काही मैफिली, पुस्तकं, गाणी, सिनेमे, नाटकं अशी असतात की ज्यांचा अनुभव अलगद तुमच्या पदरात पडतो, विनासायास. म्हणजे कधी एकदा हे पुस्तक मी वाचतेय, किंवा अमुक व्यक्तीचं गाणं ऐकतेय असं न हाेता. आहे बुवा असा एक कार्यक्रम, आहे एक पुस्तक, एक नाटक. चांगलं आहे. बघू मिळालं तर पाहू, वाचू. असाच एक प्रयोग होता, प्रिय भाई एक कविता हवी आहे. मुक्ता बर्वे हे एकमेव ओळखीचं नाव त्यातलं. बाकी मला तरी माहीत नसलेली. पण दोनतीन अगदी रसिक परिचितांकडून याची जबरदस्त शिफारस आली आणि मग कधी मुंबईत होतोय प्रयोग याची मी वाट पाहू लागले. मुक्ताच्या इन्स्टा पेजवर पुणे, सांगली वगैरे ठिकाणचे प्रयोग दिसत, अनेक लोक मुंबईत कधी अशी विचारणाही करत तिथे. अखेर इन्स्टावरच एक मे रोजी दीनानाथला प्रयोग आहे असं कळलं, लगेच बुक माय शो साइटवर तिकीट काढलं. काही मैत्रिणींना विचारलं होतं, पण कोणालाच जमणार नव्हतं. पण मला हा प्रयोग हुकवायचा नव्हता, एकटीने जायलाही आवडणारच होतं. मला सुनीताबाई, मराठी कविता इतके दोनच मुद्दे माहीत होते, मी याची परीक्षणं वगैरे वाचली नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष समोर काय येणारेय याची फारशी कल्पना नव्हती.
आज सकाळी साडेअकराच्या प्रयोगाला गेले ठरल्यानुसार. (Spoiler alert) तुम्ही हा पाहणार असाल तर पुढचं वाचायचं की नाही ते ठरवा. पण प्रयोगाला जरूर जा.
तर पुण्यातल्या एका रुग्णालयातल्या काही रसिक डाॅक्टरांना काही निमित्ताने एक विशिष्ट कविता हवी असते, आणि ती मिळवण्यासाठी ते सुनीताबाई आणि पुल यांच्यापर्यंत पोचतात. गोष्ट खरी घडलेली, १९९८मधली. त्यामुळे गूगलबाई मदतीला येण्यापूर्वीचा काळ. डाॅ. समीर कुलकर्णी यांनी पाचसहा वर्षांपूर्वी बहुधा लोकसत्तेत याविषयी लिहिलेलं वाचलं होतं ते प्रयोग पाहताना एकदम आठवलं. तेव्हा ते बऱ्यापैकी व्हायरल झालं होतं. या प्रयोगाची संहिताही त्यांचीच. प्रयोग नाटकासारखा नाही, कलाकारांच्या हातात कागद आहेत, पाठांतर नाही केलेलं. त्यात चढउतारही नाहीत फार. पण तरी विलक्षण नाट्य आहे.
इतक्या वर्षानंतर माझ्या हे लक्षात आलंय की मला एखादा सिनेमा, पुस्तक, नाटक आवडतं म्हणजे मला ते एका वेगळ्या प्रवासाला घेऊन जातं. त्यातल्या एखाद्या दृश्याच्या, शब्दाच्या साथीने मी बरीच कुठेकुठे फिरून येते. सहसा या आठवणी असतात, सुखद किंवा आज येत राहिल्या तशा दु:खद. मंजिरी, माझी मावसबहीण जी सव्वा महिन्यापूर्वी अचानक गेली, तिने मला हा कार्यक्रम नक्की पाहा सांगितलं होतं. यातली वृद्ध कोळ्याची कविता ऐकताना तीच डोळ्यांसमोर येत राहिली, आणि डोळे भरून आले. मंजिरीने तीन वेळा कर्करोगाचा सामना केला होता, ती गेली वेगळ्याच कारणाने. पण तरी ती कविता ऐकताना तिला काय वाटलं असेल याची मी सहज कल्पना करू शकले.
