Follow by Email

Tuesday, 28 March 2017

लोकप्रियतेची उतरती भाजणी?

अंतर्नाद एप्रिल २०१७.
डोंबिवलीतल्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नुकताच समारोप झालाय. सात फेब्रुवारीच्या अंकात बहुतेक वर्तमानपत्रांनी संमेलनाला झोडपणारे अग्रलेख लिहिले आहेत. या संमेलनाचं ठळक वैशिष्ट्य हेच म्हणता येईल की, त्यात एकही वैशिष्ट्यपूर्ण, जिच्याबद्दल ठळकपणे बोलावं/लिहावं अशी घटना घडली नाही. ना कोणी वादग्रस्त विधानं केली, ना कोणती मुलाखत गाजली, ना कोणती चर्चा रंगली. खुद्द डोंबिवलीत नसल्या तरी राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री वगळता इतर राजकारण्यांनीही संमेलनाकडे पाठ फिरवली, त्याने बातमी मिळायची शक्यता अाणखीच खाली गेली. डाॅ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षीय भाषणातही बातमीमूल्य तर सोडाच आवर्जून वाचावा, वाचायची शिफारस करावा, असा एकही मुद्दा नव्हता. त्यांच्या समारोपाच्या भाषणाची बातमी करतानाही एक परिच्छेद कसाबसा जमवावा लागला, यातच सारं आलं.

संमेलनाकडे लोकांनी पाठ फिरवली होती असंही म्हणता येत नाही, कारण गर्दी तर होती. रोज संध्याकाळी सेल्फी, फोटो काढणारे शेकडो लोक मुख्य मंडपाबाहेर दिसत होते. मुख्य मंडप होताच इतका अवाढव्य की, तो भरणं मराठी साहित्य संमेलनात अशक्य. त्यामुळे बऱ्यापैकी लोक असूनही तो रिकामाच वाटत होता बापडा. बाजूच्या दोन मंडपांमध्ये अहोरात्र कविकट्टा सुरू होता, त्यातही अनेक लोक होते. जेवायच्या मांडवात तर कायम गर्दी होती. मग ही माणसं नक्की कशासाठी संमेलनस्थळी आली होती? कारण ग्रंथदालनातही तुरळकच माणसं होती, शनिवार व रविवार संध्याकाळ वगळता तो परिसर ओसाड आणि केविलवाणा दिसत होता.

सासवडला तीन वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाला मी उत्सुकता म्हणून गेले होते. तिथे ग्रंथप्रदर्शनात अतोनात गर्दी होती, परंतु स्टाॅल्स छोटे होते, दोन रांगांमधली जागा अतिशय निमुळती होती, रचना चुकीची होती. आणि तिथे धुळीचं साम्राज्य होतं. परिस्थिती मला इतकी धोकादायक वाटली होती की, सुरुवातीचे पाचसहा स्टाॅल्स पाहून पळ काढला होता. पिंपरी, सासवड आणि त्यापुढच्या वर्षी चिपळूण या संमेलनांमध्ये पुस्तकांची विक्रमी विक्री झाली होती. पण डाेंबिवलीत बहुतांश प्रकाशकांच्या अपेक्षेपेक्षा कमीच विक्री झाल्याचं कळतं.

काँटिनेंटल प्रकाशनच्या देवयानी अभ्यंकर यांनी हे कोडं उलगडून ठेवायचा प्रयत्न केला. जाहिरात जशी उत्पादनांसाठी महत्त्वाची असते, तशीच ती संमेलनासाठी असते, हे आयोजकांना कळलं नसावं, असं त्या म्हणाल्या. आम्ही पुण्याहून येताना डोंबिवलीत शिरल्यानंतर दोनतीन मराठी माणसांना संमेलनाच्या इथे कसं जायचं, असं विचारलं तर त्यांनीच आम्हाला विचारलं, कसलं संमेलन. डोंबिवलीतल्याच लाेकांना संमेलन आहे हे माहीत नाही, तर इतरांना कुठून कळणार. शहरात कुठेही पोस्टर्स, जाहिराती, फ्लेक्स नव्हते संमेलनाबद्दल माहिती देणारे. मग लोक येणार तरी कसे?

मी रेल्वेने डोंबिवलीला गेले. शुक्रवारी स्थानकात उतरले तेव्हा एखादा स्वागताचा फलक दिसतो का, ते पाहात होते. परंतु या परिसरात संमेलनासारखा काही कार्यक्रम होतोय याचं एकही चिन्ह स्थानकात नव्हतं. पूर्वेकडे बाहेर पडल्यावर रिक्षा पकडली. म्हटलं, संमेलनाच्या इकडे जायचंय.

रिक्षावाला उत्तर भारतीय होता, तो एकदम उद्गारला, हँ?

म्हटलं, सावित्रीबाई फुले आॅडिटोरियम के यहाँ.

क्या हो रहा है वहाँ?

मराठी किताबों का मेला है.

हाँ तभी. सुबह यहाँ बहुत से बच्चे थे, पूरा जाम लगा हुआ था. कल भी होगा क्या?

संमेलनस्थळाच्या अर्धा किमी आधी घर्डा चौक आहे, त्याच्या जरा आधी एक कमान दिसली संमेलनाला येणाऱ्यांचं स्वागत करणारी. घर्डा चौकात रांगोळी होती काढलेली संस्कारभारतीची. बाकी या अडीचेक किमी रस्त्यावर, संमेलन आहे, याची एकही खूण नव्हती.

पी. सावळाराम क्रीडा संकुलातलं मैदान आणि शेजारीच असलेल्या सावित्रीबाई फुले रंगमंदिरात संमेलन भरलं होतं. या स्थळाचं नामकरण पु.भा. भावे साहित्य नगरी असं करण्यात आलं होतं. मैदानात मुख्य शं.ना. नवरे सभामंडप प्रचंड मोठा होता. मधोमध भव्य व्यासपीठ, समोर मोकळी जागा, मग टीव्ही कॅमेऱ्यांसाठी मंच, आणि बसायची व्यवस्था. व्यासपीठाच्या डाव्या हाताला पत्रकारांची बसायची सोय आणि त्यामागेच त्यांच्यासाठी कक्ष होता. या कक्षाला डोंबिवलीकर दिवंगत ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत टोळ यांचं नाव देण्याचं औचित्य दाखवलेलं होतं. महाराष्ट्र टाइम्समध्ये नोकरी करत असताना टोळ यांच्या बातम्या अनेकदा एडिट केल्या होत्या, ते आठवलं. आयोजकांतर्फे पत्रकारांसाठी वायफायची सोय होती, परंतु मला तरी ते अनेकदा प्रयत्न करून एकदाही कनेक्ट झालं नाही.

दुपारी चार वाजता उद्घाटन होतं. मुख्यमंत्री येणार असल्याने ते उशिरा सुरू होईल याची कल्पना सर्वांनाच होती. शरद पवारांचंही नाव पत्रिकेत छापलेलं होतं, परंतु ते आलेच नाहीत. अखेर पाच वाजता कार्यक्र सुरू झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी संमेलन भरवण्यामागची भूमिका मांडली. 'महात्मा जोतिबा फुले यांनी गेल्या शतकात म्हटलं होतं, पददलितांना कंठ फुटला पाहिजे, त्यांच्या आवाजाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, संमेलन हे मूठभर सांस्कृतिक वर्चस्ववाद्यांच्या हातात न राहावे. हे संमेलन आगरी यूथ फोरमने आयोजिल्याने जोतिबांचं स्वप्न फलद्रुप झालंय,' असा दावा त्यांनी केला. जोशींनी एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडला. 'दाक्षिणात्य लोक भाषेच्या बाबतीत जसे जागृत असतात, भाषिक अस्मितेसाठी ते लढायला तयार असतात, तसा मराठी भाषकाचा राज्यकर्त्यांवर दबाव नाही, सामान्य माणसाला मराठी भाषेची चिंता वाटत नाही,' असं ते म्हणाले. 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी दिल्लीत जंतरमंतरवर धरणं धरायला आम्ही तयार आहोत, तुम्ही फक्त पुढे व्हा,' असं ते मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले. 'महागाईमुळे संमेलनं आयोजित करणं कठीण झालं आहे. राज्य सरकारने एक कोटी रुपये आयोजकांना दिले, तर आयोजक वरचे पन्नास लाख वा एक कोटी रुपये उभे करू शकतात,' असंही ते म्हणाले. त्यांच्या या म्हणण्याचा प्रत्यय संमेलन संपताना आलाच, पुढच्या संमेलनासाठी कोणतीही संस्था पुढे आलेली नाही.

मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्न व सीमाप्रांतातील मराठी जनांवरचा अन्याय, अभिजात भाषेचा दर्जा, महाराष्ट्राचं विभाजन, दाभोळकरपानसरेकलबुर्गी हत्या, असे सगळे मुद्दे घेऊन आवेशपूर्ण भाषण केलं. सांस्कृतिक दहशतवादाचा मी निषेध करतो, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. अर्थात मुख्यमंत्र्यांनी त्याकडे तितकंच ठणकावून दुर्लक्ष केलं.

प्रख्यात हिंदी साहित्यिक विष्णू खरे यांचं भाषण चांगलं रंगलं. 'हिंदी साहित्यात नागपूर महत्त्वाचं आहे, कारण गजानन माधव मुक्तिबोध तिथे होते. त्यांना आम्ही हिंदीचा शीर्षपुरुष मानतो. त्यांची यंदा जन्मशताब्दी आहे, त्या निमित्ताने त्यांचा पुतळा उभारा किंवा एखादं चर्चासत्र आयोजित करा,' अशी आग्रही सूचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. याही सूचनेवर कोणतेही भाष्य करण्याचे फडणविसांनी टाळले. (आचारसंहिता?) खरे यांनी सांगितलं की, '१८९०मधल्या चार हिंदी नाटकांचा शोध त्यांना काही वर्षांपूर्वी लागला, त्यातले ८० टक्के संवाद मराठीत आहेत.' 'मध्य प्रदेशात आम्ही वैतागलो आहोत, विदर्भ स्वतंत्र होईल, तेव्हा आम्हाला (खरे छिंदवाडा प्रांतात राहतात) त्यात जोडून घ्या,' अशी विनंतीही त्यांनी केली.

भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर हे मोठे कादंबरीकार आहेत, नोबेलच्या लायकीचे आहेत, पण जागतिक पातळीवर त्यांना कोणी ओळखत नाही, कारण त्यांचे अनुवाद परकीय भाषांमध्ये झालेले नाहीत. यासाठी अनुवाद अकादमी स्थापन करायला हवी, अशी महत्त्वाची मागणी त्यांनी केली. खरे यांनीही लेखक सुरक्षित आहे का, त्याला त्याच्या विचारांमुळे मारपीट तर होत नाही, त्याचं तोंड तर कोणी काळं फासत नाहीये, हे प्रश्न उपस्थित केले आणि सरकारप्रमाणेच वाचकांवरही ही जबाबदारी असल्याचं विधान केलं. नुसतं पुस्तक वाचून एंजाॅय करून उपयोग नाही, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेची ढाल पुढे करून फार काही बोलणं टाळलं. 'मला यायला मिळालं, याचाच आनंद होतोय,' एवढंच ते म्हणाले. 'पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर डोंबिवली ही उपराजधानी आहे,' असं ते म्हणाले. (पण मग पार्ल्याचं काय, असा प्रश्न मला पडला!)

दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीबाई फुले रंगमंदिरात पहिला परिसंवाद अध्यक्षीय भाषणावरील चर्चेचा होता. सकाळी नऊला सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी दहा वाजेपर्यंत फक्त पंचवीसेक रसिक उपस्थित होते. यथावकाश आयोजक, स्वयंसेवक आले व व्यासपीठावर फक्त खुर्च्या मांडून चर्चेला सुरुवात झाली. (हीच गत मुख्य मंडपातही होती, उद्योजक जयंत म्हैसकर यांची मुलाखत दीड तास उशिरा सुरू झाली.) या चर्चेत पत्रकार विजय चोरमारे, मराठीचे प्राध्यापक अनिल नितनवरे, नागपूरचे प्रदीप दाते, रामचंद्र काळुंखे व अंतर्नादचे संपादक भानु काळे सहभागी झाले होते. बदलापूरचे ग्रंथप्रेमी श्याम जोशी यांनी प्रत्येक वक्त्याच्या बोलण्याचा धागा पकडून चर्चा उत्तमपणे पुढे नेली. (साहित्य आणि समाज एकमेकांपासून दूर गेलेत असा सूर या परिसंवादात लागलाच, परंतु त्यानंतर झालेल्या बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन आणि मराठी लेखन या परिसंवादातही असंच निरीक्षण वक्त्यांनी मांडलं.) 'काळे यांचं भाषण मेंदूला आवाहन करणारं आहे, त्यात वाङ्मयीन प्रश्नांची चिकित्सा आहे, ते प्रांजळ, वस्तुनिष्ठ आहे,' असं मत भंडारा येथील मराठीचे प्राध्यापक अनिल नितनवरे यांनी मांडलं. 'इंग्रजीचे पाय न तोडता मराठीची उंची का वाढवता येणार नाही,' या काळे यांच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. पत्रकार विजय चोरमारे यांनी मात्र या भाषणात आजच्या लेखक वा कलाकृतींचा काही संदर्भ नाही, त्यात कोणतीही जोखीम घेतलेली नाही, अशी टीका केली. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल काहीच भाष्य नाही, आजच्या जगण्यासंदर्भात काही चर्चा नाही, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून अधिक समाजस्पर्शी भाषणाची अपेक्षा असते,' असंही ते म्हणाले.

भानु काळे यांनी या भाषणाच्या निमित्ताने एकूणच मराठी साहित्य व्यवहाराबद्दल भाष्य केले. मराठी आपण कशी वापरतो, राज्यकर्त्यांनी किती महत्त्वाची वाटते, परिवर्तन घडवून आणण्याची यंत्रणा, आदि मुद्दे त्यांनी उपस्थित केले. Vanity publishing स्वयंप्रकाशित साहित्य मोठ्या प्रमाणावर बाहेर येतंय, ते घाईघाईत प्रकाशित केलेलं असतं, त्यामागे कोणतीही मेहनत नसते, त्यामुळे चांगल्या पुस्तकांचं प्रमाण कमी आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. मुद्रितशोधनाकडे होत असलेलं दुर्लक्ष हा त्यांनी मांडलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. सध्या जे काही मुद्रितशोधन होतं, त्याचा दर्जा केविलवाणा असतो. या कामाला मूल्य नाही, त्यामुळे बुद्धिमान तरुण या मार्गाला येतच नाहीत. हा अर्थकारणाचा साहित्यावरचा परिणाम बोलला जात नाही. काळे यांनी या वेळी मॅकाॅले या इंग्रज विचारवंताच्या एका निबंधातलं वाक्य उद्धृत केलं. Poetry necessarily declines as civilisation advances. Sense of wonder, sense of awe reduces. जसजशी वैज्ञानिक प्रगती होत जाते, कुतूहल शमत जातं तसा रोमान्स कमी होत जातो, असं हे विधान आहे. आपल्याला राेजच्या जीवनात हे नेहमीच जाणवत राहातं, असं मला प्रकर्षाने वाटलं. कथा, ललित, प्रवासवर्णन हे वाङ्मयप्रकार कमी होत चाललेत, ते हळुहळू कालबाह्य होत जातील, अशी भीती त्यांनी या वेळी व्यक्त केली. चिरंतन प्रश्नांची उत्तरं साहित्यातून मिळायला हवीत, असं ते म्हणाले.

