जयपूर लिटफेस्ट २०१६ : राजकीय पडसादांचेही स्वागत

 २० ते २५ जानेवारी २०१६ या काळात पार पडलेल्या 'जयपूर लिटरेचर फेस्टिवल'मधली काही टिपणं, 'अंतर्नाद'च्या सप्टेंबर २०१६च्या अंकात लेखरूपात प्रसिद्ध झालेली. गेल्या वर्षीच्या फेस्टिवलविषयीचा लेख ज्यांनी वाचला आहे, त्या वाचकांना थोडी पुनरुक्ती वाटू शकते. तो ज्यांना वाचायचा आहे त्यांच्यासाठी ही लिंक)

२०१५च्या सप्टेंबरच्या शेवटी किंवा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जयपूर लिटफेस्टच्या तारखा आल्या. आठवडाभरात विमानाची तिकिटं काढून ठेवली. हाॅटेल बुक केलं.

जानेवारीच्या सुरुवातीला वेळापत्रक आलं फेस्टचं. कोण कोण येणार वक्ते, ते पाहताना विवेक शानभाग हे नाव समोर आलं. एकदम ट्यूब पेटली. आई ज्यांच्या कथा कानडीतून मराठीत अनुवादित करतेय, ते हेच की काय? गूगललं, तर तेच ते असं स्पष्ट झालं. आईला फोन केला, म्हटलं या वेळी मी कोणाला भेटणारेय ओळख. ती बिचारी विचार करत होती. मी विवेक शानभाग म्हटल्यावर तिला काय म्हणावं तेच सुचलं नाही काही क्षण. मग ती इतकी खुष झाली की विचारता सोय नाही. (त्याचं असं आहे, अपर्णा नायगांवकर, म्हणजे माझ्या आईने मुंबई महापालिकेत ३०-३५ वर्षं नोकरी केली. स्वेच्छानिवृत्तीनंतर मुंबई विद्यापीठाचा तिने कन्नड भाषेचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आमच्या अासपास कन्नड बोलणारं कोणी नव्हतं तेव्हा, त्यामुळे ती टीव्हीवरच्या बातम्या, मालिका, रेसिपी शो पाहून कन्नड अधिक चांगल्या पद्धतीने शिकली. मग कधीतरी तिने लहान मुलांच्या गोष्टींचा अनुवाद करायला घेतला. तिचं वाचन चांगलं होतंच, शब्दसंचयही मोठा होता. दैनिक प्रहारच्या लहान मुलांच्या पुरवणीत दहाएक कथा प्रसिद्धही झाल्या. मग तिला हुरूप आला. आणि तिने थोडी मोठी उडी मारायचं ठरवलं. कन्नड मराठी अनुवाद म्हटलं की, पहिलं नाव येतं उमा कुलकर्णींचं. त्यांच्याशीही तिने फोनवरून संपर्क साधला. ती कन्नड वृत्तपत्रही रोज वाचायची, एक मासिकही लावलं आहे. त्यातून तिला विवेक शानभाग हे नाव कळालं. शानभाग हे प्रसिद्ध कन्नड लेखक विचारवंत यू.आर. अनंतमूर्ती यांचे जावई. देशकाल नावाचं अंतर्नादसारखंच दर्जेदार त्रैमासिक ते जवळपास दहा वर्षं काढत होते, गेल्या वर्षीच त्यांनी त्याचं प्रकाशन बंद केलं आहे. त्यांच्या काही कथा तिने अनुवादित केल्या. शानभागांना मराठी बऱ्यापैकी कळतं, त्यामुळे अनुवाद वाचून तेच तो वाटल्यास दुरुस्तही करू शकतात. आई त्यांना एकदाही भेटलेली नाही, फोनवरून मात्र दोघेही संपर्कात असतात. त्यांच्या घाचरघोचर या लघुकादंबरीचा अनुवाद नुकताच तिने संपवलाय. त्याच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन जानेवारीतच गिरीश कर्नाड यांच्या हस्ते पार पडलंय. मराठी लवकरच येईल, अशी आशा.)

तर, शानभाग हे एक आकर्षण होतं जयपूरचं. बाकी पाच दिवस तिथे घालवणं हाच आनंदाचा भाग होता. त्यात, यंदा लेक गार्गी होती सोबत. मी तिथून आल्यानंतरच्या गप्पा ती ऐकायची, तीही वाचणारी/लिहिणारी भरपूर. त्यामुळे तिलाही यावंसं वाटत होतं. यंदा अगदी त्याच दिवसांत परीक्षा येऊन तिकीट रद्द करावं लागतंय की काय तिचं, असं वाटत होतं. पण नशिबाने परीक्षा नंतर होती. जिला मी जयपूरला पहिल्यांदा भेटले, ती ममता येणार होतीच. तिचा सातवीत शिकणारा आणि पुष्कळ वाचणारा लेक हर्षही होता.

मॅगी :)
फेस्ट सुरू होणार होता २१ला, आम्ही २०लाच पोचलो हाेतो. तो अख्खा दिवस भटकायचं ठरवून सकाळच्या विमानाची तिकिटं काढली होती. पण एअर इंडियाने उड्डाणाची वेळ दोन तास पुढे ढकलल्याने पोचलोच दोन वाजता. एअर इंडिया असल्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहायला मिळाला, जो एक छान अनुभव होता. पुढच्या वेळी टर्मिनल २ वरून विमान सुटणार असेल तर दोन तास आधीच जाऊन नीट पाहायला हवा, असं वाटायला लावणारा. दुसरा फायदा हा की, चांगलं जेवण मिळालं विमानात. त्यामुळे आम्ही हाॅटेलवर बॅगा टाकून बाहेर पडलो, लंच करावा नाही लागला. जंतरमंतर पाहायला गेलाे. तिथे सूर्याचं घड्याळ वगैरे पाहून बाहेर आलो, चहा प्यावा म्हटलं. तर टपरीवर चक्क मॅगीची पाकिटं होती. मग पोरं काय सोडतायत. त्यामुळे मॅगी खाऊन झालं. मग बापू बाजारात फिरलो, जयपूरला येऊन या बाजारात न जाणं हा मोठाच गुन्हा, कारण इथे मिळणारे स्वस्त आणि मस्त दागिने व कपडे.

२१ तारखेला लवकर म्हणजे सव्वानऊलाच डिग्गी पॅलेसवर पोचलो. आॅनलाइन रजिस्ट्रेशन करून त्याचं प्रिंट सोबत आणल्याने आत लगेच प्रवेश मिळाला. यंदा ऐन वेळी येणाऱ्यांना शंभर रुपये शुल्क आकारण्यात येत होतं. ते आम्हाला आगाऊ नोंदणीमुळे द्यावं लागलं नाही. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच लाल गुलाबी निळे घोळदार अंगरखे व खास मारवाडी पेहराव केलेले अनेक नर्तक स्वागताला उभे होते. गिरक्या घेत त्यांनी केलेलं नृत्य आपण राजस्थानात आलोय, हे स्पष्टपणे सांगत होतं.

मधल्या मार्गावर पताकांसारख्या लावलेल्या गुढ्यांसारख्या वस्तूंमुळे एकदम राॅयल वगैरे वाटायला लागलं. उजव्या आणि डाव्या हाताला आठनऊ फूट उंचीची राजस्थानी बाहुली आणि तिच्या शेजारी ९६ चौकटींच्या फ्रेममध्ये छोट्या छोट्या कठपुतळ्या. सेल्फी काढायला एकदम बेष्ट जागा.