एरवी कविता हा माझा प्रांत नव्हे. म्हणजे कविता आवडत नाहीत असं नाही. अनेकदा अचानक समोर आलेल्या ओळींनी मी झपाटून गेलेही आहे. पण मी मुद्दाम तिच्या वाटेला जात नाही सहसा. कविता वाचू आज असं मला अजिबात वाटत नाही. पण तरी अनेक कविता आहेत ज्या मनाला भिडल्याही आहेत. आजच्या प्रयोगात ऐकलेल्या अनेक कविता आवडीच्या, ऐकलेल्याही. पण ही वृद्ध कोळ्याची प्रथमच ऐकली. आणि तिने मला घेरून टाकलं बराच वेळ.
माझ्या अशा विशेष आवडीचा नसलेला विषय, पण सुनीताबाईंसाठी तर कविता ही त्यांची कायम साथ असणारी, साथ देणारी जिवाभावाची सखी. डाॅ. कुलकर्णींना हवी असलेली कविता शोधतानाचे तीनचार दिवस पुल आणि सुनीताबाईंनी किती आनंदात काढले असतील, जुन्या पुस्तकांमध्ये ती शोधताना त्यांच्या स्मृतीची किती पानं चाळली असतील, याची कल्पना मी सहज करू शकते. सुनीताबाई डाॅ. कुलकर्णींना तसं स्पष्ट बोलूनही दाखवतात अखेरीस. मग तेव्हा नक्की वाटलं की यार आपल्याला कविता थोडी का होईना कळते, आपण त्यातलं सौंदर्य पाहू शकतो, हे भाग्यच म्हणायला हवं.
सलग पावणेदोन तास चालणाऱ्या या प्रयोगात मुक्ताने सुनीताबाई रंगवल्या आहेत. पण ते इतरही कोणी करू शकेल असं मला वाटलं. मला तिला कमी लेखायचं नाहीये, पण तिला यात फार वावच नाहीये. एकतर बराच वेळ चेहरा अंधारात आहे, मुखाभिनयाला फार वाव नाही, एका जागेवर बसून आहेत सगळेच कलाकार. आणि ती चाफ्याच्या झाडा वाचते तेव्हा सभागृहात एकाही व्यक्तीचे डोळे कोरडे राहण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे त्या अर्थाने म्हणत नाहीये. मुक्ताला यात मुख्य भूमिका आहे ती रसिक प्रेक्षकांना या प्रयोगाकडे वळवण्याची. निदान मी तरी ती आहे म्हणून प्रयोगाला गेले, अन्यथा शंकाच आहे गेले असते का. मग अर्थात एका उत्तम कार्यक्रमाला मुकले असते. आणि हे अनेक अशा प्रयोगांबाबत होत असावं. मग कोणीतरी शिफारस केली असली की वेळ काढून कार्यक्रमाला गेलेलं बरं, सहसा कार्यक्रम चांगला निघतो असा माझा आजवरचा अनुभव. नुकताच असा आणखी एक प्रयोग पाहिला, आमीर खुस्रोवरचा, दास्तानगोई प्रकारातला. तोही एका मैत्रिणीने सुचवलेला, आणि अतिशय प्रभावी. दीड तास कसा गेला ते कळलं नाहीच, पण गाणं आणि खुस्रोची गोष्ट कैक दिवस मनात रेंगाळत राहिली. आणि या कार्यक्रमाने आठवण करून दिली सुखनची. पाच गायक आज होते, एरवी सगळे नसतात असं कळलं. त्यातला एक जयदीप, सुखनचा महत्त्वाचा हिस्सा. अशी गंमतजंमत.
प्रिय भाई...च्या नेपथ्याबद्दल लिहायलाच हवं. श्याम भुतकरांनी ते केलं आहे. अगदी साधं पण चपखल. मागे दिसत राहणारी अप्रतिम चित्रं काढली आहेत मिलिंद मुळीक यांनी. त्या सगळ्याचा प्रयोगाच्या परिणामकारकतेत मोठा हात आहे.
असे छोटेमोठे कार्यक्रम होत असतात, होत राहायला हवेत. आपण ते पाहायला हवेत. असं मला आवर्जून वाटतं खरं. हा कार्यक्रम आठनऊ महिन्यांपूर्वी सुरू झालेला, आज पंचविसावा प्रयोग होता फक्त. त्यावरनं अंदाज येतो की हे कार्यक्रम सुरू ठेवणं किती आव्हानात्मक आहे.
लेख अनुभव मासिकात आला होता. जयदीप वैद्य सुखन मध्ये आहे. असो. छान लिहिले आहेस.
ReplyDeleteधन्यवाद. तुमचं नाव कळेल का?
Delete