अर्थकारणाचा साहित्याशी संबंध उरलेला नाही, असा एका परिसंवादाचा साधारण सूर होता. पैशांविषयी न बोलणं अप्रामाणिक ठरेल, असं एक वक्ते यमाजी मालकर यांनी सुरुवातीलाच म्हणून टाकलं. 'दारिद्र्याचं वर्णन करणारं तेच चांगलं लेखन असा समज आपल्याकडे आजही आहे, परंतु बहुतांश वाचकांना भौतिक सुखाची आस लागलेली असताना असं लिखाण योग्य वाटत नाही,' असं ते म्हणाले. धडधाकट गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती हे शिकवणाऱ्या शालेय धड्यांनी भारताचं मोठं नुकसान केलं, अशा अर्थाचं पुलंचं वाक्य मला आठवलं ते ऐकल्यावर. चंद्रशेखर टिळक, सारंग दर्शने, श्रीकांत बारहाते या परिसंवादातील वक्ते होते, परंतु मुख्य आकर्षण होते अर्थक्रांतीचे अनिल बोकील. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य माणसाला चांगलेच ठाऊक झालेले बोकील बोलायला उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. बारहाते यांचा अर्थकारणासोबतच इंग्रजी साहित्याचा अभ्यास आहे. कोणत्याही साहित्याचं मोजमाप आशयघनता, चिरंतनता आणि निरंतरता या पट्ट्यांनी करायला हवं, असा मुद्दा त्यांनी मांडला. परंतु, दुर्दैवानं त्यांचं बरंचसं बोलणं माझ्या डोक्यावरून गेलं. दर्शने यांनी मराठी साहित्याचा अर्थकारणाशी संबंध नव्हताच, असं मत मांडलं. अर्थकारणाचे पडसाद मराठी साहित्यात फार विरळा, वीसपंचवीस वर्षांपूर्वी अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं, पण याचं प्रतिबिंब फारच कमी लेखनात दिसून येतं, असं ते म्हणाले. बोिकलांनी जीविका आणि उपजीविका यांमधला फरक, उपजीविकेसाठी सध्याची होणारी फरपट, श्रममूल्यापेक्षा बौद्धिक मूल्याला आलेलं महत्त्व, असे काही मुद्दे मांडले. प्रत्येक चोचीसाठी दाणा आहे, हा assurance निसर्गाने दिलेला असताना आपण insurance च्या मागे लागलोय, अशी टिप्पणी त्यांनी केली. कागदी नोट मानवी आयुष्य गुंडाळून टाकू लागली आहे, असं ते म्हणाले. त्यांच्या बोलण्यात भावनिक आवाहन होतं, परंतु मला ते काहीसं naive, युटोपियन, प्राथमिक स्वरूपाचं वाटलं.

ग्रामीण स्त्री, वास्तावातील आणि साहित्यातील असा एक परिसंवादही मी ऐकला. साताऱ्यातील कथालेखक राजेंद्र माने, जे डाॅक्टरही आहेत, ते म्हणाले की, 'डाॅक्टर म्हणून काम करताना स्त्रीचे वेगवेगळे अनुभव येतात आणि ते लिखाणात उतरतात. मुलींना शेतकरी नवरा नको, हे सध्याचं वास्तव आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं वय साधारणपणे २५ ते ३५ असल्याचं निरीक्षण मांडत ते म्हणाले, या शेतकऱ्यांच्या तरुण पत्नींची काय अवस्था होत असेल, त्या कसं जगण्याला तोंड देत असतील, हे साहित्यात यायला हवं.' पुरुष पुढे जातोय, पण स्त्रिया अजून तिथेच आहेत, प्रत्येक स्त्रीचं शोषण हाेतंच, असं मत प्रा. ईश्वर नंदपुरे यांनी व्यक्त केलं. साहित्याने पुस्तकांच्या बाहेर यावं, असं ते म्हणाले.

साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व या विषयावरचा परिसंवाद बऱ्यापैकी रंगला. समन्वयक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी साहित्यिकांच्या वतीने प्रसिद्धीमाध्यमं, विशेषकरून वृत्तवाहिन्यांवर, आरोप केला की, माध्यमं मराठी साहित्याकडे दुर्लक्ष करतात, वृत्तपत्रांनी संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणाची हेडलाइन न करता मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची केली, वगैरे. साम टीव्हीचे संजय आवटे यांनी माध्यमांच्या वतीने त्यांना उत्तर दिलं. 'आमचे मुख्यमंत्री १२ कोटी जनतेचे प्रतिनिधी असतात, तुमचे अध्यक्ष किती जणांचं प्रतिनिधित्व करतात,' असा सवाल त्यांनी केला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो त्यांनी रवींद्र यांच्या आरोपांनंतरही केला होता. मला या उपस्थितांची गंमत वाटली. 'साहित्याच्या नावाखाली काहीही छापलं जातं, कवितासंग्रह छापायला कोणीही तयार होत नाही, तो छापला तर विक्रीसाठी कोणी तयार नसतं, हे अधिक धोकादायक आहे,' असंही आवटे म्हणाले. ज्येष्ठ लेखक रा.रं. बोराडे यांनी या वेळी आरक्षण वा जातिव्यवस्था साहित्य उद्ध्वस्त करतेय की काय, अशी भीती व्यक्त केली. लेखक आपापल्या जातींचे होऊन बसलेत, ते लेखकांनाही ते भूषण वाटतं. जातिव्यवस्थेचा हा परिणाम भीषण आहे, असं ते म्हणाले.

रविवारी सकाळी मुख्य मंडपात झालेलं प्रतिभायन हे सत्र संमेलनातील एक रंगलेलं सत्र म्हणावं लागेल. पाॅप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, लेखक अच्युत गोडबोले आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांच्याशी वंदना बोकील कुलकर्णी यांनी गप्पा मारल्या. भटकळ लेखक, प्रकाशक आहेतच, परंतु ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतज्ज्ञही आहेत, मैफलीत गातात व शिकवतातही, हे अनेकांना या कार्यक्रमाद्वारे पहिल्यांदाच कळलं. गोडबोले आयआयटी, अमेरिका, आयटीतली नोकरी सोडून आता पूर्णवेळ लिखाण करतात. आणि मेधाताईंच्या आत एक संवेदनशील कवयित्री दडलेली आहे. असे हे तीन प्रतिभावंत. भटकळांनी सुरुवातीला कुलकर्णी यांना विनंती केली की, मेधाताईंना त्यांनी जास्त बोलतं करावं, त्या अशा प्रकारच्या मंचावर फार कमी वेळा असतात. मेधाताईंनी यानंतर त्यांच्या काही कविता सादर केल्या. ते ऐकणं हा वेगळाच अनुभव होता. आंदोलनं, निदर्शनांमध्ये घोषणा देऊन, भाषणं करून काहीसा खरखरीत झालेला आवाज, इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर आलेला थकवा, थोडी निराशा, आणि तरीही असलेला दुर्दम्य उत्साह असं मिश्रण मेधाताईंमध्ये आहे. 'इतकं काम आहे समोर की, रोजचा व्यायाम झाला तरी ठीक असं वाटतं. कविता आणि आयुष्यच हरवून गेलंय. कवितासंग्रह वगैरे काढणं ही तशी लक्झुरीच वाटते त्यामुळे. रोज तीसचाळीस पानं तर लिहिली जातात अजूनही, मग ते एफआयअार असतील, वा अॅफिडेव्हिट, वा संपादकीय. हातपाय थकले की, कवितांकडे लक्ष देईन,' असं त्या म्हणाल्या. कविता म्हणताना आलेला आवंढा दाबत त्या पुढे जात, पण त्यांना असं पाहणं माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता.