सुरुवातीला विख्यात लेखिका मार्गारेट अॅटवूड यांचं बीजभाषण होतं, फ्रंट लाॅनमध्ये, ते ऐकायचं होतं. त्यासाठी जागा पकडायची होती, ती लवकर गेल्याने मिळाली. नगारा वादनाने आरंभ झाला. विशेष म्हणजे तीन युवती यात होत्या, ज्यातली एक परदेशी होती. नगारावादन ही पुरुषांची मक्तेदारी. परंतु रतनलाल सोलंकी या ज्येष्ठ वादकाने मुलींनाही वादन शिकवलं आहे. सोलंकी व त्यांच्या या स्त्रीपुरुष शिष्यगणांनी दहाएक मिनिटं वादनाने धमाल उडवून दिली. राजस्थानची चुणूक त्यात दिसलीच दिसली. नगारा वादनाची एक झलक येथे ऐका.

मग फेस्टिवलचे निर्माते संजय राॅय, आणि डायरेक्टर नमिता गोखले व विल्यम डॅलरिम्पल पाच पाच मिनिटं बोलले. डॅलरिम्पल यांनी फेस्टिवल ही कशी मूळ भारतीयच संकल्पना आहे, ते सांगितलं. जाहीर वादविवाद, प्रश्नोत्तरं हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग होता, हळुहळू तो लुप्त होत गेला. खरंच की, असं वाटलंच ऐकल्यावर. नमिता गोखले यांनी प्रख्यात कवी दुष्यंतकुमार यांची मेरे सीने में नहीं, तेरे सीने में सही, आग लगनी चाहिए या पंक्ती म्हटल्या तेव्हा त्याचे कितीतरी अर्थ कितीतरी वेगळ्या संदर्भात डोकावून गेले.

You come to get away from it all. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे असं म्हणाल्या, ते अनेकांच्या मनातलंच होतं. जयपूर शहर या फेस्टिवलचं कायम स्वागतच करेल, कारण या फेस्टिवलमुळे जयपूरची अर्थव्यवस्था मजबूत होतेय, हे सत्यच आहे. इथे fly on the wall होऊन वावरायला मी उत्सुक आहे, तुमच्यातली एक होऊन आजूबाजूला जे होतंय ते टिपून घ्यायची मी वाट पाहाते आहे, असं त्या म्हणाल्या. लहानपणापासून पुस्तक वाचल्याशिवाय झोप येत नाही, मीही पांघरुणात लपवून टाॅर्चच्या उजेडात पुस्तकं वाचली आहेत, असं त्या म्हणाल्या तेव्हा त्या एक राजकारणी वा मुख्यमंत्री म्हणून समोर आल्या नाहीत. माझी लेक तर त्यांच्यावर फिदा होऊन गेली, विशेषकरून त्यांचं इंग्रजी ऐकून.

Let the games begin, असं डॅलरिम्पल म्हणाले, तेव्हा उपस्थित तरुण मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मार्गरेट अॅटवूड भाषण करताना
मार्गरेट अॅटवूड यांचं भाषण crisp and witty होतं, हलकेच चिमटे काढणारंदेखील.
I must be very important or very old. that's why i am here.
Poets had to be drunk. It was considered romantic, especially men.
a book is not a book until a reader reads it.
it there are no readers, there won't be any writers. we become writers, because we love to read.
मला सर्वात आवडलेलं वाक्य writers are cheap dates. you need only writers and their books. त्यांचं विश्व पुस्तकातच सामावलेलं असतं, कल्पनेने निर्माण केलेलं विश्वच त्यांना प्रिय असतं, शब्द त्यांच्यासाठी आवश्यक असतात. मार्गरेट अॅटवूड यांच्या भाषणाचा काही भाग येथे ऐकू शकता.

भाषण संपलं आणि मी दरबार हाॅलकडे निघाले, अविरूक सेन आणि सामंत सुब्रमण्यम यांच्याशी गप्पांचं सत्र ऐकायला. अविरूकचं आरुषी हे पुस्तक गेल्याच वर्षी प्रसिद्ध झालंय, आरुषी तलवार हत्याकांड प्रकरणावर अनेक महिने अभ्यास करून लिहिलेलं. तर सामंतने श्रीलंकेतील यादवी संपल्यानंतर तिथे काही काळ घालवून, अनेक माणसांशी बोलून लिहिलेलं पुस्तकही नुकतंच बाजारात अालंय. सामंतला गेल्या वर्षीही मी इकडेच ऐकलं होतं. खाजगी माहिती काय आहे, ती जाहीर कधी करावी, हे जाणून घेण्याचा या गप्पांचा हेतू होता. एखादी गोष्ट of public interest आहे की, public is interested in अशी अाहे, या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर ती खाजगी आहे की, जाहीर हे ठरवता येतं. त्या व्यक्तीची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची. ती जर धोक्यात येणार असेल तर of public interest असूनही माहिती उघड करू नये, असं या दोघांचंही म्हणणं होतं. जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीविषयी माहिती असेल, तेव्हा हेच नियम असेच्या असे लागू होतील, असं नाही. माहिती reasonable and verifiable असेल तर ती उघड करतो, असं अविरूक म्हणाला. यांच्याशी गप्पा मारणाऱ्या पत्रकार प्रज्ञा तिवारी यांनी १९८४च्या दिल्लीतील दंगलींविषयीचा त्यांचा अनुभव सांगितला. या दंगलींचा परिणाम भोगावा लागलेल्या काही व्यक्तींच्या तरुण मुलांशी त्या बोलत होत्या. या मुलांची मतं त्यांनी मांडली परंतु त्यांची नावं घेतली नाहीत कारण त्यांच्या नावाशी ही मतं कायमची जोडली जातील, जी पुढे बदलू शकतात. तसंच या मतांचा पुढे कोण कसा दुरुपयोग करेल, याचीही भीती त्यांना होती.

अविरूकने म्हटलं की, पुस्तकात जे जे आहे, ते सगळं attributable आहे. म्हणजेच प्रत्येक वाक्याला कागदपत्रांचा वा एखाद्या व्यक्तीच्या शब्दांचा भक्कम आधार आहे. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, त्याने लिहिताना याचा अर्थ असा होतो वा असा होत असला पाहिजे, अशी गृहीतकं मांडलेली नाहीत. (एक वैयक्तिक अनुभव. कॅथरीन बू या लेखिकेसोबत तिच्या Behind the Beautiful Forevers या प्रसिद्ध पुस्तकासाठी वर्षभराहून अधिक काळ मी काम केलं. तेव्हा, कोणीही काहीही सांगितलं तर ती ते पडताळून पाहात असे. यासाठी तिने अनेक सरकारी कार्यालयं पालथी घातली व RTI Act चा पुरेपूर उपयोग करून घेतला. ज्या माहितीला असा दुजोरा मिळू शकला नाही, ती तिने पुस्तकात वापरलेली नाही.)

अनेकदा, अत्यंत संवेदनशील विषयांबाबत असा प्रश्न निर्माण होतो की, त्याविषयीची माहिती उघड करावी की नाही. उदा. काश्मीरमधील परिस्थिती वा आफ्रिकेत बोको हरामकडून होणारे अत्याचार. परंतु stories need to be told या न्यायाने कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घेऊन सत्य परिस्थती सांगायलाच हवी, असा सूर या चर्चेतून निघाला. अनेकदा दुर्घटना वा नैसर्गिक आपत्तींचे वार्तांकन करताना पत्रकार असंवेदनशील आहेत, अशी टीका होत असते. अविरूकने या वेळी एक किस्सा सांगितला. एका अाफ्रिकन रेफ्युजी कॅम्पमध्ये जाऊन एका युरोपियन पत्रकाराने ओरडून विचारले, Is there anyone here who has been raped and can speak English? आता हा प्रश्न अत्यंत चुकीचा, असंवेदनशील, क्रूर वगैरे वाटू शकतो. परंतु या प्रश्नाचं उत्तर मिळालं तरच तिथल्या महिलांवर झालेल्या अत्याचारांची गोष्ट सांगता येणार होती. मी मुंबईत परतल्यावर गूगलवर हे वाक्य टाकलं. तर बरीच माहिती मिळाली. एडवर्ड बेर Edward Behr या फ्रेंच पत्रकाराच्या पुस्तकाचं ते शीर्षक आहे, जे नंतर बदलण्यात आलं. The question was shouted out to hundreds of just rescued European survivors of a siege at Stanleyville in eastern Congo in November 1964 as they disembarked from US Air Force C-130s landing. बेर यांचं आॅगस्ट २००७मध्ये वयाच्या ८१व्या वर्षी निधन झालं.

