Diary and me.

अशोककाकाने लिहिलेली कविता, त्याच्याच अक्षरांत
आईकडे गेले होते मागच्या आठवड्यात तेव्हा आईने ही डायरी हातात ठेवली. १९७९मधली. मी सातआठ वर्षांची होते तेव्हाची. इतक्या वर्षांनी वाचताना हे सगळं वाचून हसू येतं. पण ते हास्यास्पद वाटत नाही, हे महत्त्वाचं.
वडलांना डायरी लिहायची सवय होती, व्यसन होतं म्हणा ना. त्यामुळे मी डायरी लिहिणं स्वाभाविक म्हणायला हवं. बाबा डायरीत रोज काय घडलं तेच लिहीत, फोन कोणाचे आले, कोण भेटलं, पत्र आलं, वगैरे. माझ्याही डायरीत अर्थात तेच आहे. मनातले कल्लोळ, कविता, वगैरे काही नाहीये यात. हे वय तसं लहान, पण पुढच्याही डायऱ्यांमध्ये सरधोपट दिनक्रम लिहिलेला आहे. तरीही त्यातनं तो काळ बराच उभा राहातो. उदा. त्या वेळी आमच्या घरी टीव्ही नव्हता, मी नववीत असताना, म्हणजे ८५मध्ये घरी टीव्ही आला. त्यामुळे या काळात आम्ही तेव्हा सर्रास पद्धत होती तसं, शेजारी टीव्ही पाहायला जात असू. साप्ताहिकी, चित्रहार हे दोन कार्यक्रम दर आठवड्याला पाहायला मी जायचे, असं दिसतं. चित्रहार पाहायला गेले म्हणून झोपायला उशीर झाला, असाही उल्लेख एका पानावर वाचला, म्हणजे तेव्हा साडेनवाला झोपत असू बहुतेक आम्ही रोज. पण हिअर इज ल्यूसी पाहायला गेले असं वाचून मीच आश्चर्यचकित झाले. साताठ वर्षांची असताना हिअर इज ल्यूसीतला विनोद कळण्याइतकं इंग्रजी मला नक्कीच येत नसणार, मग मी हा शो का पाहायला जात असेन? मजा वाटली मला.
माझ्या या डायरीत काही व्यक्तींचे उल्लेख खूप वेळा आहेत, म्हणजे आईबाबा आणि धाकटा भाऊ वगळता. ताईंचा उल्लेख आहे, त्यांच्या पाळणाघरात मी राहात असे तेव्हा. ताईदादा आले आहेत बऱ्याच ठिकाणी, ही माझी मावसभावंडं शेजारच्याच इमारतीत राहायची. या मावशीकडच्या गणपतीसाठी तेव्हा मुंबईतल्या माझ्या जवळपास सगळ्या मावशा, मामा व मुलं येत असत. कारण तेव्हा फक्त या मावशीच्याच घरी गणपती बसत असे. अाता बहुतेक सगळ्यांच्याच घरी हौशीचा, दीड दिवसांचा गणपती असतो, आणि तिथे दर्शनाला जाणं निव्वळ उपचार पार पाडण्याइतकं होऊन बसलंय. तेव्हा आम्ही मावशीकडे तासभर तरी आरती करायचो. इतक्या जणांचा स्वयंपाक मावशा करायच्या, आम्हा मुलींचा मोदक वगैरे करायला हातभार असायचा. गणपतीला कोणकोण आलं होतं तेही डायरीत आहे.
एक उल्लेख वाचून मी उडालेच, तो म्हणजे तांदूळ निवडले. आईला म्हटलंही मी, तू मला इतक्या लहान वयात तांदूळ निवडायला लावायचीस!

