलगी. पण मावसबहीण म्हटलं की मावशीची मुलगी हे अगदी स्पष्ट असतं. कझिन हा शब्द ज्यांच्या मातृभाषेतला आहे असे कोणी ब्रिटिश वा अमेरिकी वा इतर देशांतले लोक माझ्या इतके जवळचे नाहीत की ते या शब्दाचा कसा वापर करतात, त्यात आपल्याकडच्या नात्यांच्या छटा असतात का, वगैरे मला ठाऊक असावं. मला भारतातली ही नाती कळतात. ईशान्य भारतात कदाचित इतर भारतापेक्षा नाती वेगळी असावीत, म्हणजे त्यातली जवळीक वा अंतर असा माझा अंदाज कारण तिथली कुटुंबपद्धती मला नीटशी माहीत नाही. पण बाकी बहुतेक सगळीकडे मावशी, मामी, आत्या आणि काकू किंवा काका, मामा, मावसोबा, आतोबा या नात्यांतले बारकावे साधारण एकसारखे असावेत असं वाटतं. काही भाषांतरित साहित्य वाचून किंवा हिंदी साहित्य वाचून असा अंदाज मी बांधला आहे, तो पूर्णपणे गंडलेला असू शकतो.
काल माझी मावसबहीण मंजिरी गेली. तशी अचानक म्हणायला हवं, कारण तिला व्हायरल सर्दीतापखोकला झाला होता, त्याआधी झालेली नागीण बरी होत आली होती. एकदोन दिवसांत तिच्या शरीरात काहीतरी घडामोडी झाल्या आणि काल सकाळी तिचा श्वास थांबला.
ती माझ्यापेक्षा साडेचार वर्षांनी मोठी. याहून कमी अंतर असलेली भावंडं मला आहेत. पण तिच्याशी माझी काॅलेजच्या वयापासून सूर जुळले होते खरे. माझ्या मैत्रिणींनाही ती माहीत होती इतकं तिचं नाव माझ्या तोंडी सतत असे.
तिला २०१२ च्या मध्यावर कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि आम्हीच खचून गेलो. आम्ही म्हणजे माझ्या आजोळची आम्ही पंचवीसेक मावसमामेभावंडं. आमचे जोडीदार आणि आमची मुलं. आम्ही सगळे बऱ्यापैकी एकमेकांशी जोडलेलो आहोत अजून, वेगवेगळ्या शहरांत राहूनही. मंजिरी अर्थात घाबरली असणार तेव्हा, पण तिने नंतर अत्यंत धीराने आणि तडफेने या रोगाचा सामना केला. ती अॅडमिट असताना आम्ही ड्यूट्या लावून घेतल्या होत्या, एकही मिनिट तिला एकटीला राहावं लागलं नाही. तिची आई, माझी माईमावशी तेव्हा होती. मावशीनेही अत्यंत धीराने या प्रसंगाचा सामना केला, मंजिरीसमोर एकदाही हतबलता दाखवली नाही, याचं मोल मंजिरीसाठी मोठं होतं, ती ते नेहमी बोलून दाखवत असे. तिने हिंदुजामधल्या डाॅक्टरांवर जसा डोळे मिटून विश्वास ठेवला तसाच डोंबिवलीतल्या तिच्या जुन्या वैद्यांवर आणि आणखी एकदोन उपचार पद्धतींवर. ती त्यातून बरी झाली. आणि आधीच अत्यंत ठाम मतं असलेली आणि नियोजनपूर्वक जगणारी अधिकच तसं जगू लागली. वर्षातनं एकदा महाराष्ट्राबाहेर सहल, आणि एकदा राज्यातल्या एखाद्या भागात हे तिने पक्कं ठरवलेलं. त्यासाठी लागणारा सगळा अभ्यास ती करत असे आणि त्यानुसार सहल आखत असे. तिच्याबरोबर कधी मी तर कधी इतर भावंडं असत. ती हिशोबी होती, आयुष्यातला काही काळ तिने ज्या पद्धतीने काढला होता त्यामुळे ती तशी झाली होती. ती नेहमी म्हणायची, पुस्तक विकत घेताना मी ऊर्दू वाचते, म्हणजे काय तर आधी पुस्तकाचं मलपृष्ठ पाहून किंमत बघायची. मग तिचा पगार वाढला, मुलं कमावू लागली तसं तिचं पैपैचा हिशोब ठेवणं कमी झालं. मुलांसोबत तिने परदेशप्रवासही केला.