यानंतरचं सत्र होतं Navigating modernity, मुघल टेंटमध्ये. यात प्रताप भानु मेहता, शोभा डे, क्रिस्तोफ जेफ्रलोट सहभागी झाले होते. माॅडर्निटी अथवा आधुनिकता या संकल्पनेचा अर्थ यावर हे तिघे बोलले. कोणत्याही पूर्वग्रहाचा अभाव म्हणजेच खुले मन म्हणजे आधुनिकता असं शोभा डे म्हणाल्या. एक काळ असा होता की, विशिष्ट कपडे घातलेल्या स्त्रीला माॅडर्न ठरवले जाई व त्यातून ती संशयास्पद आहे, ती भ्रष्ट करते, ती बसलेली घडी मोडते, असा विचार केला जाई. आधुनिकता म्हणजे समानता. जर माॅलला आधुनिकतेचे प्रतीक मानले जात असेल तर भीतीदायक आहे. माॅल हे आधुनिक मंदिर होता कामा नये, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मते पाश्चिमात्त्य कल्पना चुकीच्या, परक्या, टीकास्पद आहेत. परंतु nation state ही संघाची संकल्पना पश्चिमी तत्त्वज्ञांकडूनच गोळवलरांनी उचललेली आहे, हा विरोधाभास कसा समजावून घ्यायचा, असा सवाल मेहता यांनी केला. असमानता अपरिहार्य आहेत, असंही एक मत या वेळी व्यक्त करण्यात आलं.

चित्रपट दिग्दर्शक रविकांत यांनी एक इंटरेस्टिंग निरीक्षण मांडलं. आपण वेळ कशी मोजतो, त्यावर आधुनिकता ठरते. पूर्वी आपण ताऱ्यांच्या दिशेवरून वा सूर्याच्या सावलीवरून वेळ ओळखायचो, आता मोबाइलमध्ये सेकंदासेकंदाचं मोजमाप करता येतो. आधुनिकता व भाषा यांचा संबंधही रविकांत यांनी जोडला. ज्या भाषा, म्हणजेच ज्या भाषा बाेलणारे लोक छपाई यंत्र विकत घेऊ शकले त्या भाषा आधुनिक झाल्या, टिकून राहिल्या, बाकीच्या अस्तंगत झाल्या.

अभिव्यक्ती व निवड स्वातंत्र्य म्हणजे आधुनिकता. सर्व मतं व्यक्त होऊ द्या, मतमतांतरांचा आदर होऊ द्या, सर्व आवाज ऐकू येऊ द्या, तरच आपण आधुनिक गणले जाऊ. क्रिस्तोफ जेफ्रलोट यांचा भारतातील जातिव्यवस्थेचा अभ्यास आहे. ते म्हणाले की, २०१४मध्ये निवडून आलेल्या लोकसभेत मंडल-पूर्व काळातल्या लोकसभेइतकीच आरक्षित खासदारांची संख्या आहे.

पहिल्या दिवसाचं शेवटचं सत्र होतं Farwell Kabul: From Afghanistan to a More dangerous World. अनेक वर्षं अफगाणिस्तानात राहून वार्तांकन करणाऱ्या ब्रिटिश पत्रकार क्रिस्टिना लॅम्ब यांची जाॅनाथन शेनिन यांनी मुलाखत घेतली. क्रिस्टिना मलाला युसुफझाईच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या सहलेखकही आहेत. त्यांचे अनुभव अंगावर काटा आणणारे होते. लहान चणीच्या, काॅलेजमधल्या युवतीसारख्या दिसणाऱ्या क्रिस्टिना यांना वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एका ब्रिटिश वृत्तपत्रासाठी अफगाणिस्तानात जाऊन वार्तांकन करण्याची संधी मिळाली. ही गोष्ट आहे १९८०च्या दशकातली. बेनझीर भुत्तो तेव्हा लंडनमध्ये होत्या. आसिफ अली झरदारी यांच्याशी साखरपुडा झाल्याचे त्यांनी जाहीर केले त्या दिवशी, १९८७मध्ये केव्हातरी, नेमक्या क्रिस्टिना बेनझीर यांची मुलाखत घ्यायला त्यांच्या घरी गेल्या होत्या. घरभर शुभेच्छांचे पुष्पगुच्छ होते, हे त्यांना आजही आठवतंय. यानंतर बेनझीर यांच्या विवाहाचेही त्यांना आमंत्रण मिळाले व त्या पाकिस्तानात या समारंभासाठी गेल्या. तेव्हापासून काही वर्षं त्यांनी पाकिस्तान व अफगाणिस्तानात वार्ताहर म्हणून काम केले. हा काळ अफगाणिस्तान युद्धाचा होता, हे लक्षात घेतले पाहिजे. तालिबान, रशियन फौजा, बाॅम्बस्फोट यांचा हा काळ होता. नंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष झालेले हमीद करझाई या काळात स्थानिक जमातीचे नेते होते, त्यांच्याशी तिची ओळख झाली होती.

रशियन फौजा अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर पाश्चिमात्त्य देशांना तिथे काय करायचं, त्याची बिल्कुल कल्पना नव्हती. स्थानिक लोकांनाही त्यांनी विश्वासात घेतले नाही. बाहेरून तज्ज्ञ पाठवले, त्याऐवजी स्थानिकांना प्रशिक्षित करायला हवं होतं, असं मत लॅम्ब यांनी मांडलं. तालिबानच्या काळात, माणसांच्या चित्रांना विरोध करायचा म्हणून तालिबान्यांनी अशा चित्रांमधील चेहऱ्यांवर झाडं रंगवली होती. तालिबानचा पाडाव झाल्यानंतर त्या तिथे गेल्या तेव्हा ही झाडं पुसून टाकण्याचं काम सुरू होतं आणि या झाडांमागनं माणसं डोकावू लागली होती.

अफगाणी निर्वासितांची संख्या सीरियन निर्वासितांच्या खालोखाल आहे. आता तिथे इंटरनेट वा मोबाइलची सोय झालेली आहे. फेसबुक वा व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून तिथल्या लोकांना बाहेरचं जग दिसू लागलं आहे. त्यांच्या वास्तवापेक्षा ते कितीतरी सुकर असल्याने ते बाहेर पडायचा प्रयत्न करतात. सध्या शिक्षणाची मारामार आहे, त्यामुळे नोकऱ्या मिळत नाहीत व म्हणून अफगाणी तरुण तालिबान वा Daesh कडे वळतात, असं त्या म्हणाल्या.