त्या वेळी शाळेत सत्कृत्य असा कायतरी एक प्रकार असे. कोणाचं तरी काम करून द्यायचं, त्याचे चार आणे वगैरे मिळत. एके दिवशीची नोंद आहे, सत्कृत्य म्हणून बाळूकाकाला रिक्षात बसवून दिलं. इमारतीच्या दारात आता रिक्षा किंवा ओलाउबर येत असताना, रिक्षात बसवण्याचं काय कौतुक असं वाटेल. पण तेव्हा रिक्षाही घरापासून दोनतीनशे मीटर चालत गेल्यानंतरच मिळायची. त्यामुळे तिथवर जायचं, रिक्षाला हात दाखवायचा, रिकामी रिक्षा घरापर्यंत आणायची, काकाला बसवायचं हे मोठं काम असणार ना?
अशोककाकाने चक्क एक कविता लिहिलीय माझ्या डायरीत. त्याचं लग्न झाल्यानंतरही काही दिवस तो आणि काकू आणि आम्ही एकत्रच राहायचो. पण ७९मध्ये तो चेंबूरला गेला होता राहायला. म्हणजे ही कविता तो कधीतरी रविवारचा आला असताना लिहिली असणार.
आणखी एका व्यक्तीचा उल्लेख आहे तो मृदुलाचा. आम्हाला सांभाळणाऱ्या ताई जिथे राहायच्या, ती मोठ्ठीच्या मोठ्ठी चाळ होती. ताईंचं घर तळमजल्यावर होतं, त्यामुळे आम्ही मुलं जेवण आणि अभ्यास वगळता बाहेरच उंडारत असायचो. जवळच मारुतीचं देऊळ होतं. ऊन असेल तर आम्ही देवळात बसून खेळायचो, काचापाणी हा तेव्हाचा अगदी आवडता खेळ होता. मृदुल शेजारच्या इमारतीत राहायची. माझ्याच वयाची. आम्ही बहुतेक तेव्हा एका शाळेत नव्हतो, तिसरीपासून एका शाळेत होतो इतकं नक्की. तिचंही घर तळमजल्यावर. त्यामुळे तिच्याकडे खेळायला गेले, किंवा ती आली अशी नोंद जवळजवळ एक दिवसाआड आहे. अजूनही आमची मैत्री टिकून आहे हं.
आई आॅफिसातनं लवकर आली, किंवा तिने पाकातल्या पुऱ्या केल्या, फ्रूटब्रेड आणला वगैरे नोंदी आहेत. आईने पाकातल्या पुऱ्या केलेल्या तिलाही आठवत नाहीयेत तर माझ्या लक्षात असायची गोष्टच सोडा. पण केल्या असणार हे नक्की.
रोजची एक नोंद आहे ती म्हणजे सहा वाजता उठले. सातची शाळा असायची. शाळा घराजवळ होती दुसरीपर्यंत. मग मी मोठ्या शाळेत गेले, गोखलेमध्ये. तीही सातची असायची, पण चालत जायला २० मिनिटं लागायची. बाबा रोज आम्हाला सोडायला यायचे, त्यांचं आम्ही कुठल्या जागी किती वाजता पोचतो याचं गणित ठरलेलं होतं. एकूणच त्यांचं घड्याळाशी फार सख्य होतं, जे माझंही आहे, अजूनही आहे.

यातली एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट वाटली ती शुद्धलेखन. आज मला ग्रामर नाझी म्हणून चिडवतात लोक, पण ते गुण लहानपणापासूनच होते असं दिसतंय. एक शब्द चुकीचा दिसतोय, पण तो सर्व पानांवर कायम आहे. प्रातरविधी हा तो शब्द. पण कदाचित सातव्या आठव्या वर्षापर्यंत हा शब्द वाचनात आला नसेल, त्यामुळे तो कसा लिहायचा ते पाहिलं नसेल, असं म्हणायला वाव आहे नै 😆

मी अलिकडे डायरी लिहिते रोज, दोनेक वर्षं झाली. पण त्यात जे घडेल ते, कोण भेटलं, लेकीला डब्यात काय दिलं, बिलं भरली, वगैरे. असं कायतरी नियमित केल्याचा आनंद माझ्यासाठी मोठा आहे.

Comments