माहेरची ओढ

लोकलमधून प्रवास करताना दोन मैत्रिणींचा संवाद कानावर आला. एक जण दुसरीला सांगत होती, आम्ही पुढच्या महिन्यात साताऱयाला जाणार आहोत, अमुकएक देवाला. लगेच दुसरी म्हणाली, अय्या, तुम्ही माझ्या आईच्या गावी जाणार. त्या देवळापासनं माझ्या आईचं घर अगदी जवळ आहे. नक्की जा तिच्याकडे, खरंच घर खूप जवळ आहे. ही दुसरी गरोदर होती नि दोन महिन्यांनंतर बाळंतपणासाठी माहेरी जाणारच होती. तरीही तिला आपली मैत्रीण त्याच गावाला जाणार आहे आणि आपण इकडेच असू, अशी खंत वाटत होती, जी तिच्या बोलण्यातून अगदी स्पष्टपणे मला जाणवली.

काय असते ही माहेरची ओढ? अजूनही शहरातल्या तथाकथित मॉडर्न म्हणवणाऱया मुलींनाही वाटते का ती? एकुलत्या एक मुली, आईवडील जवळच राहत असतात बऱयाचदा. म्हणून माहेरी दोनतीन दिवस वस्तीला राहाणं काही होत नाही. त्यांनाही वाटतं का आईकडे जावं असं? की आधुनिक जगात ही ओढ कमी झाली आहे? मोबाइलमुळे मायलेकींमधलं अंतर कमी झालं आहे. स्काइपच्या माध्यमातून बोलताना तर संगणकाच्या पडद्यावर समोर व्यक्ती दिसते. त्यामुळे उराउरी भेट कधीतरी होत असली तरी संगणकावरची भेट कधीही होऊ शकणारी असते. अशा प्रगत संवादमाध्यमांमुळे प्रत्यक्ष भेटीची ओढ कमी होत असेल का? की जिवाची कासाविशी मायलेकींमधल्या प्रत्यक्ष अंतरावर अवलंबून असते? आई जितकी जवळ तितकी तिला भेटायची ओढ कमी असं काहीतरी गणित असावं. आणि तिच्याकडे जाऊन राहण्याची मजाही ती दूर असेल तर जास्त येते. म्हणजे रात्रभराचा प्रवास करून जावं लागत असेल तर किमान आठ दिवस तरी राहता येतं ना. तासाभराचा प्रवास असेल तर सकाळी जाऊन संध्याकाळी घरी परत, असंच जास्त होतं.

पण एक नक्की, मुलीला कमीजास्त वाटत असलं तरी आईला मात्र तिने नेहमी यावं, असंच वाटत असतं. लग्नाला कितीही वर्षं झालेली असली, तरी मुलगी माहेरहून सासरी निघताना आईच्या डोळय़ांत पाणी येतंच. कशामुळे बरं?

Comments