अशा रीतीने पहिला दिवस साजरा झाला. बऱ्यापैकी थंडी होती दिवसाही. संध्याकाळी तर अधिकच. आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर बिर्ला मंदिराच्या समोर असलेल्या खाऊ गल्लीपाशी गेलो. तिथे पावभाजी आणि चाटच्या गाड्या होत्या. शिवाय बसायला खुर्च्या होत्या. तिथे अनेक वर्षांनंतर झालमुरी ही खास बंगाली भेळ खाल्ली. कोलकात्याला गेले होते आठनऊ वर्षांपूर्वी तेव्हा खाल्ली होती आणि ती फार आवडली होती. मुंबईत मात्र कुठे मिळाली नाही कधी. मोहरीच्या तेलाचा ठसका असलेली ही भेळ एकदम चटकदार असते. पावभाजीही चविष्ट होती आणि भरपूर. आमचं हाॅटेल बाबा हवेली जरा लांब होतं, सात आठ किमी. मला आठवलं की आपल्याकडे उबरचं अॅप आहे. मग उबरवरून कॅब मागवली आणि रिक्षात कुडकुडून जाण्याऐवजी उबदार गाडीतून हाॅटेलवर पोचलो.

दुसऱ्या दिवशीही उबरनेच डिग्गी पॅलेसला आलो. आज आम्ही हाॅटेल बदलून मैत्रीण थांबली होती तिथे शिफ्ट केलं. खरं तर हवेली छान होती, पण माझी लेक आणि मैत्रिणीचा लेक यांना एकत्र राहायचं होतं, त्यामुळे हा उद्योग केला.

privacy ही यंदाच्या फेस्टमधली एक थीम होती, दररोज एकदोन सत्रं त्याभोवती फिरणारी असायची. खाजगी काय नि सार्वजनिक काय, यावर गेल्या पावणेदोन वर्षांत देशात जे वादंग उठलेत त्या पार्श्वभूमीवर या सत्रांची व त्यातील वक्त्यांची निवड केलेली होती, हे स्पष्ट आहे. परंतु, तरीही या सत्रांना फक्त सरकारी धोरणांच्या विरोध करण्याचा वास येत नव्हता. उदा. खाजगी वा सार्वजनिक हा प्रश्न अविरूक सेन व सामंत सुब्रमण्यम यांनीही तपासला, पण त्याचे आयाम वेगळे होते. तर फोटोग्राफर दयानिता सिंग यांच्या दृष्टीने या प्रश्नाचे पैलू अधिकच वेगळे आहेत.

पहिलं सत्र ऐकलं ते १० वाजताचं, Total Recall: The end of privacy. या सत्रात प्रताप भानु मेहता, दयानिता सिंग, रघु रामन, व होमी भाभा सहभागी झाले होते. तुम्ही तुमचा भूतकाळ एक बटण दाबून डिलिट करू शकत नाही. a secret is a secret only if you tell it to at least one person, असं मेहता म्हणाले तेव्हा गंमत वाटली. खरंच की. एखादी गोष्ट फक्त आपल्यालाच माहीत असून काय उपयोग. आणखी एखाद्या व्यक्तीला ती सांगू तरच तिचं गुपित होईल. we don't know what we don't know. हे वाक्य नवीन गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर अगदीच पटतंय ना. तसंच, गूगलला तुमच्याबद्दल सगळं माहीत आहे, पण गूगलबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? या प्रश्नाचं उत्तरही भीतीदायकच होतं. तुम्ही एखाद्या ठिकाणचं एअर फेअर गूगलवर पाहिलं असेल तर लगेच तुमच्या जीमेलवर त्या ठिकाणच्या हाॅटेल्सविषयी जाहिराती दिसू लागतात. तिकिटं बुक झाली की फोनमधल्या कॅलेंडरवर ते दिसून येतं, हा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेला असतो.
जेएनयूमधल्या एका विद्यार्थी नेत्याला काल १२ फेब्रुवारी रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली. जयपूर फेस्टमधल्या या सत्रात कूमी कपूर, सी राजामोहन हे पत्रकार म्हणाले की, जेएनयू आणीबाणीच्या अगोदरपासून राजकीय हालचालींसाठी प्रसिद्धच होतं. जयप्रकाश नारायण हा जेएनयूमधला लाडका नेता होता.

एक सवाल या कार्यक्रमात उपस्थित झाला, तो म्हणजे आणीबाणीला पाठिंबा देणारे किंवा पाठिंबा असणारे लोक आता कुठे आहेत. तेव्हा असे कितीतरी लोक असतील ज्यांना आणीबाणी मान्य होती. मध्यमवर्गातल्या अनेकांना विशेषकरून, कारण आणीबाणीमुळे थोडीफार शिस्त आली होती सार्वजनिक जीवनात. परंतु, ट्रेन वेळेवर चालू राहण्यासाठी आणीबाणी वा दडपशाही आवश्यक असेल, तर आपलं मुळातच कुठेतरी प्रचंड चुकलंय, असं म्हणायला हवं. आणीबाणीनंतरच्या निवडणुकांचा विषय आला तेव्हा असा निष्कर्ष निघाला की, तुम्ही निवडणूक हरलात तर तुम्हाला तुमच्या दुष्कृत्यांची शिक्षा मिळाली आहे, असा अर्थ राजकीय पक्ष काढतात. असहिष्णुतेवर सर्वांचंच मत होतं की, आपण कायमच असहिष्णु आहोत, आता झालोय असं नाही. लिंगभेद व जातिभेद हे पूर्वापार चालत आलेले आहेत भारतात. हे म्हणजे आपल्याच मतांचा आरसा पाहण्यासारखं वाटलं मला तरी.

यापुढचं सत्र होतं ते The healers: Ideas of well being. डाॅक्टरी करणारे तीन लेखक यात सहभागी झाले होते. भारतीयांना थोडेफार ओळखीचे असलेले डाॅ. अतुल गावंडे यात होते. (डाॅ. गावंडे न्यूयाॅर्कर या प्रतिष्ठित नियतकालिकात वैद्यकीय विषयांवर लेखन करतात. ते व्यवसायाने सर्जन आहेत. त्यांचे वडील यवतमाळ जिल्ह्यातले, आई गुजराती. आईवडील दोघेही भारतात MBBS करून अमेरिकेत PG करायला गेले, तिथे भेटले व लग्न केले. वडील नुकतेच वारले, आई जयपूरला कार्यक्रमाला आली होती. अतुल यांची पत्नी अमेरिकी आहे. नुकतंच त्यांचं मृत्यूविषयीचं पुस्तक Being Mortal प्रसिद्ध झालं आहे.) सत्रातले तिन्ही डाॅक्टर अमेरिका वा ब्रिटनमध्ये प्रॅक्टिस/संशोधन/अध्यापन करतात आणि मुख्य म्हणजे लिहितातही.

या सत्रात पाश्चिमात्त्य व पौर्वात्य औषधं, वैद्यकीय दृष्टिकोन, आॅल्टरनेटिव्ह थेरपी अशी रंगतदार चर्चा झाली. आॅल्टरनेटिव्ह थेरपीबद्दल डाॅ. गावंडे म्हणाले की, आता विशेषकरून गावातल्या लोकांना हे माहीत आहे की, औषधोपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु गावात त्या सगळ्या, खासकरून अॅलोपथी उपलब्ध नाहीये. पूर्वी गावातले वा गरीब लोक वैदू, मांत्रिक, आयुर्वेद, युनानी अशा इतर पॅथींचे उपचार घेत. आता ते अॅलोपथीचा हट्ट धरतात तर श्रीमंत लोक आॅल्टरनेटिव्ह थेरपीकडे वळू लागलेत.