ती प्रचंड वाचायची. लायब्ररीतून पुस्तकं मासिकं आणून वाचायची. विकत अशी पुस्तकं तिने फार कमी घेतली असतील. मी बरीच वर्षं अंतर्नाद, साधना, ललितची वर्गणी भरत असे. अंक वाचून झाल्यावर रद्दीत टाकायला जिवावर येई. एकदा मंजिरीला हे कळल्यावर तिने लगेच म्हटलं, अंक माझ्याकडे पाठव. ती ते वाचे, मग तिच्या आॅफिसातल्या मराठी लोकांकडे ते जात. मग महाराष्ट्राबाहेरच्या त्यांच्या आॅफिसातल्या मराठी लोकांकडे ते जात. अंकाची किंमत पूर्ण वसूल होई. समान आवडीचे लोक आपण शोधून काढतो किंवा ते आपल्याला शोधून काढतात तसे वाचक सहकारी तिच्या आसपास होते.
तिच्या घरी टीव्ही नव्हता. कधीच. डोंबिवलीत राहात होती तेव्हा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना ती दोघा मुलांना घेऊन आवर्जून जाई. तिच्या घरात मुख्य दारावर एक फळा होता. तिथे कायम एखादी कविता, चित्रं असं काही असे. ती आणि मुलं मिळून ते सजवत. ती हौशी गायिका होती, आम्ही सगळी जमलो की गात असे. दिवा लावते दिवा हे खूप जुनं गाणं, मी मूळ ऐकलेलं नाही, तिच्याच तोंडून ऐकलंय. माझ्यासाठी मंजिरी म्हणजे ते गाणं आणि ते गाणं म्हणजे मंजिरी. तिची लेक भरतनाट्यम शिकली, त्यामुळे त्यातही तिला रस होता. आमच्या मामेभावांमुळे गिर्यारोहण हेही तिचं एक वेड होतं. मुंबईजवळचे अनेक छोटेमोठे ट्रेक तिने केले होते. ती गेल्यावर मी माझ्या शाळेतल्या निवडक मैत्रिणींच्या ग्रूपवर मेसेज टाकला तर एक जण म्हणाली, अगं माझ्या ट्रेकच्या ग्रूपमध्ये होती ती.
