my adventures in parenting

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे :)
सकाळी पोळ्या करत होते. उरलेली कणीक ठेवायच्या डब्यात गार्गीने केकचा तुकडा ठेवला होता, म्हणून मी तिला हाक मारली. म्हटलं, तो डबा रिकामा करून दे. तिने सहज त्याचं प्लास्टिकचं झाकण उघडलं आणि तव्यावर ठेवायची नुसती अॅक्शन केली. मग केक बाहेर काढला आणि म्हणाली,
'आई, तू असं अॅडव्हेंचर कधी केलंयस का? म्हणजे मी आता ठेवलं नाही झाकण तव्यावर पण तसा विचार आलाच ना, तसा येतो का कधी तुझ्या डोक्यात?'
'तुला जन्माला घालणं हेच मोठं अॅडव्हेंचर होतं माझ्यासाठी गं!'
हसत ती निघून गेली. माझी अपेक्षा होती त्यानुसार हा संवाद ट्वीटही करण्यात आला. फेसबुक सध्या बंद अाहे म्हणून, नाहीतर तिथेही हे गेलंच असतं. तिला वाढवण्यात आलेले अनुभव मी दोन ब्लाॅगवर मांडले होते, त्याला बराच प्रतिसादही मिळाला होता, त्यालाही आता तीन वर्षं होऊन गेली. ती हल्लीच म्हणाली होती, आई पुढचं लिही ना आता!
त्यामुळे मी लिहायला बसलेच. या ब्लाॅगमध्ये एका प्रौढ (adult) म्हणजे १८ वर्षं पूर्ण झालेल्या मुलीच्या पालकत्वाबाबत लिहिते.
तर, मगाशी मी तिला म्हटलं ते खरंच होतं का?
माझं लग्न तसं लहान वयात म्हणायला हवं, २२ वर्षांची होते मी. पण मूल इतक्यात नको, हे ठरवलेलं होतं. मोठं घर घ्यायचं होतं. त्यानुसार सव्वीसाव्या वर्षी झाली मुलगी. मूल झाल्यावर ते कसं वाढवायचं, शिस्त कशी लावायची, खर्च किती करायचा, लाड किती करायचे, वगैरे नीट विचार करून ठरवलेलं नव्हतं अर्थातच. तोवर जे काही इंग्रजीमराठी वाचलं होतं या विषयावर, आजूबाजूला पाहिलं होतं, त्यावरूनच आम्ही वागत गेलो. तिला दिवसभर सासूसासरे सांभाळत, आणि आमच्याकडे दिवसभराची मदतनीस मुलगी होती. ती अगदी विश्वासातली, प्रेमळ अशी आहे, त्यामुळे मी दिवसभर बाहेर असल्यावर लेकीची काळजी करायचा प्रश्नच आला नाही. मुख्य म्हणजे माझा स्वभावही तसा नाही. हे बरोबर आहे, हेच बरोबर आहे, असं मला म्हणायचं नाही.
हे तिला वाढवणं अमुक एका वयापर्यंतच शक्य होतं. नंतर तिची ती शिकत गेली, चुकतमाकत. तीही प्रचंड वाचते, तिचा मित्रमैत्रिणींचा मोठा गोतावळा आहे, त्यामुळे दोन महत्त्वाच्या माध्यमांमधून ती तिचे विचार, तत्त्वं, मूल्यं निश्चित करत गेली. आमच्याकडे पाहून, फक्त आमचं निरीक्षण करून इतका विस्तृत आवाका तिच्या कवेत आलाच नसता, असं मला ठामपणे वाटतं.
लवकरच ती २१ वर्षांची होईल. बीए झाल्यानंतर काय करायचं, कोणत्या संस्थांमध्ये कोणते अभ्यासक्रम आहेत, त्यांसाठीच्या प्रवेशपरीक्षा कधी आहेत, हे सगळं तिचं तिने शोधलं, दोन परीक्षा झाल्या आहेत, काही व्हायच्या आहेत. अहमदाबादला एका परीक्षेला ती आणि मैत्रीण दोघी गेल्या होत्या, तीन दिवस तिथे होत्या.
बाकीची बहुतेक मुलं पालकांसोबत आली होती, किंवा पालक त्यांच्यासोबत आले होते, असं म्हणणं अधिक योग्य असावं.