गॅव्हिन फ्रान्सिस हे स्काॅटिश डाॅक्टर असून एडिंबरा येथे जीपी आहेत. त्यांनी त्यांच्या एका रुग्णाची गोष्ट सांगितली. या रुग्णाच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो अस्वस्थ झाला होता, त्याला नैराश्य आलं होतं. तो डाॅक्टरांकडे आल्यावर त्यांनी त्याला विचारलं, have you seen your pastor? कारण हा माणूस धार्मिक वृत्तीचा होता आणि डाॅक्टरांना असं वाटलं की, पॅस्टरशी बोलल्यावर त्यांना बरं वाटेल. शरीर, मन, एकमेकांवर होणारे त्यांचे परिणाम, डाॅक्टरांकडे प्रत्येक रुग्णासाठी असणारा वेळ, भारतातील प्रशिक्षित डाॅक्टरांची अपुरी संख्या, अशा अनेक विषयांवर या चौघांनी गप्पा मारल्या. मुलाखत घेणाऱ्या डाॅ. आरती प्रसाद यांनी गेल्या वर्षात भारतातल्या अनेक खेड्यांमध्ये जाऊन वैद्यकीय व्यवस्थेचे निरीक्षण करून लिहिलेले पुस्तक लवकरच प्रसिद्ध होत आहे. त्या डाॅ. बंग यांच्यासमवेतही राहिल्या होत्या, त्यांनी सर्च व शोधग्राम आणि तेथील व्यवस्थेचा अत्यंत कौतुकास्पद उल्लेख या वेळी केला.

डाॅ. गावंडे मृत्यूविषयी फार हृदयस्पर्शी व वास्तववादी बोलले. कृषिप्रधान समाजांमध्ये व उद्याेगप्रधान समाजांमध्ये मृत्यू कसा वेगळ्या पद्धतीने येताे, यावर ते म्हणाले, कृषिप्रधान समाजात वृद्धांना मरण येते तेव्हा बहुतांश वेळा त्यांचे कुटुंब अवतीभवती असते. तर औद्योगिक समाजात कुटुंब सोबत असण्याची शक्यता फारच कमी असते. आता, भारतातही, अधिकाधिक लोक शहरांमध्ये व रुग्णालयांमध्ये मरण पावतात, हे प्रगतीचेच एक लक्षण आहे.  Earlier death was public, and sex was private. now death is private and sex, public.

दुसऱ्या एका सत्रात डाॅ. गावंडे म्हणाले की, आजारी (मृत्यूशय्येवर असलेल्या) माणसाला आम्ही विचारतो, तुला किमान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचं उत्तर येईल त्यावर उपचार ठरवतो. तो माणूस म्हणून जगू शकला पाहिजे, फक्त रुग्ण म्हणून नाही, हा यामागचा उद्देश. उदा. एखादा माणूस म्हणतो की मला फुटबाॅल पाहता आला पाहिजे आणि चाॅकलेट आइस्क्रीम खाता आलं पाहिजे. किंवा एखादा म्हणतो, पुस्तकं वाचता आली पाहिजेत. त्यानुसार उपचार केले की, त्या व्यक्तींचे शेवटचे दिवस आनंदात जातात. अात्यंतिक वेदना होत असलेल्या व्यक्तीला विचारलं की, तुला मरण आवडेल की वेदना कमी करणारं औषध, तर औषधाचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे. आपल्यापैकी अनेकांना या वेळी आपल्या आसपासच्या रुग्णांची आठवण येऊ शकते. जे आवडत असतं, तेच करता येत नाही, अशी अवस्था अनेकांची होते. डाॅ. गावंडे यांनी त्यांच्या पत्नीचं काय सांगणं होतं ते शेअर केलं. ती म्हणाली की, मी उपचार करताना आनंदी दिसत असेन तर ते चालू ठेव, नसेन तर बंद कर

प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक गोष्ट असते, जिला सुरुवात, मध्य, आणि शेवट असतो. शेवटावर आपलं नियंत्रण नसतं. The goal is good life till the very end, not a good death.

यानंतरचे सत्र रंगतदार होते, लेखक कसा लिहितो या विषयावरचे. सुरुवातीला उल्लेख केलेले विवेक शानभाग, सिदिन वाडुकुट, केसी श्वार्टझ आणि एस्थर फ्राॅइड यात सहभागी होते. श्रोते खूपच उत्सुक होते लेखनप्रक्रिया जाणून घ्यायला व प्रश्न विचारायला. तुम्ही कधी लिहिता, रोज किती वेळ, शिस्त लावून घेतली आहे का, असे प्रश्न होते. सर्वच लेखकांनी शिस्त आवश्यक असल्याचे सांगितले. लेखनाला मेहनत आवश्यक आहे, ती कॅज्युअली घेण्याची गोष्ट नाही, असं शानभाग म्हणाले. लिहिण्यासाठी खूप वाचलं पाहिजे, असंही सगळे आवर्जून म्हणाले

इथेही असहिष्णुतेचा विषय अस्थानी नव्हता. फक्त इथे ती सरकारची/ नागरिकांची वा राजकीय पक्षांची वृत्ती याव्यतिरिक्त इतर बाजूंनी पाहिली गेली. उदाहरणार्थ, अनेकदा लेखकाच्या आसपासच्या व्यक्ती पुस्तकात पात्र बनून येतात, ते भले त्यांना कधी कळतही नसते. अशा व्यक्तींना जर त्या नकारात्मक रंगात असतील, तर वाईट वाटू शकते. (दुसऱ्या एका सत्रात मीरा स्याल या विख्यात ब्रिटिश आशियाई अभिनेत्रीने सांगितलेला एक किस्सा इथे लागू होतो. The Kumars at No. 42 या अत्यंत गाजलेल्या टीव्ही मालिकेतील एक जोडपे मीराच्या काकाकाकींवर बेतलेले होते. नवल म्हणजे काकाकाकींना ते लक्षात आले नाही आणि ते मालिकेतल्या त्या जोडप्यावर प्रचंड हसत असत.)

सिदिन वाडुकुट हा धमाल विनोदी लिहिणारा मूळ मल्याळी, आता ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला लेखक. मिंट या वृत्तपत्रात त्याचे स्तंभ असतात. त्याला ऐकणं फारच मस्त होतं. humour comes from unfunny situations असं तो म्हणाला, ते फारच पटलं.

याच दिवशी शोभा डे, बरखा दत्त, आदि गर्दीखेचू मंडळींचे कार्यक्रम होते. परंतु तुफान गर्दीमुळे आम्ही तिथे फिरकलोही नाही.

लहान मुलांसाठी काही खास सत्रं संवाद या हाॅलमध्ये असतात, त्यांच्यासाठी काही कार्यशाळाही होतात. त्यांना बऱ्यापैकी गर्दी असते. जेरी पिंटो हा मुंबईस्थित तरुण लेखक यंदा फारच भाव खाऊन गेला. मुलं त्याच्यावर आणि त्याच्या कवितांवर फिदा होती. जेरीने नुकतेच दया पवारांच्या बलुतंचा इंग्रजी अनुवाद केला आहे.

डावीकडचं मुखपृष्ठ आणि उजवीकडची तीच अफगाण गर्ल गेल्या वर्षीची

तिसऱ्या दिवशी Beyond the Afghan girl हे सत्र मला ऐकायचेच होते, परंतु माझ्यासारखे इतर अनेक जण असल्याने मी पोचेस्तो दरबार हाॅल भरून गेला होता. नॅशनल जिओग्राफिक या मासिकाच्या मुखपृष्ठावर जून १९८५मध्ये प्रसिद्ध झालेल्या हिरव्यानिळ्या डोळ्यांच्या अफगाणी मुलीचा फोटो आपण अनेकदा पाहिलेला असतो, हीच ती अफगाण गर्ल. हे सत्र होते हा फोटो काढणाऱ्या स्टीव्ह मॅककरी यांच्या मुलाखतीचे. हा फोटो, खरं तर फोटोतली मुलगी, गेल्या वर्षी पुन्हा चर्चेत आली कारण ती पाकिस्तानात एका निर्वासित शिबिरात राहत असल्याचा शोध काेणी पत्रकाराने लावला, तिच्या मुलांकडे पाकिस्तानी नागरिक असल्याचे ओळखपत्र आहे, वगैरे तपशील वाचनात आले होते ते आठवले. स्टीव्ह यांच्या दुसऱ्याही सत्राला प्रचंड गर्दी होती, खासकरून होतकरू फोटोग्राफर तरुणांची.


