उम्मेद भवन |
गणपतीत मुंबईत नाही राहायचं यंदा, असं बऱ्याच दिवसांपूर्वी ठरवलं होतं. लेकीलाही सुटी होती त्या काळात. त्यामुळे बाहेर पडायचं नक्की झालं. भारतात या दिवसांत बहुतेक सगळीकडे पावसाळा असतो, त्यामुळे मारवाड आणि मेवाड हे राजस्थानातले प्रांत निवडले, म्हणजे जोधपूर, उदयपूर, आणि अासपासचा परिसर. घाईगडबड करायची नाही, जमेल तेवढं भटकायचं, दमूनभागून परतायचं नाही, हे निश्चित होतं.
ट्रेनने जोधपूर, तिथून राणकपूर मार्गे उदयपूर आणि तिथून विमानाने परत अशी ट्रिप प्लॅन केली. जाताना ट्रेनमध्ये वेळ घालवायचा उत्साह असतो, येताना कधी घरी पोचतो असं झालेलं असतं, म्हणून ही योजना. सामानही वाढलेलं असतं येताना, बॅगांची बोचकी झालेली असतात, तेव्हा विमान बरं पडतं. जरा आधी तिकिटं काढली तर फार महागही पडत नाही.
दुपारी दीडची ट्रेन होती, पण वांद्रे टर्मिनसपर्यंत पोचतो की नाही, अशी भीती वाटायला लावणारा ट्रॅफिक होता त्या दिवशी. ओला, उबर दोन्हींचा फार वाईट अनुभव आला. त्यात मी त्या स्टेशनवर पहिल्यांदाच चालले होते. गोंधळून तर गेलोच दोघी, पण प्रत्यक्ष ट्रेनपर्यंत पोचायलाही बराच वेळ लागला. अखेर स्थानापन्न झालो, साइडचे बर्थ होते त्यामुळे कोणाची लुडबुड नव्हती. दिवसाचा प्रवास असल्याने वाटेतली स्टेशनं, नद्या, पूल, गावं पाहायला मजा येत होती. दोन गावांची नावं मजेशीर होती. एक होतं सचिन आणि दुसरं होतं कविता! सुरत स्टेशनवर RO Filtered पाणी होतं, ३ रुपये लिटर, एक रुपया ३०० मिली. आमचं पाणी संपतही आलं होतं म्हणून ते घेतलं. मस्त थंड पाणी. एरवी ट्रेनमध्ये २० रुपये लिटर बाटली मिळते!
दुपारचं जेवण सोबत नेलं होतं, रात्रीसाठी गार्गीने आॅनलाइन आॅर्डर केलं. थाळी होती, नीट पॅक केलेली. जेवण बरं होतं, फार ग्रेट नव्हतं. ट्रेनच्या प्रवासाचं मुख्य अंग असतं सहप्रवासी. आमच्या शेजारीच एक अतिश्रीमंत कुटुंब होतं. आई, ९ महिन्यांची मुलगी, ४ वर्षांचा मुलगा आणि त्यांना सांभाळणारी दीदी. त्यांच्याकडे फक्त ११ डाग होते. नवरा सोडायला आला होता, पण ते गाडीत चढले आणि गाडी सुटली. तो नंतर बोरिवलीला उतरला बहुतेक. नंतर रात्र होईपर्यंत तो मुलगा बर्थवर चढे, उतरे. आई त्याला एकट्याला काही करू देई ना. कधीकधी ती त्याच्याकडे दुर्लक्ष करे, तर कधी फार प्रेमाने वागे. मोठाच विरंगुळा होता तो.
रणबांका पॅलेस |
तर, आम्ही निघालो उम्मेद भवन पाहायला.
उम्मेद भवन |
राजस्थानात कालमापनाच्या काही स्टेजेस आहेत. म्हणजे स्वातंत्र्य, नंतर संस्थानं खालसा होणं, नंतर १९७२मध्ये ती केंद्राने ताब्यात घेणं, इ. प्रत्येक राजवाडा, किल्ला पाहताना हे कालखंड याच पद्धतीने सांगितले जात होते. तर उम्मेद भवनमध्येही कालानुक्रमे सप्ततारांकित हाॅटेल झालेले आहे, एका भागात राजा कुटुंबासह राहतो आणि केवळ १० टक्के भाग संग्रहालयाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. तोही भव्य आहे, डोळ्यांचे पारणे फेडणारा अाहे. टेकडीवरच्या काही भागावर महाराष्ट्रातल्याच एका बिल्डरचा बंगले व फ्लॅट्सचा प्रकल्पही सुरू आहे. बंगले बहुतेक विकले गेलेले आहेत, फ्लॅट रिकामे पडले आहेत. एक आहे, हे बंगले नि इमारती, मूळ भवनसारख्या सँडस्टोनच्याच आहेत. त्यामुळे त्या तिथे अप्रस्तुत वाटत नाहीत.