चवीने खाणं आणि खिलवणं तिला आवडे. ती पूर्ण शाकाहारी होती. तिला केळं अजिबात आवडायचं नाही. म्हणजे शिकरण केली असेल आणि मंजिरी माझ्या डाव्या बाजूला बसली असेल जेवायला तर शिकरणीची वाटीही डावीकडे ठेवता यायची नाही इतका केळ्याचा वास तिला नकोसा असे. कॅन्सर झाल्यापासून तिने शक्यतो पॅकेज्ड खाद्य, फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न, रेडी टू ईट प्रकारचे पदार्थ खाणं बंद केलं होतं. ब्रेड वा पावही नाहीच खायची. घरी केलेले पदार्थ तिच्यासाठी प्रिय होते. माझ्या घरी नागवेल आहे. तर सामान न्यायला महिन्यातनं एकदा फेरी असायची तेव्हा जितकी पानं वेलीवर असतील तितकी तिला पाठवायची असा नियमच होता आमचा. मागच्या वर्षी किमो सुरू असताना मी तिला सांगितलं होतं की काहीही खावंसं वाटलं, सोबतीला कोणी हवंय असं वाटलं तर फोन कर, मी येईन. लिंबाचंं लोणचं मी करते तिला माहीत होतं, ते दे थोडं म्हणाली होती. मग सगळ्यात जुनं लोणचं तिला दिलं होतं थोडं. तिचा नवरा श्रीधर उत्तम स्वयंपाक करतो, बऱ्याचदा तोच सगळं करत असे. तो कानडी, त्याच्या हातचं इडलीसांबार, वेगवेगळ्या चटण्या, अगदी चविष्ट. मंजिरी आजारी असताना, तोंडाला चव नसताना तो तिला कधी धिरडी, कधी इतर काही तिला हवं तसं करून देत असे. घरचं लोणकढं तूप तिच्या अतिशय आवडीचं. मला आठवतंय आम्ही दोघी आणि मुलं दिल्ली फिरायला गेलो होतो तेव्हा तिने घरची तुपाची बाटली आणली होती, आणि ते रोजच्या जेवणात आवर्जून घ्यायची, आम्हालाही वाढायची अर्थात. कोकणात आजोळी जायचं असेल काही कारणाने तर आम्ही दोघी आणि मुलं एकत्रच प्रवास करायचो ठरवून. जाता येतानाचे डबे घेऊन जायचो. रत्नागिरीत सुद्धा तिने एक बाई शोधल्या होत्या त्या आम्हाला परतीच्या गाडीवर डबा आणून देत पोळीभाजीचा.
मुलीसाठी ती दोनतीन वर्षं तरी मुलगा शोधत होती, त्याचा थोडा ताण तिला जाणवत असावा. पण मग लग्न ठरलं, दोन महिन्यांत झालंसुद्धा. लग्नानंतर तिने वार्षिक पेट स्कॅन केला तेव्हा या कॅन्सरने पुन्हा पाय ठेवल्याचं लक्षात आलं. मग पुढचं वर्ष मुलीचे सण, आणि हिचे उपचार/शस्त्रक्रिया यांत गेलं. तिने सगळं सांभाळून, पूर्णवेळ आॅफिससुद्धा, सणही हौशीने केले आणि तब्येतही मार्गावर आणली. कोविड काळात भटकंती बंद होती अगदीच, आणि मग निर्बंध उठले तर हिच्या तब्येतीचा प्रश्न होता. त्यामुळे प्रवास लांबला होता पण तिने भावाबरोबर कोकणात जायची कालची तिकिटं काढली होती. ताप आला तेव्हाही वाटलं असेल की तापच आहे, बरं वाटेल, जाऊ शकू आपण. दादा आहेच बरोबर. पण ते होणं नव्हतं. ती वेगळ्याच प्रदेशात निघून गेली.
तिने दोन्ही मुलांनाही अतिशय विचारपूर्वक घडवलं होतं. अजिता अत्यंत प्रतिभावान, मेहनती, वेगवेगळ्या कलांमध्ये प्रवीण, आणि कामाला वाघ. धाकटा मिहीर काहीसा शांत, पण समजूतदार. तो दहावीत असताना मंजिरीला कॅन्सरची पहिल्यांदा लागण झाली. त्यांना त्यामुळे घर बदललं, तिच्या आॅफिसच्या जवळ राहायला आले. त्याला त्याचं मित्रमंडळ सोडून नव्याने नाती जोडावी लागली. आईला डाॅक्टरांकडे नेणं, किमो सुरू असताना तिच्यासोबत बसणं, तिला कुठेही घेऊन जाणं, सगळं तो विनातक्रार करत आला. मी तिला नेहमी सांगायचे, अशी मुलं विरळा, त्याची तक्रार नको करत जाऊस. मुलांना ती कशाला नाही म्हणाली नसेल बहुधा, पण नवनवीन शिकायला प्रोत्साहन कायम दिलं. आणि शब्दांतनंं दिलं नसेल तर तिच्या वागण्यातून ते त्यांना मिळतच होतं.