भटकळांनी ते शिकले त्या तीन विद्यापीठांचा उल्लेख केला, तो मजेशीर आहे. एक म्हणजे लेखक विद्यापीठ. ज्या लेखकांची पुस्तकं पाॅप्युलरने काढली त्या लेखकांकडून भटकळ खूप काही शिकले, म्हणून हे विद्यापीठ. दुसरं, कँटीन विद्यापीठ. काॅलेजच्या वर्गात मी कमीच शिकलो, पण कँटीनमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या विद्यार्थ्यांशी मारलेल्या गप्पांमधून खूप काही शिकता आलं. आणि तिसरं, काॅरिडाॅर विद्यापीठ. कविवर्य शंकर वैद्य मराठी शिकवत, पण भटकळांचा तो विषय नव्हता. वैद्यांना हे माहीत होतं की, भटकळांना कविता आवडते. मग ते काॅरिडाॅरमध्ये भेटले तरी कविता ऐकवत, कवितेविषयी बोलत. असं हे काॅरिडाॅर विद्यापीठ.

सुमारे तासभर उशिरा सुरू झालेल्या या परिसंवादाच्या शेवटी मेधाताई म्हणाल्या, 'आजचं साहित्य आणि वेगवेगळी आंदोलनं यांचा संबंध तुटत चाललाय.' नर्मदा बचाव आंदोलनाबद्दल अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी पूर्वी लिहिलं, याची त्यांनी आठवण करून दिली.

रविवारी सकाळी ज्येष्ठ वैज्ञानिक व लेखक डाॅ. जयंत नारळीकर व चित्रकार बाळ ठाकूर यांचा मुख्य मंडपात सत्कार करण्यात आला. बाळ ठाकूरांचा सत्कार वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला हवा कारण, अशा चित्रकारांची दखल साहित्य संमेलनाने घेणं महत्त्वाचं व दुर्मीळ. परंतु त्या वेळी मला उपस्थित राहता आलं नाही, मी तेव्हा ग्रंथदालनात ज्योत्स्ना प्रकाशनच्या स्टाॅलवर लेखक माधुरी पुरंदरे यांच्याशी गप्पा मारत होते.

माधुरी पुरंदरे यांची अनेक पुस्तकं ज्योत्स्नाने प्रकाशित केली आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सोपी समकालीन भाषा, तुमच्याआमच्या घरांमध्ये सापडतील अशी पात्रं आणि सोबतची आकर्षक चित्रं, तीही पुरंदरे यांनीच चितारलेली. राधाचं घर हा पुरंदरे यांच्या सहा छोट्या पुस्तकांचा संच पंधराएक वर्षांपूर्वी प्रथम प्रसिद्ध झाला. राधा, आईबाबा, अाजीआजोबा, काका आणि भाऊ तन्मय अशी यातली पात्रं. राधा वगळता इतर पात्रांचं प्रत्येकी एक पुस्तक. वीतभर लांबीरुंदीचं. सुरुवातीला ही पुस्तकं कृष्णधवल होती, आता ती रंगीत आहेत. दाेनअडीच वर्षांच्या मुलांना ही पुस्तकं वाचून दाखवली तर त्यांना ती अितशय भिडतात, हा स्वानुभव. प्रत्यक्ष अक्षरओळख नसली तरी चित्रावरनं कोणतं पुस्तक ते ओळखता येतं या लेकरांना. आणि आतले शब्दही स्मरणशक्तीच्या जोरावर वाचता येतात. पुरंदरे यांना भेटायला असे अनेक पालक आले होते, ज्यांची मुलं ही पुस्तकं वाचत मोठी झालीत किंवा आता वाचत आहेत. एक आई होती, तिचा मुलगा एमफार्म करत होता. 'पुरंदरेंची स्वाक्षरी घेऊन येच,' असं त्याने आईला सांगितलं होतं. एक पाचवीतली चिमुकली होती, सुक्षा क्षीरसागर. तिचा उत्साही बाबा मकरंद तिला मुलुंडहून घेऊन आला होता, कारण तिच्याकडे पुरंदरेंची सगळी पुस्तकं होती आणि त्या भेटणार म्हटल्यावर ती अतिशय आनंदात होती. आणखी एक छोटुकली होती रेवा. तीही राधाची फॅन. पुस्तकविक्रीचा व्यवसाय करणारे मयूरेश गद्रे सांगत होते, 'त्यांच्या मुलाने मामाला मुलगा झाला तेव्हा तन्मय नाव ठेवायचा हट्ट केला होता.' हे ऐकल्यावर पुरंदरेंनी सांगितलं की, 'लेखक नंदा खरे यांच्या नातीनं लहान बहीण झाल्यावर तिचं नाव राधा ठेवायला लावलं होतं.' एक छोट्या होता ज्याला काकाचं पुस्तक अजिबात म्हणजे अजिबात आवडत नव्हतं, ते घरीसुद्धा नको होतं त्याला. पुरंदरे पाचसहा तास स्टाॅलवर होत्या, आणि सतत कोणी ना कोणी त्यांच्याकडे स्वाक्षरी घ्यायला येतच होतं. पुस्तकं वाचणाऱ्या या लहानग्यांना पाहून मजा वाटली. आणि थोडं छानही वाटलं. पुस्तकं आणि लेखक यांच्याबद्दलचं कुतूहल, आवड, प्रेम हे सगळं दिसलं या स्टाॅलवर.

आता थोडं पुस्तकं आणि विक्रीविषयी कारण ग्रंथप्रदर्शन हे साहित्य संमेलनाचा महत्त्वाचा घटक असतो.

मुख्य मंडपाच्या उजव्या बाजूला ग्रंथदालन होतं, त्याला रा. चिं. ढेरे ग्रंथग्राम असं नाव देण्यात आलं होतं. स्टाॅल्सची रचना दाटीवाटी होणार नाही, खूप जास्त माणसं एका वेळी आली तरी सहज फिरू शकतील अशी होती. जमिनीवर गालिचा होता, त्यामुळे धुळीचा प्रश्न नव्हता. पंखे होते. मांडव बंदिस्त असल्याने जरा उकडत होतं एवढंच. आणि तरीही माणसं मात्र नव्हती. गेल्या चारपाच संमेलनांच्या तुलनेत सर्वात कमी विक्री यंदा झाल्याचे ज्योत्स्ना प्रकाशनचे विकास परांजपे यांनी सांगितले. 'सासवड, चिपळूण येथे विक्रमी विक्री झाली होती. जेवायला जाण्याची उसंत तीन दिवस मिळाली नव्हती, मधल्या माणसांच्या गर्दीमुळे समोरचा स्टाॅल दिसत नव्हता. पण डोंबिवलीत शुक्रवार व शनिवार फारच कमी लोक स्टाॅल्सकडे फिरकले. जी काही विक्री झाली ती रविवारी,' असे ते म्हणाले. 'डोंबिवलीत संमेलन असल्याने अगदी मुंबईतील नाही तरी ठाण्यापासून बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यातील मराठी वाचक पुस्तकं खरेदीला येतील, अशी अपेक्षा होती, परंतु आमची निराशा झाली,' असे परांजपे यांनी सांगितले.