मेहरानगडावरनं दिसणारं जोधपूर |
शीशमहल |
मेहरानगडावर कलाकुसरीच्या कामाचे शेकडो नमुने आहेत. जनाना महल, रंगमहल, शीशमहल, इ. नेहमीचे लोकप्रिय प्रकार होतेच. तोफाही आहेत बऱ्याच ठेवलेल्या. युद्धाच्या वेळी झालेल्या तोफांच्या हल्ल्याच्या खुणाही इथे जपून ठेवलेल्या आहेत. गडावर बरीच डागडुजी केलेली आहे, काम सुरूही आहे. इथे वर जाण्यासाठी लिफ्ट उपलब्ध आहे. त्यामुळे थोडी चढणीची चाल कमी होते. अर्थात खाली येताना चालतच आलो आम्ही. इथली एक आवडलेली गोष्ट म्हणजे फोल्डिंगचा एक वळणावळणाचा जिना. हा लोखंडी जिना नटबोल्टवाला आहे, इंग्लंडहून मागवलेला. त्याची घडी घालता येते.
पारदर्शक संगमरवरातून आत येणारा सूर्यप्रकाश |
गडावरनं खाली उतरलं की, काही अंतरावरच जसवंत थाडा आहे, म्हणजे जसवंतजींचं स्मारक. इथेही सुरेख कोरीव काम आहे. इथे मुख्य मंदिरात काही संगमरवर पारदर्शक आहेत, त्यातनं छानपैकी बाहेरचा सूर्यप्रकाश आत येऊन सुंदर पिवळा प्रकाश पडला होता. आत एका मोठ्या दोरीवर भाविकांनी मन्नतचे दोरे बांधलेले होते, शेकड्याने होते.
थाड्याच्या जवळच छोटासा तलाव आहे, अगदी चित्रातला असावा असा. संध्याकाळी फारच रम्य वाटत असेल तिथे, आम्ही भर दुपारीही आनंदात होतो म्हणजे.
हे पाहून गुलाबसिंहांनी आम्हाला निरोप दिला. ते जवळपास सत्तरीतले. सफारी आणि डोक्यावर टोपी. खिसे भरून चाॅकलेट. ते २५ ते ३० वर्षांपासून गाइड म्हणून काम करत असल्याने पर्यटन स्थळांवरचे सगळे कर्मचारी त्यांच्या ओळखीचे. चाॅकलेट हा त्यांचा ट्रेडमार्क. उम्मेद भवन, मेहरानगड आणि जसवंत थाडा इथे मिळून त्यांनी जवळपास २५ तरी जणांना चाॅकलेट दिलं असेल. त्यांना पाहून गार्ड, गाइड, इतर कर्मचारी वाकून नमस्कार करत आणि हात पुढे करत चाॅकलेटसाठी. आम्हालाही त्यांनी भेटल्यावर दिलंच होतं एकेक.
गुलाबसिंहना सोडून आम्ही जेवायला गेलो. तिथे जिप्सी नावाचं चांगलं रेस्तराँ आहे, असं ड्रायव्हरने सांगितलं. रविवार दुपार होती, अनेक कुटुंबं जेवायला आली होती. मी कढी पकोडे नि चावल मागवलं, तर गार्गीने शेजवान राइस. डिश आली तर आपल्याकडच्या बटाटावड्याहून थोडे लहान चार पकोडे फक्त दिसत होते. नीट पाह्यलं तर त्यांच्या खाली कढीत बुडालेला भात होता. कढी चविष्ट होती पण पकोड्यात फारच जास्त सोडा होता. एकही मी पूर्ण खाऊ शकले नाही. गार्गीचा राइस चांगला होता, पण तोही बराच होता. म्हटलं पॅक करून घेऊ सोबत, रात्री खाता येईल. वेटरला सांगितलं तर त्याने भिंतीवरच्या पाटीकडे बोट दाखवलं, बचा हुआ खाना हम पॅक नहीं करते. लाॅजिक नाही कळलं त्यामागचं, पण भात तसाच टाकून द्यायला जिवावर आलं हे नक्की. जेवून हाॅटेलवर अालो, एक डुलकी काढली. नि संध्याकाळी परत बाहेर पडलो.
कैलाना तलाव |
मंदौर उद्यान |
अंधारलं तसं बाहेर आलो. आता छान भूक लागली होती. फतेहसिंगनी सुखसागर की अशाच एका छोट्या रेस्तराँसमोर गाडी उभी केली. आत गेलो, तर सगळीकडे फुगे लावलेले, एकुण जरा उत्सवी वातावरण. वेटरला विचारलं, तर तो म्हणाला की, तिथे असलेलं हाॅटेल बंद पडलं होतं काही दिवसांपूर्वी, ते नवीन मॅनेजमेंटने आजच सुरू केलं होतं. रोटी सब्जी मागवली. गरमागरम तूप लावलेली रोटी आणि चविष्ट भाजी. मस्त जेवलो. हाॅटेलसाठी शुभेच्छा देऊन परतलो, रणबांकाला.