मंजिरीने, जिला आम्ही काही भावंडं मांजा म्हणायचो, आयुष्यात प्रचंड माणसं जोडली. जिथे जाईल तिथे ती प्रश्न विचारी, काहीतरी सांधा जुळे आणि ती माणसं तिची होऊन जात. गोदरेजमध्ये तर तिचं आॅफिसव्यतिरिक्तही वैयक्तिक नेटवर्क मोठं होतं. ती कायम मदतीला तयार असे, या माणसांच्या आधारावरच. आणि ती माणसंही तिच्यामुळेच मदत करायला कायम पुढे असत. एखाद्या शहरात घर हवंय, काही दिवस राहायचंय, काॅलेज कोणतं चांगलं आहे, खायला काय मिळतं, खरेदी काय करायची हे सगळं ती शोधून काढायची, आपणहोऊन सांगायची की या या गोष्टी माझ्यावर सोपव, मी करते.
तिची वैयक्तिक राहणी अतिशय साधी होती. ती अनेकदा साड्या नेसे, पण सुती. अगदी सणासमारंभालाही तिला साध्या साड्या नेसायला आवडत, जरीकाठाच्या अभावानेच. लेकीच्या लग्नातही असंच काही करण्याचा तिचा विचार तिच्या मोठ्या बहिणीने हाणून पाडला आणि पैठणी नेसायला लावली. लग्नात तिने एकदाच साडी बदलली, पैठणी बदलून दुसरी साडी नेसली ती मोतिया रंगाची. लग्नात दोघी विहिणी, वधूमाय आणि वरमाय आहेत असं अजिबात लक्षात येत नव्हतं, इतक्या साधेपणाने वावरत होत्या.
तिचं लग्न कानडी कुटुंबात झालं होतं. तिने त्या कुटुंबातल्या सगळ्या चालीरीती, स्वयंपाक आत्मसात केला होता. भाषाही तिला कळायची, बोलता फार यायचं नाही कारण मुंबईतली मंडळी मराठीच बोलत घरात. पण गावाला गेलं की तिथे दिसणारी माणसं, तिथल्या पद्धती यांच्याबद्दल आम्हाला नेहमी रंगवून सांगायची. दुष्काळी गाव. पाण्याची वानवा. मग भल्यामोठ्या पातेल्यात दहीभात किंवा आणखी कोणता भात घेऊन घरातली बाई बसे, आणि तिच्याभोवती बाकीची मंडळी. ती प्रत्येकाच्या हातावर एकेक घास ठेवत जाई आणि ताटलीचमच्याविना नाश्ता उरकत असे. हे सांगताना तिच्या डोळ्यात एक चमक असे, की त्या त्या परिस्थितीवर बायका कसे मार्ग काढत बघा! अम्मा म्हणजे तिच्या सासूबाई. त्यांची ती पहिली सून, घरात आलेली पहिली मुलगी. दोघींचा एकमेकींवर प्रचंड जीव. विक्रोळीला आल्यानंतर त्या जरा एकमेकींपासून लांब गेल्या पण मनाने जवळच राहिल्या.
भूतकाळाशी जोडलं राहण्याची एक वेगळीच असोशी तिच्याकडे होती. वयोवृद्ध नातेवाईक, जुनी घरं यांच्याकडे ती जणू ओढली जाई. म्हणजे आमचे नव्वदी पार केलेले मामाआजोबा, मावशी आजी वगैरेंना ती आवर्जून भेटायला जाई, त्यांच्या गोष्टी ऐकायला तिला मनापासून आवडे. संग्रहालयं पाहाणंही तिच्या आवडीचं, तासनतास तिथे फिरायची ताकद तिच्यात होती. पण आधुनिक तंत्रज्ञानाची कासही तिने आवडीने धरलेली होती. आॅफिसच्या कामासाठी तर ती संगणक वापरत असेच, त्यातलीही नवनवीन साॅफ्टवेअर ती शिकून घेई. नवीन आलेल्या तरुण सहकाऱ्यांना तिचा आधार वाटे तो तिच्या मोकळेपणामुळे असे, तसंच तिच्या खणात कायम असलेल्या घरी केलेल्या खाऊमुळे. मराठी सणांना केले जाणारे पदार्थ ती करायचीच, आणि दुसऱ्या दिवशी आॅफिसातनंही घेऊन जायची. अमराठी सहकारी तिच्या त्या डब्यावर तुटून पडायचे यात नवल नाही.