गेल्या दोनतीन वर्षांत एक स्पेशल मित्रही आहे. मला याची कुणकुण होती, पण नक्की माहीत नव्हतं. मध्ये एकदा तिने आम्हा दोघांचं एक लेक्चर घेतलं. तिच्या एका मैत्रिणीला मित्राबरोबर कोणा शेजाऱ्याने पाह्यलं, घरी सांगितलं आणि नंतर जे रामायण व्हायचं ते झालं. हे सांगताना, लेक आम्हाला म्हणाली, 'How can they be so judgemental? It is so wrong. By the way, I also have a boyfriend, hope you don't have a problem!'
आता मला प्राॅब्लेम नव्हताच. पण तिचा हा अॅटिट्यूड जरा चुकीचा वाटला. मैत्रिणीचे आईवडील जजमेंटल आहेत असं तिला वाटत होतं पण तीही तेच तर करत होती. त्यांनी कसं वागावं, कसं वागणं बरोबर याचा निर्णय तिने घेणं चुकीचं होतं, असं तिला म्हटलं. आणि एवढंच सांगितलं की, 'या वयात असं कोणी स्पेशल असणं ही एक छान गोष्ट आहे. पण त्यात कमिटमेंट किती द्यायची, किती वेळ द्यायचा, अभ्यास किती करायचा, या सगळ्याचा विचार तू करणं आवश्यक आहे.' काहीही प्राॅब्लेम झाला तर आम्ही आहोतच, हे मात्र पुन्हा एकदा सांगितलं.
आमच्या एका ओळखीच्या मुलावर त्याच्या माजी गर्लफ्रेंडने #metoo च्या प्रभावाखाली येऊन काही आरोप केले. तेही फेसबुकवर. हे ऐकून मात्र मी हबकले होते. सुदैवाने ते प्रकरण मिटलं. पण माझ्या मनात त्या वेळी जन्मलेले अनेक चिंतातूर जंतू आजही वळवळत आहेत. त्याने नक्की असं केलं होतं का, हा मुद्दा वेगळा, त्यात मला पडायचं नाही. पण गर्लफ्रेंड आणि बाॅयफ्रेंड आहेत दोन व्यक्ती तर त्या एकांतात किंवा कधी सार्वजनिकरीत्याही शारीरिक जवळीक तर साधतीलच ना? या मुलीने स्पष्ट केलं होतं की त्यांच्यात शारीरिक संबंध आले नव्हते परंतु जवळीक होती. मग काही वर्षांनी या सगळ्याचे काही वेगळे अर्थ लावून तुम्ही एकमेकांची जाहीर बदनामी करणार का? तेव्हा ते क्षण फार सुंदर, अद्भुत वाटतात, वाटतात नव्हे असतातही. पण नात्यात काही बिनसलं की, सोशल मीडियावर त्याची चर्चा कशाला करावी?
मध्यंतरी माझी शाळेतली मैत्रीण भेटली. शाळा सोडल्यानंतर ३२ वर्षांनी आम्ही भेटलो. ती शिकागोत असते. तिची मुलगी गेल्याच वर्षी युनिवर्सिटीत शिकायला गेली, दुसऱ्या राज्यात. म्हणाली, 'इतकं बरं वाटलं ती गेल्यावर. घर रिकामं वाटतं हे ठीकेय, पण जबाबदारी किती दिवस घ्यायची?' पण ती हेही म्हणाली की, 'लेक काही अगदी नियमाने फोन करत नाही, मेसेज करत नाही. आधी मला त्रास झाला, ही का नाही फोन करत वाटायचं. मग मीच ठरवलं, आपल्याला वाटलं की, आपण फोन करायचा किंवा मेसेज करायचा. तिने करायची वाट पाहायची नाही.'
हे संभाषण मी गार्गीला सांगितलं. त्यानंतर तिच्या काही प्रवेशपरीक्षा झाल्या. आता संभाषणात कधीतरी मी गेले बाहेर की... असे उद्गार निघतात. कधीतरीच, पण तो विषय आता सुरू झाला आहे.
आता बीएची शेवटची परीक्षा तोंडावर आली आहे तिची. ती संपली की लगेच सरोदची परीक्षा आहे. ती एकीला फ्रेंच शिकवतेय सध्या. त्यात नेटफ्लिक्स आहेच. फेसबुक मोबाइलवरनं डिलिट केलं असलं तरी इन्स्टाग्राम अाणि व्हाॅट्सअॅप आहेतच. मला सर्वच आईवडलांसारखं वाटतंय की ती अभ्यास पूर्ण लक्ष देऊन करत नाहीये. पण 'आई, परीक्षा माझी आहे, मला माहीतेय किती अभ्यास आवश्यक आहे ते,' असं उत्तर गेल्या आठवड्यात मिळाल्याने मी सध्या तो विषय काढत नाहीये. मधनंमधनं 'अभ्यास चाललाय ना नीट,' असं याच शब्दांत विचारते फक्त.