परंतु, रोहन, ज्योत्स्ना, मौज, राजहंस व काँटिनेंटल या पाच प्रकाशनांनी एकत्र येऊन निर्माण केलेले मराठी रीडर हे अॅप तीन दिवसांत जवळपास हजार रसिकांनी डाउनलोड केल्याचे रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले. त्यांच्या स्वतंत्र स्टाॅलवर या अॅपविषयीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. या अॅपवर सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांची संख्या शंभरहून कमी असली तरी हळुहळू वाढवण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

ग्रंथदालनाला एकच प्रवेशद्वार असल्याने सुरुवातीच्या काही स्टाॅल्सवर जास्त गर्दी होती, बहुतांश रसिक आतल्या स्टाॅल्सपर्यंत पोचलेच नाहीत, असे मॅजेस्टिक प्रकाशनचे आशय कोठावळे यांनी सांगितले. मॅजेस्टिकचा स्टाॅल सुरुवातीलाच होता, तरीही आमच्या अपेक्षेपेक्षा विक्री बरीच कमी झाल्याचे कोठावळे म्हणाले. रोहन चंपानेरकर यांनीही विक्री कमी झाल्याला दुजोरा दिला. अपेक्षेपेक्षा तीस टक्के तरी विक्री कमी झाली, असे त्यांनी सांगितले. रोहन प्रकाशनचा स्टाॅलही प्रवेशद्वारापासून फार लांब नव्हता. पुस्तकविक्री कमी होण्याला कदाचित हेही कारण असेल की, डोंबिवलीतील बहुतांश माणसं नोकरीसाठी मुंबईत किंवा ठाण्यात येत असतात. मुंबई आणि ठाण्यात पुस्तकं मिळण्याची चांगली सोय आहे, त्यामुळे चंद्रपूर, चिपळूण किंवा सासवडसारखे इथले रसिक पुस्तकांचे भुकेले नव्हते.

ज्याचं नाव ऐकून रसिक धावत येतील, नक्की येतील, अशा खणखणीत वक्त्यांचा अभाव आणि अपुरी जाहिरात ही संमेलन फिकं पडण्याची कारणं असावीत, असा अंदाज बांधता येतो. विषयांमध्येही फारसं नावीन्य दिसलं नाही. जिथे विषय नवीन होते तिथे बोलणारी नावं तीच होती. तासभर चालणाऱ्या परिसंवादात समन्वयकासह सहा वक्ते असले की कोणालाच धड बोलायला वेळ पुरत नाही. किंवा एखादाच वक्ता इतकं बोलतो की, इतरांकडे बोलण्याजोगं काही उरत नाही. युवकांसाठी एक सत्र होतं विशेष, ज्याचा समन्वयक अभिनेता सुबोध भावे होता. सुबोध खरं तर आबालवृद्धांचा लाडका, त्याचा फुगे सिनेमाही येऊ घातलाय. तरीही या सत्राला फार गर्दी नव्हती. बाकी अनेक अभिनेत्यांना तर निमंत्रणच नव्हतं, अशा अर्थाच्या बातम्या आपण वाचल्याच आहेत. जयपूर फेस्टिवलमध्ये जशी बहुतेक सत्रं पुस्तकाभोवती फिरणारी असतात, तशी कल्पना मराठीतही रुजवायला हवी, असं प्रकर्षाने वाटतंय. म्हणजे त्या पुस्तकाची जाहिरातही होते, आणि लेखकाची व त्या विषयाची अधिक ओळख होते. गेल्या वर्षी नोव्हेेंबरमध्ये नाशकात दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवल झाला, त्यात काही सत्रं अशी होती, ज्यात हिंदी, मराठी व इंग्रजी लेखकांचा समावेश होता. आमिष, अाश्विन सांघी, आनंद नीळकंठन, विकास सिंग, व इतर काही हिंदी लेखकांना ऐकणं, त्यांच्या पुस्तकांबद्दल जाणून घेणं हा अतिशय समृद्ध करणारा अनुभव होता. मराठी वाचकांना ही चांगली संधी होती आणि फेस्टिवलला चांगली गर्दीही होती.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या उतरत्या भाजणीला सुरुवात झालीय की काय, अशी शंका डोंबिवलीत आलेल्या अनेकांना वाटली असेल तर त्यात नवल वाटू नये. संमेलन यशस्वी झालं ते कसं ठरवतात, कोण ठरवतं? संमेलन आयोजित करण्यामागचे उद्देश, हेतू काय असतात नेमके, ते साध्य होतात का, किती अंशी साध्य झाले, काय चुकलं, काय जमलं, याचा ताळेबंद कोणी मांडतं का दरवर्षी? की, पुढे पाठ मागे सपाट अशा न्यायाने दर वर्षीची आयोजक संस्था मागच्या चुका टाळत तर नाहीच, नवनवीन करत राहते? दर वर्षी वेगळी संस्था आयोजन करत असते त्यामुळे तिला अनुभवाचा फायदा मिळत नाही, असं गृहीत धरायला हरकत नाही. (जयपूर लिटरेचर फेस्टिवलचं यंदाचं दहावं वर्ष होतं. त्याचे तिन्ही संचालक पहिल्या वर्षापासूनचे आहेत, चुकांमधून ते शिकत राहतात, याची प्रचिती दरवर्षी येते.) साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दोनतीनदा सांगितलं की, ते महिनाभर डाेंबिवलीत मुक्काम ठोकून होते व आगरी यूथ फोरमला मदत करत होते. मग माजी संमेलनाध्यक्षांना निमंत्रण पाठवायला लागतं, ज्या वक्त्यांची नावं छापली आहेत त्यांची परवानगी घ्यावी लागते, नुसती परवानगी घेऊन भागत नाही तर त्यांनाही रीतसर निमंत्रण पाठवायला लागतं, त्यांची येण्याजाण्याराहण्याचीजेवणाची सोय करावी लागते, हे त्यांच्याही लक्षात आलं नाही की काय? फूड फेस्टिवल आणि साहित्य संमेलन या दोन्हींच्या आयोजनामध्ये मूलभूत फरक आहे, त्यांच्या उद्देशातही फरक आहे, या बाबीकडे अंमळ दुर्लक्षच झाल्यासारखे वाटले. नुसता पैसा असून उपयोग नाही, तो कुठे व कसा खर्च करायला हवा, हेही कळावं लागतं.

संमेलनात साहित्यिक मूल्यांच्या चर्चा व्हायला हव्यात. मराठी भाषा आणि मराठी साहित्य पुढे कसं जाईल, याची चर्चा हवी. नवीन लेखकांना हुरूप येईल, मार्गदर्शन मिळेल, ते वाचकांसमोर येतील, वाचकांना चांगल्यावाईट पुस्तकांची ओळख होईल, वेगळे विषय मांडू पाहणाऱ्या लेखकांचं कौतुक होईल, अशा दिशेने सत्रं/परिसंवादांची आखणी हवी, ही अपेक्षा चुकीची आहे का? थोडी पाॅप्युलिस्ट भूमिका घ्यावी लागेल कदाचित, गर्दी व्हावी म्हणून, पण हे अशक्य तर नाहीच.हे लिहेपर्यंत तरी कोणत्याही संस्थेने ९१व्या संमेलनासाठी आमंत्रण दिलेलं नाही. ते येईल अशी आशा करायला हरकत नाही. आणखी १० वर्षांनी, २०२७मध्ये होणारं संमेलन शंभरावं असेल. ते अविस्मरणीय, यशस्वी, वगैरे व्हायचं असेल तर आताच नियोजनाला सुरुवात करायला हवी. नाहीतर शंभराव्या संमेलनाचे सूप वाजले, अशा नीरस चावून चोथा झालेला मथळाच वाचावा लागेल तेव्हा आपल्याला.