मीरा स्याल यांच्याशी संवाद साधताना डाॅ. आरती प्रसाद
दरबार हाॅलमध्येच पुढचं सत्र मला एेकायचं होतं, त्यामुळे तिथे बाहेरच रांगेत उभी राहिले. मीरा स्याल या अभिनेत्रीने सरोगसी या विषयाभोवती गुंफलेल्या कादंबरीच्या संदर्भात तिच्याशी डाॅ. आरती प्रसाद गप्पा मारणार होती. सरोगसी या विषयाचा मी अभ्यास नाही केलेला परंतु त्यात गुंतलेल्या अनेक बाजूंचं व व्यक्तींचं जवळून निरीक्षण करण्याची संधी मला मिळालेली आहे. म्हणून मला या ही चर्चा ऐकायची होती. आणि ती रंगलीही बरीच. The hidden mother ही मीरा यांची कादंबरी. सरोगेट मदर म्हणून मुलाला जन्म देणारी एक स्त्री व तिच्याकडे अचानक आलेली श्रीमंती पाहणारी तिची मैत्रीण, त्यांचे नवरे, ही यातली मुख्य पात्रं. सरोगसीचा एकूण खेळ कसा चालतो, याचं लेखिकेने बरंच निरीक्षण केलेलं तसंच या विषयावरची वैद्यकीय/वैज्ञानिक माहितीही मिळवलेली. मीरा मूळच्या हास्य अभिनेत्री. त्यांनी इतक्या गंभीर विषयावर केलेलं लिखाण महत्त्वाचं वाटतं. पुस्तक अजून वाचलेलं नाही, परंतु वाचणार जरूर आहे. त्यांनी टीव्हीवर या विषयावरचा एक माहितीपट पाहताना पुस्तक लिहायचं ठरवलं आणि ते लिहिलं. या सगळ्यातलं राजकारण, स्त्रीचा तिच्या शरीरावरचा हक्क, मूल हवं असणं, कायदे, असे अनेक पैलू या विषयाला आहेत. अजूनही भारतातही फारसं लिखाण या विषयावर झालेलं नाही.

यानंतर दुपारी फ्रंट लाॅनवर The need to listen: Dialogue versus Rhetoric असं सत्र होतं. त्यात सुधींद्र कुलकर्णी, सय्यद सलमान चिश्ती, पी. शिवगामी, पिंकी आनंद आणि जेएलएफमध्ये नेहमी उत्साही उपस्थिती लावणारे शशी थरूर सहभागी होते. सुधींद्र कुलकर्णींवरचा शाईहल्ला कोणी विसरलेले नव्हते. शिवगामी या तामिळनाडूतील निवृत्त आयएएस अधिकारी, आणि दलित. पिंकी आनंद अॅडिशनल साॅलिसिटर जनरल. चिश्ती सूफी पंथाचे. अपेक्षेनुसार जोरदार वाद झाले, कोण कोणाचं ऐकतंय, कोण म्हणणं दाबून टाकतंय, बोलू देत नाही, असहिष्णुता असे मुद्दे आले. विशेषकरून आनंद व थरूर यांचं पक्षीय भूमिकांवरून चांगलंच वाजलं. आम्ही ऐकत नाही, हे पसरवलं गेलंय असं आनंद यांचं म्हणणं होतं. Reality and perception या दोन बाबींचा स्वतंत्र विचार करायला हवा, असं सगळ्याच बाजूंचं म्हणणं होतं. प्रत्येकालाच मी खरा असा आहे Reality पण मी तसा आहे असं लोकांना वाटतंय perception, असं म्हणायचं होतं. रोहित वेमुल्लाने आत्महत्या करून आठवडाच उलटला होता तेव्हा. दलित विद्यार्थ्याची आत्महत्या म्हणावं की, विद्यार्थ्याची आत्महत्या म्हणावं अशीही चर्चा झाली. दलित नको असं म्हटल्यावर टाळ्या पडल्या. असं वर्गीकरण नको, असं वाटतं तरीही I wish i could look beyond this, असं थरूर म्हणाले, तेही पटलं. शिवगामी यांना सरकारी नोकरीत असताना आलेले अनुभव म्हटलं तर ओळखीचे, आणि तरीही चीड आणणारे होते. तामिळनाडूतल्या अडीचतीन हजार गावांना त्यांना भेट दिली होती. कोणतंही काम करताना स्थानिक लोकांचं म्हणणं, त्यांना काय हवंय, ते ऐकूनच घेतलं जात नाही. कोणालाही थोडीशी जमीन आणि लहानसं घर एवढंच हवं असतं, पण त्याकडे दुर्लक्षच केलं जातं. थोडे पैसे दिलं की लोक गप्प बसतात, हा अनुभव सगळीकडचाच. त्यातून संवाद बंद करायचा, हे धोरण सगळीकडेच दिसतं, असं त्या म्हणाल्या. दलित वस्ती जोवर वेगळी आहे, जोवर त्या वस्तीत सगळ्याच सोयीसुविधांचा तुटवडा आहे, तोवर हे वर्गीकरण राहणारच, आणि ते तसं आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे, असं त्यांनी ठामपण सांगितलं.

या वेळी अर्थातच काँग्रेस व बीजेपी यांमधला संवाद, पक्षांतर्गत संवाद असेही वाद झाले. असहिष्णुता वा intolerance यावर शिवगामी म्हणाल्या ते मात्र पटणारं होतं. जेव्हा आपण एखाद्याला tolerate करतो, वा सहन करतो, असं म्हणतो तेव्हा त्या तो वाईट असूनही सहन करतो, असा अर्थ आहे. त्यामुळे toleranceऐवजी coexistence हा शब्द वापरायला हवं.

त्या दिवशी एवढंच ऐकलं. मुलं कंटाळली होती, मग आम्ही लवकर बाहेर पडलो. कान्हा नावाचं एक शाकाहारी रेस्तराँ चांगलं असल्याचं आमच्या ड्रायव्हरने सांगितलं. तिथे गेलो जेवायला. खरंच जेवण छान होतं. किंमतही योग्य होती, स्वच्छता होती आणि चविष्ट जेवण होतं.
गुलजारांना ऐकणारी गर्दी

चौथा दिवस शनिवार, त्यामुळे प्रचंड गर्दी होती डिग्गी पॅलेसमध्ये. त्यात गुलजार येणार म्हटल्यावर विचारायलाच नको. फ्रंट लाॅनसारखं प्रशस्त ठिकाणही तुडुंब भरलेलं होतं. त्यांच्या निसर्गविषयक कवितांचं पवन वर्मा यांनी Green poems असा अनुवाद केलाय, त्या संदर्भात हे सत्र होतं, नज्म उलझी हुई है सीने में. गुलजारांनी त्यांच्या कविता वाचल्या, रसिकांनी प्राण कंठाशी आणून त्या ऐकल्या, आणि कित्येकांनी रेकाॅर्ड केल्या. गुलजारांची लोकप्रियता विशिष्ट वयोगटातल्या व्यक्तींमध्येच नाही, ते आबालवृद्धांचे लाडके आहेत, याची हा कार्यक्रम साक्ष होता.
गुलजार यांची एक कविता  येथे ऐकू शकता. मोबाइलवर रेकाॅर्ड केल्याने आवाजाची प्रत उत्तम नाही परंतु माहोलचा अंदाज येईल.  गुलजार यांची आणखी एक कविता येथे आहे.