अनेकांचा असतो तसा आम्हा पटवर्धन आजोळ असलेल्या मावसमामे भावंडांचा वाॅट्सअॅप ग्रूप आहे. त्यावर रोज सुप्रभात वगैरे मेसेज नसतात, पण कोणाचा वाढदिवस असल्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतो. मांजाची खासियत अशी की ती त्या दिवशी वाढदिवस असलेल्या व्यक्तीचा एखादा खास फोटो शेअर करायची. तिच्या लॅपटाॅपमध्ये असे शेकडो फोटो नीट फाइल करून ठेवलेले होते बहुधा. वाढदिवस असलेली व्यक्ती मंजिरी आज कोणता फोटो शेअर करणार याकडे डोळे लावून बसलेली असायची. मी तर नक्कीच. नुकतंच कोणी तरी तिला असं सांगितलं तर म्हणाली की माझेही त्या निमित्ताने फोटो पाहिले जातात, कुठल्या कुठल्या आठवणी जाग्या होतात त्या निमित्ताने. आता आम्ही सगळे मिळून तिच्या आठवणी जागवणार.
माझं आणि तिचं नातं जवळचं तर होतंच, पण ती आजारी पडल्यानंतर विक्रोळीला राहायला आल्यानंतर आम्ही अधिक जवळ आलो. आमच्या लेकीही जिवाभावाच्या मैत्रिणी. मग महिन्या दोन महिन्यातनं भेट व्हायचीच. आमचा आठवड्याला एक फोन ठरलेला. दुपारची वेळ असेल तर हळू आवाजात, म़ण्मयी, दोन मिनिटं बोलू शकतो, असं विचारायची. मला वेळ असला तर गप्पांमध्ये अर्धा तास सहज निघून जायचा. गप्पांमध्ये भूतकाळ क्वचितच डोकावे. मी लहानपणी अनेक सुट्या तिच्या घरी घालवलेल्या आहेत, माझं काॅलेज त्यांच्या घरापासून १५ मिनिटं चालायच्या अंतरावर. त्यामुळे आम्ही खूप काळ एकत्र पूर्वीही घालवला आहे. मला आठवतं तिच्या वडलांनी सिंगापूरहून अंजिरी रंगाची चायना सिल्कची साडी आणली होती. मी आठवीत असेन बहुतेक. आमच्या मोठ्या मामेभावाच्या लग्नात मी त्या साडीतल्या कापडाचा फ्राॅक आणि मांजाने पंजाबी ड्रेस शिवला होता. ऐंशीच्या दशकात मिंटी वेण्या नावाची एक फॅशन होती. मिंटी नावाच्या गोळ्या मिळत त्या गोळ्यांच्या जाहिरातीतल्या मुलीने त्या घातलेल्या होत्या बहुतेक. दोन बाजूला कानाच्या जरा वरच दोन पोनी बांधायचे आणि मग वेण्या घालायच्या. आम्ही दोघी अनेकदा ते करत असू. दोघींचे केस लांब होते, दोघी दोन वेण्याच घालायचो सहसा. वेणीचा गोंडा वळू नये म्हणून रात्री झोपताना शेवटच्या टोकापर्यंत वेणी घालायची, आणि ती गुंडाळून रबर लावायचा. दुसऱ्या दिवशी वेण्या घातल्या की गोंडे छान कुरळे, फुललेले दिसत. हे मी तिच्याकडनं शिकलेले.