Monday, 27 March 2017

नंदिनी मॅमचा निरोप समारंभ

रूपारेल महाविद्यालयातून पदवी मिळवल्याला २६ वर्षं झालीत. तिथली पाच वर्षं आनंदात तर गेलीच, पण या पाच वर्षांनी मला अशा मैत्रिणी दिल्या, ज्या अजून माझ्या मैत्रिणी आहेत, आम्ही दर दोनतीन महिन्यांतनं प्रत्यक्ष भेटतो, व्हर्चुअल जगात तर रोजच भेटत असतो. याच काळात मानसशास्त्र विभागातील तीन शिक्षकांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव होता, जो अजून कायम आहे.
आमच्या विभागप्रमुख डाॅ. नंदिनी दिवाण जानेवारीत वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्त झाल्या. पुढचे दोन महिने त्या शिकवत राहिल्या कारण अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता. परवा शनिवारी त्यांचा एक छोटासा निरोप समारंभ झाला, आमच्या सायकाॅलाॅजी लॅबमध्ये. १९९१ ते २०१६ या काळात या विभागात शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास तीस जण आले होते. काही जणांचा आता मानसशास्त्राशी थेट संबंध उरलेला नाही, परंतु बहुतेक जणांचं करिअर याच विषयाशी निगडित आहे. एचआर विभाग ते फोरेन्सिक लॅब ते क्लिनिकल काउन्सेलिंग अशा विविध क्षेत्रांत माजी विद्यार्थी काम करत आहेत. यातले अनेक विद्यार्थी विभागाच्या सतत संपर्कात असतात व त्यांच्या अनुभवांचा फायदा नवीन विद्यार्थ्यांना करून देत असतात. लॅब, म्हणजे आमच्या वर्गाचं संपूर्ण नूतनीकरणही आम्हा विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणग्यांमधूनच केलंय, साडेपाच लाख रुपयांहून अधिक रक्कम आम्ही विभागासाठी उभी करू शकलो, याचा आनंद वाटतो. आता लॅबमध्ये काही संगणक आहेत आणि एक स्मार्ट टीव्हीही. काॅलेजकडे यातलं काहीही करायला पैसा नाही, असं स्पष्ट करण्यात आलं होतं, त्या कारणांची चर्चा करायची ही जागा नाही.
डाॅ. दिवाण यांच्यानंतर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डाॅ. नीता ताटके विभागप्रमुख झाल्या आहेत. डाॅ. ताटके उत्तम जिम्नास्ट आहेत, अजूनही रोज संध्याकाळी त्या समर्थ व्यायाम मंदिरात भेटतातच. त्या दिवशी त्या म्हणाल्या की, एकदा भौतिकशास्त्र विभागाच्या शिक्षकांनी आम्हाला विचारलं, आमच्या मुलांना खूप समस्या आहेत, अभ्यास कसा करायचा तेही त्यांना कठीण जातंय, तुम्ही काही मदत करू शकता का. या समस्या प्रामुख्याने FYBSc ला प्रवेश घेणाऱ्यांच्या होत्या. ही मुलं कोण असतात? एकतर यातली अनेक मुलं वेगळ्या महाविद्यालयांतनं आलेली असतात. त्यातली अनेक इंजीनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश न मिळाल्याने निराश होऊन आलेली असतात. मग अशांसाठी मानसशास्त्र विभागाने काही खास सत्रं घेऊन त्यांना अभ्यासाकडे वळवलं. मानसशास्त्र या विषयाकडे आपण आता थोड्या अधिक मोकळेपणाने पाहू लागलो आहोत. त्यामुळे महाविद्यालयातील इतर विभागांनाही या विभागाची मदत हवीशी वाटते आहे.
तिसऱ्या शिक्षक होत्या सुषमा साठे. या २००३मध्ये आॅस्ट्रेलियात स्थायिक झाल्या. परंतु तोवर दिवाण-ताटके-साठे हे त्रिकूटच विभाग सांभाळत होतं. रूपारेलमध्ये गेल्या १०-१२ वर्षांपर्यंत अकरावी बारावीला मानसशास्त्र शिकवणाऱ्या सबिता बबानी यांचा विषयाची गोडी लावण्यात प्रचंड हातभार होता. अप्रतिम इंग्रजी, गोड चेहरा आणि शिकवण्याची हातोटी या गुणांमुळे माझ्यासकट अनेक जण मानसशास्त्रात बीए करायचं या निर्णयापर्यंत आलेले होते. आणि तो निर्णय या त्रिकूटाने अगदी तंतोतंत सार्थ ठरवला.
डाॅ. दिवाण विद्यार्थी, लेक्चरर आणि विभागप्रमुख अशा रूपात जवळपास ४० वर्षं रूपारेलमध्ये होत्या. कडक शिस्तीच्या, सगळ्या गोष्टींत परफेक्शनचा आग्रह धरणाऱ्या नंदिनी मॅम यांच्याबद्दल काडीचीही आपुलकी न वाटणाराही विद्यार्थीवर्ग आहेच. परंतु, यांच्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारा, त्यांच्याकडून खूप काही शिकणारा वर्ग मोठा आहे. परवा तीस जण होतो, मॅमना प्रत्येकाचं नाव लक्षात होतंच पण त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय, हेही त्या सांगत होत्या. त्यांचं अक्षर सुंदर होतं, अजूनही आहे. त्यांना उत्तम संगीत, चित्रकला, चित्रपट, पर्यटन या सगळ्यात रस आहे. त्यांची दोन पुस्तकं प्रकाशित आहेत. कौतुक appreciation करावं तर त्यांनीच, इतकं बारकाव्याने त्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलतात. गुरुपौर्णिमेला किंवा शिक्षक दिनाला माझी विभागात फेरी ठरलेलीच. दर वेळी त्या माझ्यासाठी छोटीशी भेट आणणारच. आपली चूक मान्य करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडनं शिकावा.
परवा आम्ही काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल काय वाटतं ते लिहिलेलं एकत्र करून छोटी पुस्तिका छापून डाॅ. दिवाण यांना भेट दिली.
डाॅ. ताटके यांना दिवसभरातनं इतक्या गोष्टी करायला वेळ कसा मिळतो, तरी त्या कायम हसतमुख कशा असतात, असे प्रश्न पडावे. महाविद्यालयातील उपप्राचार्य म्हणून असणाऱ्या व शिकवण्याच्या जबाबदाऱ्या, समर्थ व्यायाम मंदिरातील जबाबदारी, घर हे सगळं त्या आनंदाने आणि पॅशनेटली सांभाळतात. त्या विभागप्रमुख झाल्यात, त्यामुळे डाॅ. दिवाण आता तिथे भेटणार नाहीत, हा सल बराचसा कमी झालाय, हे नक्की.
महाविद्यालय किंवा शाळेत चांगले शिक्षक मिळणं, हा नशिबाचा भाग वाटतो कधीकधी. सगळ्यांच्याच काही अशा रम्य आठवणी नसतात आपापल्या Alma mater बद्दलच्या. असं भाग्य मला लाभलं, इतकंच.

Tuesday, 21 March 2017

एक पाऊल मागे

स्त्री मुक्ती संघटना 'मुलगी झाली हो' हे नाटक सादर करतेय त्याला तीसहून अधिक वर्षं होऊन गेलीत. म्हणजे ते नाटक आलं तेव्हा ज्या मुलींच्या नशिबात आईच्या पोटातच मारलं न जाता जन्माला येणं होतं, त्या मुली गेल्या पाचसहा वर्षांत आई झाल्यात, होऊ घातल्यात. आता मात्र, त्यांच्या पोटी मुलगी जन्माला येईल, अशी परिस्थिती उरलेली नाही. महाराष्ट्रातली दर एक हजार मुलग्यांसाठीची मुलींची संख्या गेल्या काही वर्षांनंतर पुन्हा ९००च्या खाली गेली आहे, यावरून असा अंदाज बांधायला हरकत नसावी. या नाटकातील एक प्रवेश मध्यंतरी टीव्हीवर एका कार्यक्रमात पाहिला तेव्हा वाटलं, अजूनही ते तंतोतंत लागू होतंय. म्हणजे आपण ३० वर्षांत बदललोच नाही, सुधारलोच नाही?