त्यानंतरचं सत्र मी ऐकलं ते Temples in pakistan या पाकिस्तानी लेखिका रीमा अब्बासी यांच्या पुस्तकाच्या विषयीचं, बैठक या छोटेखानी बंदिस्त सभागृहात. सत्राची सुरुवात झाली लता मंगेशकरांच्या सुरातल्या अल्ला तेरो नाम या भजनाने. रीमा म्हणाल्या, हे पाकिस्तानातलं सर्वात लोकप्रिय गाणं. कोणताही सण असेल, समारंभ असेल, ध्वनिक्षेपकांवरून हे ऐकू येतंच येतं, विशेषत: जुन्या वस्त्यांमधून. पाकिस्तानातल्या काही मंदिरांची छायाचित्रं या वेळी दाखवण्यात आली. त्या ठिकाणी होणाऱ्या जत्रा, यात्रांमध्ये दक्षिण आशियातून मोठ्या संख्येने हिंदू भाविक येतात, त्यात १० टक्के तरी दलित असतात, असंही रीमा म्हणाल्या.

या सत्रात बोलताना रीमा अब्बासी. सोबत रीना कोठारी व टीव्ही पत्रकार सुधीर चौधरी. फोटो आंतरजालावरून साभार.
 पाकिस्तान बदलतोय, वेगाने बदलतोय, असा दावा त्यांनी केला. पाकिस्तानी सरकारी टीव्हीवर पूर्वीसारखे संगीत, नृत्य असे कार्यक्रम आता पुन्हा सुरू झालेत, ३५ अत्यंत वाईट वर्षं काढल्यानंतर आता आम्हाला बरे दिवस दिसू लागलेत, असं त्या म्हणाल्या. रीमा यांचं पुस्तक भारतीय प्रकाशकाने काढलं आहे. पत्रकार प्रत्यक्ष येजा करू शकत नसले तरी कहानियाें को व्हीजा नहीं लगता! असं त्या म्हणाल्या. आपण खरंच भाग्यवान, अशा कहाण्या ऐकू/वाचू शकतो पलिकडच्या ते.

मागच्या एका सत्रात दलित असा शब्द/वर्गीकरण करण्याविषयी चर्चा झाली होती. या सत्रात ती अल्पसंख्य minority या संकल्पनेवर झाली. आपल्याच देशातल्या लोकांना अल्पसंख्य कसं म्हणू शकतो आपण, तसं म्हटलं की राजकीय हक्क, शिक्षण, नोकरी, सामाजिक अस्तित्व सगळ्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. फक्त communities/religious communities म्हणा, असं मत रीमा यांनी व्यक्त केलं. ऊर्दूमध्ये सर्वधर्मसमभाव वा समादर यासाठी कोणते शब्द आहेत, आहेत तरी का, असा सवाल एका प्रेक्षकाने केला. त्या म्हणाल्या, इस्लाम/ऊर्दूमध्ये pluralism महत्त्वाचा आहेच की. भारतात असं होतं, मग तुमच्याकडे कसं होतं, ही उत्सुकता बहुतांश प्रेक्षकांमध्ये होती. उदा. एखाद्या प्रार्थनास्थळाविषयीचा काही मुद्दा असेल तर प्रसिद्धीमाध्यमं तो लावून धरतात, त्यावर चर्चा घडवून आणतात. तुमच्याकडे काय होतं? त्यावर त्यांनी हैदराबादेतल्या एका हनुमान मंदिराचं उदाहरण दिलं. या मंदिराच्या जागेवर एका गुंडाला अतिक्रमण करायचं होतं म्हणून त्याने पाठवलेल्या काही मुलांनी देवळावर हातोडा मारला व ती पळून गेली. या मुलांवर व गुंडावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी अनेक पक्षांचे लोक एकत्र आले व त्यांनी तीन दिवस बंद घडवून आणला. अखेर मुलांना पकडण्यात आलं व त्या मंदिराबाहेर पोलीस चौकी उभारण्यात आली, असं त्या म्हणाल्या. माध्यमांमध्येही अशा घटनांवर बेइंतहा चर्चा होतेच, आता ८० व ९०च्या दशकातला पाकिस्तान बदलला आहे, असं रीमा म्हणाल्या. रीमा यांचं म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न पत्रकार सुधीर चौधरी आकडेवारीसह वा दाखल्यांसह करत होते.

अरब स्प्रिंगवरचं सत्र
यानंतर अरब स्प्रिंग या विषयावरचं सत्रही चांगलंच रंगलं. मोना एल्ताहावी या इजिप्शियन अमेरिकन पत्रकाराला ऐकणं आणि पाहाणं हा थरारक अनुभव होता. इजिप्तमधील महिलांच्या स्थितीविषयी मोना यांनी खूप लिखाण केलं आहे. मानेवर रुळणारे कुरळे केस, चष्मा आणि हातवारे करत बोलण्याची शैली यामुळे त्या लक्षात राहिल्याच, परंतु त्या जे बोलत होत्या तेही तितकंच लक्षवेधक होतं. तलाक वा बुरखा/पडदा/आबाया या विषयांवर तुमचं काय मत आहे, असं कोणी विचारल्यावर त्या म्हणाल्या, Mona doesn't like it, Mona doesn't approve it. Mona doesn't wear a burkha. भारतातल्या तरुणांना अरब स्प्रिंगविषयी बरीच माहिती आहे, असं हे सत्र ऐकताना लक्षात आलं.

चौथ्या दिवसातलं शेवटचं सत्र होतं सुनील खिलनानी यांच्या मुलाखतीचं. सुनील यांनी बीबीसी रेडिओ ४ साठी Incarnations: India in 50 lives ही मालिका गेल्या वर्षी केली आहे, त्यातले २५ भाग प्रक्षेपित झाले आहेत, जे बीबीसीच्या साइटवरून पाॅडकास्ट स्वरूपात डाउनलोड करता येतात. ते डाउनलोड करून ऐकावे व ऐकवावे, इतके महत्त्वाचे आहेत. येथे पाॅडकास्ट ऐकता व डाउनलोड करता येईल पुढच्या २५ भागांचं काम सुरू आहे.

भारताचा इतिहास सांगताना ज्या व्यक्ती अपरिहार्य आहेत, अशा ५० व्यक्तींबद्दलची ही मालिका आहे, प्रत्येकी १३ ते १५ मिनिटांची. रेडिओवरची असल्याने यात सुनील यांचं निवेदन, संबंधित संशोधकांचं म्हणणं, काही विशिष्ट जागी जाऊन केलेलं ध्वनिमुद्रण असं याचं स्वरूप आहे. यात बुद्ध, शिवाजी, कृष्णदेवराय, कबीर, मलिक अंबर, झाशीची राणी, आदि व्यक्तींविषयी सुनील बोलले आहेत. उदा. कबीरांवरील भागात थेट बनारसला विणकरांसोबत बसून केलेलं ध्वनिमुद्रण आहे. या मालिकेसंदर्भात विल्यम डॅलरिम्पल यांनी सुनील यांना बोलतं केलं. सुनील अनेक भारतीय वृत्तपत्रांमधून राजकीय/सामाजिक लिखाण करत असतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला हे सगळे संदर्भही होतेच.