आमच्या सेकंड कझिन्सपैकीही अनेकांशी तिने नाती जपली होती, त्यांनाही तिचे असे फोन अधनंमधनं जात असत. परवा तिला निरोप देऊन आले आणि हेच डोक्यात होतं की, मंजिरी नव्हती, तिला रात्री फोन करून सांगायला हवं कोणकोण आलं होतं नव्हतं, काय काय झालं वगैरे. आम्ही एकमेकींच्या साउंडिंग बोर्डही होतो, काहीही मोठा निर्णय घ्यायचा असला की घेण्याआधी चर्चा किंवा घेतल्यानंतर पहिली बातमी एकमेकींनाच असायची. पंधरा दिवसांत आमचं बोलणं झालं नव्हतं, मला लक्षात आल्यावरही मी तिला फोन करायला दोन दिवस लागले, कशात तरी गुंतलेली होते. सोमवारी संध्याकाळी फोन केला तर म्हणाली, मला जरा बरं नाहीये, अजिताने मला डाॅक्टरांच्या क्लिनिकमधनंच किडनॅप केलंय आणि तिच्या घरी आणलंय. ती आणि विहीणबाई दोघी माझी काळजी घेतायत. लॅपटाॅप आहे, मी या आठवड्यात घरनं काम करणारेय. नंतरचं पाहू. आवाज जरा बसला हाेता, पाच मिनिटंच बोललो, ती जरा थकल्यासारखी वाटलं बोलून. म्हणाली ठेवते, नंतर बोलू. आणि दोन दिवसांनी दुपारी दादाचा मेसेज ती गेल्याचा.
तीन दिवस झाले ती गेली त्याला. मन अजून सुन्नच आहे. परवा ग्राहकचं सामान येईल. मग मी तिला पुढच्या महिन्याची यादी पाठवायला फोन हातात घेईन, आणि खाडकन ताळ्यावर येईन. नेमकं या महिन्यात तिचं काहीच सामान नव्हतं, नाहीतर सोमवारी तो फोन झालाच असता की सामान आलंय, कधी येतेस न्यायला. किती तरी क्षण येतील जेव्हा तिची कडकडून आठवणा येईल आणि ती समोर नसेल. पण एक आहे की अशा शेकडो आठवणी माझ्याकडे आणि तिचा ज्यांच्याज्यांच्याशी संबंध आला त्यांच्याकडे आहेत. She lives on in those precious memories.
हे इतकं पर्सनल मोकळं होणं आहे की त्याला लेखनगुणांची कसली विशेषणे लावणार... ती डोळ्यासमोर आली आणि डोळ्यासमोरून गेली...
ReplyDeleteहं. हे मोकळं होणंच आहे, जे मला गरजेचं वाटत होतं. तिची ओळख थोडीफार झाली तरी पुष्कळ.
Deleteइतकी जवळची माणसं आपल्या एखाद्या अवयवासारखी खूप सवयीची असतात. ती गेली की तो अवयव गळून पडलाय असं सारखं जाणवत राहतं.
ReplyDeleteदिवाकर देशपांडे
हो ना
Deleteअसं कोणाकोणाच्या जाण्याबरोबर,”मी”पण टप्याटप्याने जातं असते किंवा आठवणीत रहातं असते!🙏
ReplyDeleteअगदी खरं
Deleteमंजीरी म्हणजे ऊत्साहाचा धबधबा, कधीही न आटणारा! तुम्ही दोघी तर फेमस जोडी होता, तूझं दुःख समजू शकते. आयुष्य पूणॅ पुणे जगायचं आणि सुलीगती रहायचं हे अतिशय कठीण समीकरण तीला सहज जमायचं. अतिशय सुंदर व्यक्तीमत्व, her memories will occupy special place in many hearts.
ReplyDeleteधन्यवाद. तुमचं नाव कळलं तर बरं हाेईल.
Delete