मला तिच्या परीक्षेचं वेळापत्रकही ठाऊक नसतं, म्हणजे भिंतीवरच्या कालनिर्णयवर लिहिलेलं असतं, पण पेपर कोणते कधी आहेत हे मी पाठ करत नाही. कालनिर्णयवर विषय आणि वेळ लिहिलेली असते, त्यानुसार डबा किंवा नाश्ता द्यायचं, परीक्षेला निघताना आयकार्ड, पेन, वगैरे घेतलंय ना हे तपासणं, वगैरे माझं काम मी चोख करते. अभ्यासाचं तिने करावं इतकीच माझी अपेक्षा. असं लिहून ठेवायची पद्धतही दोन वर्षांपूर्वी आम्ही सुरू केली. कारणही तसंच झालं. चाचणी परीक्षा सुरू होती तिची, रोज दोन पेपर होते. वेळा रोजच्या वेगवेगळ्या होत्या. एक दिवस तिची काहीतरी गडबड झाली आणि एक पेपर बुडाला. नंतर तो पुन्हा देता आला. पण मग आम्ही असं लिहून ठेवायचं ठरवलं. म्हणजे घरातल्या सर्वांना माहीत होतं की पेपर किती वाजता आहे. एरवीही तिच्या लेक्चरच्या वेळी ती उठलेली नसली की आजीआजोबा कोणीतरी विचारतंच, अगं, आज लेक्चर नाही का?
हेही माझं वागणं बरोबर असं माझं म्हणणं नाही. पण मी ते करत नाही. इतरांनी कसं वागावं, मुलांच्या एकूणच आयुष्यात किती involved असावं, कशाकशाची जबाबदारी घ्यावी, कशाची मुलांवर सोडावी, हे आपले आपण घ्यायचे निर्णय आहेत. अपराधी वाटून घ्यायचं का, हाही निर्णय तुमचाच असणार आहे. तिचा पेपर हुकला तेव्हा आमची प्रतिक्रिया हीच होती की, जास्तीत जास्त काय होईल, वर्ष पुन्हा करावं लागेल (वर्ष वाया जाईल असं मी म्हणणार नाही.) त्यात काय फार विशेष नाही. आणि एकदा असं झाल्यावर तीही अर्थात आता हे पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतेच. काहीही झालं तरी टोक गाठायचं नाही, शांतपणे विचार करून काय ते बोलायचं, हे मी शिकतेय. पूर्ण जमलेलं नाही, पण त्या दिशेनेच प्रयत्न सुरू आहे.
असाही एक विचार अधनंमधनं मांडला जातो की, मुलं आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी असावीत का? मूल जन्माला आल्यापासून आपण आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्या सोयीनुसार वळवतो. ते झोपलं असेल तर अनेक घरांमध्ये दारावरची घंटीही बंद असते. त्यांच्या परीक्षा, क्लासेस यांच्या सोयीने आपण आपल्या रजा घेतो, भटकंती प्लॅन करतो. यात काय बरोबर काय चूक मी सांगत नाहीये, कारण त्यात असं स्थलकालव्यक्तिनिरपेक्ष काही नाहीये. अमुक वेळी अमुक केलेलं योग्य ठरू शकतं, तमुक वेळी नाही. पण हा विचार तपासून पाहावासा वाटू लागलाय, इतक्या मोठ्या संख्येने पालक आता फक्त आणि फक्त मूलकेंद्री वागताना दिसतायत.
मी लेकीची दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षा सुरू असताना महिला दिनाच्या कार्यक्रमांसाठी बाहेरगावी गेले होते. तेव्हा घरात आजीआजोबा आणि तिचा बाबा होते. अशा अनेक जणी मला माहीत आहेत ज्या पूर्ण परीक्षाभर घरही सोडून जात नाहीत, गाव सोडायची गोष्टच सोडा. माझ्या अशा वागण्यातून तिचा आत्मविश्वास वाढतो, आई नसली तरी आपण परीक्षा देऊ शकतो, हे तिला कळतं. तसंच घरी इतर तीन व्यक्ती तिची काळजी घेणाऱ्या असतात त्यामुळे आई आपल्याला वाऱ्यावर सोडून जात नाहीये, हेही लक्षात येतंच. आपण जितकं त्यांच्या मागेमागे करू, काळजी करत व दर्शवत राहू, तितका त्यांच्यावर ताण वाढतो, असं मला वाटतं. त्यामुळे काळजी आहे याची खात्री देण्याचे इतर मार्ग शोधायला व ते अवलंबायला हवेत.