चौथा दिवस संपला आणि आमच्या दृष्टीने फेस्टिवलही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचं विमान दोन वाजताच उड्डाण करणार होतं, त्यामुळे शेवटच्या दिवशी सकाळी फेस्टसाठी जायला मिळणार नव्हतं.

यंदाही दरवर्षीप्रमाणेच अनेक सेलेब्रिटी फेस्टला होते, पण गुलजार वगळता मी एकाही सत्राला गेले नाही. एकतर प्रचंड गर्दी असते. दुसरं, बहुतेकांना मी अमुकला पाहिलं हे लोकांना सांगण्यात अधिक रस असतो, ते काय म्हणतायत हे ऐकण्यात कमी. त्यामुळे करण जोहर, शोभा डे, जावेद अख्तर, यांना मी ऐकलंच नाही. हां, आमिषला मात्र ऐकलं. आमिष त्रिपाठी, तोच The Shiva Trilogy लिहिणारा. युवावर्गाचा प्रचंड लाडका लेखक. त्याला तेरा वर्षांच्या एका मुलाने विचारलं, तुमच्या पुढच्या पुस्तकाचं नाव काय असेल, आधीची सगळी वाचून झाली आहेत. आमिषने त्याला सत्र संपल्यानंतर मंचापाशी बोलवून कानात नाव सांगितलं पुस्तकाचं.

एका सत्राच्या वेळी माझ्या शेजारच्या खुर्चीत एक मध्यमवयीन गृहस्थ बसले होते. त्यांनी सुरुवातीलाच मला विचारलं, तुम्ही मराठी आहात का. मी हो म्हटल्यावर, पुण्याच्या का, असं विचारलं. नाही म्हटल्यावर ते म्हणाले, मी मूळचा पुण्याचा पण सध्या नोकरीनिमित्त दिल्लीत असतो. अभय खेर त्यांचं नाव. मजा वाटली मला. तसंच फ्रंट लाॅनमधल्या एका सत्राच्या वेळी शेजारी बसलेल्या दोघी मुली मराठीत बोलताना ऐकलं. त्या तिघीजणी पुण्याहून आल्या होत्या फेस्टिवल आणि पर्यटन असं दोन्ही करायला. इंजीनिअर होत्या तिघी, शिकत असल्यापासून त्यांनी फेस्टिवलबद्दल ऐकलं होतं, पण तेव्हा परवडत नव्हतं. आता नोकरी लागल्यावर त्या आल्या होत्या. अंतर्नादमधला लेख वाचून ठाण्यातले किरण भिडे यांनी आधीच फोन केला होता, त्यानुसार तेही भेटले तिथे.

चार दिवसांत माझ्या लेकीने तिला काय ऐकायचंय हे ठरवलेलं होतं. पाकिस्तान हा तिचा आवडता विषय असं मला नंतर लक्षात आलं. तसंच जेरी पिंटोचीही दोन सत्रं तिने ऐकली. त्याने ऐकवलेली जॅबरवाॅकी ही अॅलिस इन वंडरलँडमधली कविता तिला फारच आवडली. तामिळ संतकवयित्री आंदाळ हिच्यावरचं एक सत्र तिने ऐकलं आणि ती भारावल्यासारखी मला त्याच्याबद्दल ऐकवत होती. Andal: The Autobiography of a Goddess लिहिणाऱ्या प्रिया सरुक्कई छाब्रिया व रवि शंकर यांच्याशी मारलेल्या गप्पा तिने ऐकल्या. प्रेक्षकांमध्ये उपस्थित एका तामिळ स्त्रीने आंदाळची एक कविता म्हणून दाखवली त्या वेळी.

डिग्गी पॅलेसच्या बाहेर असलेल्या रंगवलेल्या रिक्षा

परतताना विमानतळावर आमिष दिसला, आमच्याच विमानाने तो परतणार होता. मी त्याच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या तिथेच. आमिषच्या सर्व पुस्तकांचे मराठीत अनुवाद झालेले आहेत, आणि ते लोकप्रियही आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक छोट्यामोठ्या शहरांमध्ये तो फिरलेला आहे. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून लेखकु झालेल्या आमिषला प्रचंड यश मिळालं आहे, पण त्याचे पाय जमिनीवर आहेत. जयपूर फेस्टिवल एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे, किंवा असली तरी काय झालं, आपण आपलं काही तरी केलं पाहिजे, साहित्य संमेलनांमध्ये आपण चांगलं घडवलं पाहिजे, आपण आपल्या भारतीय भाषांचं महत्त्व टिकवलंच नव्हे तर वाढवलं पाहिजे, असं तो म्हणाला. महाराष्ट्र टाइम्सने मुंबईत अायोजिलेल्या छोटेखानी संमेलनात तो सहभागी झाला होताच.

अशा रीतीने जेएलएफ २०१६ पार पडला. खूप काही शिकायला मिळालं, नवनवीन कानावर पडलं. आता पुढच्या वर्षाची प्रतीक्षा. ऐकण्यासाठी तर नक्कीच, पण stylish winterwear पाहण्यासाठी, घीवर चाखण्यासाठी, कुल्हडमधली स्पेशल डिग्गी चाय पिऊन अंगात ऊब आणण्यासाठी, बापू बाजारमधल्या कानातले-गळ्यातली- बांगड्या-स्कर्ट-साड्या, ओढण्यांच्या खरेदीसाठीही.

(लेखातील काही संदर्भ मी मुंबईत परतल्यानंतर गूगलवर तपासले आहेत, तारखाही गूगलवरून घेतल्या आहेत. तासाभराच्या सत्रात सर्व तपशील सांगण्यासाठी वक्त्यांना वेळ नसतो, त्यामुळे तिथे जे घडत असते ते टिपून घेतले व मुंबईत आल्यावर ते तपासून अधिकचे तपशील घेतले आहेत. अफगाण गर्ल हे छायाचित्र आंतरजालावरून साभार. इतर सर्व छायाचित्रं लेखिकेने टिपलेली आहेत व ध्वनिमुद्रणही तिनेच केलेले आहे.)

Comments

 1. मस्त मस्त मस्तच उतरवलंयस सारं. पुढच्या वर्षी यावं वाटतंय.
  खूप खूप आभार.

  ReplyDelete
 2. थँक्यू मुग्धाताई. पुढच्या वर्षी सगळ्या मिळून जाऊया

  ReplyDelete
 3. वाचताना सारखी नॉस्टेल्जिक होत होते आणि यावर्षी जमलं नाही म्हणून खंतावतही होते. खूप सुंदर सारांश लिहिला आहेस मृण्मयी. काही सत्र अटेन्ड करायचीच असं ठरवलेलं त्यापैकी बहुतेक तू कव्हर केलीस म्हणून जास्त आनंद झाला. अफ़गान गर्ल वाल्या स्टीवचं ऐकता आलं की नाही कळलं नाही. ऐकलं असशील तर त्याबद्दल अजून लिही नक्की. तसंच लेखक लोकांच्या लिहिण्याच्या सवयी/पद्धतींवरही अजून लिही ही माझी नम्र विनंती. परिश्रमपूर्वक सारांश लिहिला आहेस एकुण फ़ेस्टीवलचा. थोडक्यात झलक मिळाली याचं समाधान वाटलं वाचून.
  खूप खूप आभार. नेक्स्ट इयर सगळ्या मिळून जाऊया.

  ReplyDelete
  Replies
  1. अगं, स्टीव्ह मॅककरीला नाहीच ऐकता आलं मला. लिहिण्याच्या सवयींवर लिहिते लवकरच. यातच अॅड करेन. पुढच्या वर्षी नक्की.

   Delete

Post a Comment