समाज म्हणून आपलं पाऊल मागेच पडतंय की काय, असं वाटावं अशा बातम्या आणि अशी परिस्थिती आजूबाजूला दिसतेय. मुलींचा जन्मदर खाली आलाय, स्त्री भ्रूण मारून नदीकाठी पुरले जातायत, औरंगाबादसारख्या शहरात गर्भपाताच्या गोळ्यांचा खप प्रचंड वाढलाय. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या बोलण्यातनं हे दिसतंय की, मुलगी झाली तर तिच्या आईला सासूसासरे, जे या बाळाचे आजीआजोबाच असतात, नीट वागवणार नाहीत म्हणून गर्भपात करा, असं सांगितलं जातंय.

कुठेतरी आपण कमी पडतोय, चुकतोय, असं वाटू लागलंय हे सगळं कळल्यावर. सरकारतर्फे जनजागृती अभियानं चालवली जातात, बेटी बचाओ बेटी पढाओ (बेटी बचाओ हे इतक्या मोठ्या आवाजात सांगावं लागतंय हेच दुर्दैव खरं तर!) या मोहिमेचाही बराच बोलबाला आहे, पीसीपीएनडीटी कायदाही अंमलात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक मुली/महिला जीवनाच्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये लखलखीत यश मिळवताना दिसतायत. तरीही मुली नकोशा झाल्या आहेत, होत आहेत. हे सगळं पालथ्या घड्यावर पाणी पडण्यासारखं झालंय. घडा रिकामा तो रिकामाच. यात चूक कोणाची? सरकारला कितपत जबाबदार धरायचं? आपली, समाजातले जितेजागते सदस्य म्हणून काही बांधीलकी आहे की नाही?

हे मागे चाललेलं पाऊल पुढे टाकयला हवंय, तातडीने.

Monday, 20 February 2017

उंदरासाठीही करावा लागतो डोंगराचा प्रपंच


एक छोटसं सुखी कुटुंब- जॉर्ज लिट्ल आणि त्याचे आईबाबा यांचं. जॉर्जला सोबत म्हणून छोटा भाऊ दत्तक घ्यायला त्याचे आईबाबा शहरातल्या अनाथलयात जातात आणि घरी घेऊन येतात एक चिमुकला, बोलका उंदीर- स्टुअर्ट लिट्ल. यातूनच फुलत जाते एक परीकथा, कुटुंबाचं महत्त्व सांगणारी.

उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीच खास लहान मुलांसाठीच्या चित्रपटांचं पीक येतं, तसंच यंदाही आलंय. आणि कोलंबिया ट्रायस्टारचा स्टुअर्ट लिट्ल ही यातली हॉलिवुडची खास भेट. तीन वर्षांपुढच्या मुलांना बघायला आवडेल. आणि सहासात वर्षांच्या मुलांना थोडीफार गोष्टही कळेल असा.

तर होतं काय, की छोटा `मानवी' भाऊ घरी येणार या आशेनं शाळेतून घरात पाऊल टाकल्याटाकल्या जॉर्जला समोर दिसतो मुलासारखेच कपडे घातलेला तीन इंच उंचीचा पुटकला उंदीर, तो हिरमुसतो, संतापतो. स्टुअर्ट जॉर्जच्या नफरतीबरोबरच सामना करावा लागतो तो घरातल्या मांजराशी- स्नोबेलशी, स्टुअर्ट हा लिट्ल कुटुंबाचाच एक सदस्य आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत खायचं नाही, अशी तंबी मिळाल्याने स्नोबेलची परिस्थिती विलक्षण होते- a mouse with a pet cat – समोर उंदीर दिसतोय, पण त्याला खाता मात्र येत नाही अशी; कोणत्याही जातिवंत मांजरासाठी अपमानास्पद. यातून मार्ग काढण्यासाठी तो माँटी या मित्राच्या सल्ल्यानं गल्लीतला `भाई' असलेल्या स्मोकी या बोक्याची मदत घेतो.

इकडे स्टुअर्टनं हळूहळू जॉर्जचं मन जिंकण्यात यश मिळवलेलं असतं. तो त्याला दूरनियंत्रित होडय़ांची शर्यत प्रयत्नांची पराकाष्ठा करून जिंकून देतो. आणि घरात लावलेल्या `फॅमिली पोर्ट्रेट'मध्ये मानाच्या जागी जाऊन बसतो. अनाथलयातल्या पोरक्या वातावरणातून आईब, वडील आणि भाऊ यांच्या प्रेमळ सहवासात स्टुअर्ट
रमतो. काही काळाने सर्व दत्तक मुलांप्रमाणेच त्यालाही त्याच्या मुळ, जन्मदात्या आईवडिलांचा शोध घ्यावासा वाटतो. आणि एक दिवस अचानक त्याचे आईवडिल समोर उभे ठाकतात. त्यांच्यासोबत अत्यंत दु:खी मनस्थितीत स्टुअर्ट स्वत:च्या नव्या घरी पोचतो.

इथून पुढे स्टुअर्टच्या साहसांना सुरुवात होते. सोयीस्करपणे दोस्तीचा हात पुढे केलेल्या स्नोबेलच्या मदतीने तो आपल्या `शत्रुंवर' मात करतो आणि अखेर `आपल्या' घरी परततो.

हा चित्रपट ई.बी.व्हाइट यांनी 50 वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथेवर आधारित आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीची, फारशी गुंतागुंत नसलेली ही परीकथा, कोणत्याही विशिष्ट कालखंडाशी बांधील नसलेली. अत्याधुनिक संगणकशास्त्राच्या अफलातून वापराने दिग्दर्शक रॉब मिन्कॉफ आणि त्याच्या सर्व टीमने ती अत्यंत आकर्षक आणि आनंददायी केली आहे. चालताबोलता, माणसांनाही ज्याचं बोलणं समजू शकतं असा, झ्याक मारू कपडे
घालणारा, उबदार मऊमऊ गादीवर झोपणारा उंदीर लिट्ल कुटुंबाचा, म्हणजेच माणसांच्या जगाचा अविभाज्य
भाग आहे, हे प्रेक्षकाला मनापासून स्वीकारायला लावण्याची परीक्षा मिन्कॉफ पहिल्याच फटक्यात, पहिल्याच शॉटमध्ये पास झालाय. कारण, बोलका उंदीर पाहून चित्रपटात कुणालाच आश्चर्य वाटत नाही. हे जगच वेगळं, इथं सगळे प्राणिमात्र एकसमान.

माणसं आणि प्राणी यांना असं एका पातळीवर, एका जगात, एकत्र वावरताना दाखवणं, हे चित्रपटाच्या तंत्रज्ञांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. कारण, इथे स्टुअर्ट कार्टुन फिल्ममधल्या चित्रांसारखा सपाट, द्विमित नाही, तर खऱयाखुऱया उंदरासारखा त्रिमित आहे. चित्रपटात तो अगदी खराखुरा उंदीर वाटतो, पण, तो संपूर्णपणे संगणकावर तयार झालाय. आणि त्याच्यासारखीच बोलकी मांजरं मात्र खरीखुरी आहेत. पडद्यावर
आपल्याला सगळे सारखेच भासतात, हीच तर खरी कमाल आहे.