तिचा राग येण्याचे, तिचं वागणं न पटण्याचे अनेक प्रसंग येतात. परंतु आता ती १८ वर्षांची एक सज्ञान स्वतंत्र व्यक्ती आहे, हे लक्षात घेऊनच तिच्याशी बोलावं लागतं. कपडे कसे घालावेत यावर ती, मी, आणि तिची आजी यांचे वेगवेगळे विचार असतात. पण तिला ते ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे. शिवाय ८० वर्षांचे आजोबा घरात असल्याने स्फोटक परिस्थिती वारंवार उद्भवते. घरी येण्याच्या वेळेबाबतही हेच होतं. पण मुंबईसारख्या शहरात सातच्या आत घरात हा नियम मी तिला लावू शकत नाही. महिन्या दोन महिन्यांतनं एखाद्या कार्यक्रमानंतर अकरा वाजताही घरी परतायचं स्वातंत्र्य तिला आहे, क्वचितप्रसंगी माझी चिडचिड झाली तरीही. मुंबईत राहण्याचे, कला शाखेची विद्यार्थिनी असल्याचे फायदे तिने घ्यायलाच हवेत. मुंबईत जितक्या विविध मतं तिच्या पाहण्याऐकण्यात येतात, वेगवेगळ्या कलांचा आनंद तिला लुटता येतो. मग आता या वयात मी तिला ते घेण्यापासून रोखणं तत्त्वत: मला पटत नाही, वास्तवात परिस्थिती वेगळी असू शकते. पण ओला किंवा उबरने ती घरी येत असेल तर तिचं लोकेशनही मला कळत राहातं, याचा मोठा दिलासा अर्थात वाटतो.
घराबाहेर पडताना कुठे जातेय ते सांगून जायचं; कधी परत येणार ते सांगायचं आणि ती वेळ पाळायची; जेवायला येणार किंवा नाही तेही सांगायचं आणि पाळायचं, घराबाहेर पडताना काहीतरी खाऊन घ्यायचं, आदि नियम तिलाही लागू आहेत, घरातल्या इतर सदस्यांप्रमाणेच. त्यात हयगय नाही. अर्थात तेही ती या घरात राहतेय तोवरच. ती जेव्हा शिक्षण, नोकरी, वा लग्नानंतर घराबाहेर पडेल तेव्हा मी सकाळदुपारसंध्याकाळ तिच्या हालचालींवर लक्ष ठेवणार नाही, ठेवायची गरज भासणार नाही, इतका विश्वास मला आहे, आणि मुख्य म्हणजे तिला आहे.
She is now also a partner in crime. आम्ही भटकतो खूप. मुंबईत, बाहेर. आम्हाला प्रवास आवडतो, काहीही न करता फिरणं, टूरिस्टी गोष्टी सोडून भटकणं, चालणं, खाणंपिणं, या काॅमन आवडी आहेत. काही गोष्टी मी तिला आवर्जून करायला लावते, घेऊन जाते. उदा. कालच सतीश आळेकरांचं महानिर्वाण पाहायला गेलो दोघी. तिलाही ते आवडलं, तिने ते एंजाॅय केलं. पण ती स्वत:हून काही ते पाहायला गेली नसती हे १०० टक्के सत्य. सुखन हा असाच दोघींचा अतिशय आवडता कार्यक्रम. जातोय पुन्हा एकदा याच आठवड्यात. ती आता अधिक चवीने खाऊपिऊ लागलीय, म्हणून मलाही स्वयंपाकघरात प्रयोग करायचा मोह होऊ लागलाय. तिच्याबरोबर खरेदीला जाण्यातही मजा असते कारण चोखंदळपणाचा अर्क आहे ती.
एकंदर प्रवासात आनंदाचे क्षण अधिक आहेत, वाढते राहोत.

(पहिला भाग इथे आणि दुसरा भाग इथे वाचता येईल)

Comments