उद्या सकाळी निघायचं होतं उदयपूरकडे, राणकपूर मार्गे. पण घाई नव्हती.
सकाळी उठून पॅकिंग केलं. इतक्या छान हाॅटेलात एकच दिवस राहणार आहोत याचं वाईट वाटत होतं खूप. पण अर्थात उदयपूरबद्दलची एक्साइटमेंटही होतीच. जूती घेतल्या होत्या विकत निघतानिघतातच, त्यामुळे आनंदात होतो दोघी.
राणकपूर |
राणकपूर |
रस्त्यात मधेच सांडेराव गावाचा फाटा लागला, तिथे डावीकडे वळायचं होतं राणकपूरसाठी. या काेपऱ्यावर चहावाला होता एक. तो भट्टीवर चहा करत होता. फतेहसिंग सांगत होते की, हा पूर्वी मुख्य रस्ता होता, आता बाजूनेच बायपास काढलाय त्यामुळे या रस्त्यावरची वर्दळ अगदीच कमी झालीय. पूर्वी इथे चहाच्या शंभरेक टपऱ्या होत्या, आज आम्हाला जेमतेम तीनचार दिसल्या. ही तर आपल्या मुंबई पुणे महामार्गाचीच NH-4 ची गोष्ट वाटली. इथून पुढचा रस्ता वाईट होता. रुंद पण खडबडीत. शिवाय वस्तीही होती आजूबाजूला. या रस्त्याला दुतर्फा कडुलिंबाची झाडं लावली आहेत कोणा समाजसुधारक व्यक्तीने. कौतुक वाटलं त्यांचं. अशा रस्त्यावरनं जाताना राणकपूरला पोचायला दोन वाजून गेले, जवळपास चार तास लागले होते. आम्ही तिथल्या धर्मशाळेत जेवायचं ठरवलं होतं, पण ती दोन वाजता बंद झाली होती. जवळपास दुसरी जेवणाची सोय नव्हती. मग आधी मंदिर पाहायचं ठरवलं.
मंदिर अरवली पर्वतरांगांच्या मध्ये बांधलेलं आहे. उंच जोत्यावर, २५ ते ३० पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य मंदिरात जातो आपण. तीर्थंकर आदिनाथ यांचं हे मंदिर. (https://en.wikipedia.org/wiki/Ranakpur) असंख्य खांब, त्यांवर सुरेख कोरीव काम, मधल्या घुमटांवरही कोरलेली शिल्पं, काय पाहावं असं झालं होतं. आमच्या बाईंना अर्थातच थोड्याच वेळात कंटाळा आला, मग त्या बसल्या एके ठिकाणी निवांत आणि मी एकटीच भटकले. मंदिर बऱ्यापैकी मोठं आहे, चौमुखी. तिथले जैन पुजारीच गाडड म्हणून काम करतात. विशेषकरून परदेशी पर्यटकांना मंत्र म्हणत गंध वगैरे लावून देत होते ते.
एक गोष्ट आवर्जून सांगण्याजोगी. इथे कॅमेरा आत न्यायला १०० रुपये शुल्क होते, मोबाइल कॅमेरा असेल तरी. पण आॅडिओ गाइड उपलब्ध होते. ते कानाला लावून अनेक जण मंदिराबद्दल जाणून घेताना दिसले. मेहरानगडलाही ही सोय आहे. महाराष्ट्रात असं काही आहे का, याची कल्पना नाही, मी फार फिरलेली नाही इकडे.
रहाट चालवून पाणी काढून दाखवणारा आमचा चालक फतेहसिंग |
जेवून निघालो उदयपूरकडे. नव्वदेक किमी आहे अंतर. साडेसहाच्या सुमारास हाॅटेलवर पोचलो. गोल्डन ट्युलिप. दिवसभर गाडीत बसून आंबलो होतो. थोडं लोळलो, अनपॅक केलं. मग मी आमच्या दैनिक भास्करच्या आॅफिसात गेले, तिथले निवासी संपादक त्रिभुवन शर्मांशी बोलणं झालं होतं आधीच. आॅफिसात तास दीड तास गप्पा झाल्या, पुढचे अडीच दिवस काय काय करता येईल त्याबद्दल बोललो. दुपारचं जेवण उशिरा झालं होतं, मग रात्री हाॅटेलात फक्त सूप घेतलं आणि झोपलो.
छान लिहीलं आहेस पण मला फोटोच जास्त आवडले. अत्यंत सुदंर अँगल ने काढले आहेस.
ReplyDeleteथँक्यू वंदना.
ReplyDelete