म्हणूनच स्टुअर्टला जन्माला घालण्यामागे कित्येक लोकांनी किती कळा भोगल्या आहेत हे जाणून घेणं- प्रत्यक्ष चित्रपट पाहण्याइतकंच, किंबहुना त्याहून अधिक- उत्कंठावर्धक ठरतं. 1997 मध्ये त्याच्या जन्माची प्रक्रिया सुरू झाली. सर्वात प्रथम सर्वांना हवंहवंसं वाटेल असं आणि `मी हे करू शकतो' या आत्मविश्वासामुळे कौतुकही वाटावं, असं स्टुअर्टचं बाह्यरूप चित्रपटात दिसावं म्हणून उंदीर कसे दिसतात याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाला फोटो रिअलिझममधील अत्याधुनिक तंत्राची जोड देऊन स्टुअर्टचं रूप साकारण्यात आलं. ते एकदा निश्चित झाल्यावर.

संगणकतज्ञांनी बिल आयर्विन या मूकाभिनेत्याकडून उंदराच्या हालचाली शिकून घेतल्या. त्याच्या असंख्य भावना- हालचालींचा संगणकात साठा करण्यात आला.

दुसरं मोठं काम होतं ते त्याचे कपडे आणि अंगावरची लव तयार करण्याचं. त्याचे कपडे शरीराच्या हालचालींनुसार दुमडले जावेत, सुरकुतावेत यासाठी संगणाकावर त्याचे कपडे `शिवणाऱयांनी' चक्क शिवणवर्गात प्रवेश घेतला. त्याचे हात एखाद्या लहान मुलासारखे गोंडस बनविण्यात आले.

संगणकावर स्टुअर्टचं अंतिम रूप तयार झाल्यानंतर खरी परीक्षा सुरू होणार होती, त्याला सहकलाकारांबरोबर- अभिनेते आणि खऱयाखुऱया प्रशिक्षित मांजराबरोबर-पडद्यावर एकत्र आणण्याची. या मांजरांनी दिग्दर्शकाची परीक्षाच घेतली. ती त्यांच्या प्रशिक्षकांच्या उपस्थितीतच `काम' करायची. त्यामुळे प्रत्येक शॉटच्या वेळी प्रशिक्षक त्यांना तर दिसले पाहिजेत, पण शॉटच्या आड न येता, अशी सोय करावी लागे.
स्नोबेल, माँटी, स्मोकी आणि इतर मांजरं त्यांच्यात्यांच्या स्वभावानुसार, भूमिकांनुसार निवडण्यातच अनेक महिने गेले. ही मेहनत किती सार्थकी लागली आहे, ते चित्रपट बघताना कळतंच. या मांजरांच्या दिसण्यातून त्यांची व्यक्तिरेखा क्षणार्धात अचूक उभी राहते.

आता पाळी होती प्रत्यक्ष लिट्ल कुटुंबाची. हे कुटुंब थोडंफार विक्षिप्तच, पण तिरसट नव्हे, तर लाघवी तऱहेवाईकपणा असलेलं. उंदीर दत्तक घेणारी माणसं जरा `सटक'च असणार ना!

पात्रयोजना करणाऱया डेब्रा झेनच्या डोक्यात आली ती अनेक पुरस्कार मिळवलेली, साधीशीच पण गोड दिसणारी जीना डेव्हिस आणि ब्रिटिश अभिनेता ह्यू लॉरी. जॉर्जच्या भूमिकेसाठी निवडलेला जोनाथन लिपिनिकी हा स्मार्ट छोकरा याआधी जेरी मॅग्वायर या चित्रपटात झळकला होता. स्टुअर्टचा द्वेष करीत असतानाही प्रेक्षकांची सहानुभूती मिळवायची जबाबदारी त्यानं चोख पार पाडली आहे.

हे कुटुंब तयार झालं आणि 1998 मध्ये चित्रपटाच्या प्रत्यक्ष निर्मितीचं काम सुरू झालं. लिट्ल कुटुंबाचं घर तयार करण्यात आलं. पाहताक्षणी आपलं, आरामदायी वाटणारं हे घर मन जिंकून घेतं. त्यातली दत्तक येणाऱया मुलासाठीची खोली तर खासच. अडीच-तीन फूट उंचीच्या मुलासाठी तयार केलेल्या खोलीत तीन इंच उंचीचा स्टुअर्ट येतो. उबदार अंथरूणात झोपतो, सकाळी उठून आरशासमोर उभा राहून दात घासतो. हे सगळं
पाहताना अगदी स्वाभाविक, नैसर्गिक वाटतं, यातच ते उभं करणाऱयांचं कौतुक आहे.

चित्रपटातल्या छोटय़ा होडय़ांच्या शर्यतीसाठी साडेसात लाख गॅलन पाण्याचा तलाव तयार करण्यात आला आणि पडद्यावर नेहमीच्या आकाराच्या दिसतील अशा होडय़ाही. या होडय़ा हव्या तशा वळविण्यासाठी तलावाच्या खाली रूळ टाकण्यात आले. या तलावात कोणी मुलं पडण्याचा प्रश्न नव्हता पण होडय़ांचे महत्त्वाचे भाग खाली पडले तर ते उचलायला जीवनरक्षक आणि पाणबुडे तैनात होते. या शर्यतीच्या चित्रिकरणासाठी 55 फुटी क्रेनचाही वापर करण्यात आला.

स्टुअर्टच्या छोटय़ाशा लालचुटुक पॉश कारसाठी तिच्या आकाराला साजेसा एक डांबरी रस्ता तयार करण्यात आला. आणि ज्या सेंट्रल पार्कमध्ये स्टुअर्ट स्नोबेलच्या मदतीने आपल्या शत्रूंचा मुकाबला करतो. तेही स्टुडिओतच उभारण्यात आलं.

हे सर्व सुरू असताना मिन्कॉफचं एका बाबतीतलं भान कधीच सुटलं नव्हतं. स्पेशल इफेक्ट्स कितीही आकर्षक, भव्यदिव्य झाले तरी मूळ कथा आणि त्यातली पात्रं प्रेक्षकाला भावली नाहीत, तर सगळं मुसळ केरात जाणार. त्यामुळेच चांगली कथा आणि प्रेक्षकाला तादात्म्यभावाचा अनुभव देणारी पात्रं मिळूनच खरा चित्रपट बनतो, लोकांना आवडतो. त्यामुळे प्रेक्षकाला भावेल, हसवेल, क्षणभर डोळे पाणावेल आणि खूप दिवस
लक्षात राहील, असा चित्रपट बनवायचा, हा या चित्रपटासाठी काम करणाऱया शेकडो लोकांचा दृष्टीकोन होता.

खास लहान मुलांसाठी चित्रपट काढण्याची प्रथा अजून भारतात फारशी रुजलेली नाही. वास्तवाचं फँटसीसदृश चित्रपटीय दर्शनच चालणाऱया या देशात अस्सल फँटसीचं. परीकथांचं मात्र प्रेक्षकांना वावडंच आहे. त्यामुळे अशा जेमतेम दीड तासाचा जीव असलेल्या चित्रपटासाठी इतक्या लोकांनी जीव ओतून एवढे कष्ट घेतलेले आपण बघतो. तेव्हा थक्क व्हायला होतं. एका साध्या पिटुकल्या उंदरासाठी कामाच डोंगर उभारण्याची ही
वृत्ती सलाम ठोकायला लावते.
(महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला लेख.)

Thursday, 26 January 2017

प्रजासत्‍ताक चिरायू होवो

लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही; आणि प्रजा व प्रजेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हातात सर्वोच्च सत्ता असते ते प्रजासत्ताक. अशा भारतीय लोकशाही प्रजासत्ताकाचा परवा गुरुवारी ५७वा वर्धापन दिन. या निमित्ताने आपण प्रजासत्ताकाचा अर्थ समजून घ्यायला हवा. नाहीतर देशप्रेम आणि संस्कृतीच्या आवरणाच्या आत लपलेली अनागोंदी, अनास्था बाहेर न पडण्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचेल. हीच आपली संस्कृती, असं म्हणत आपण स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर घातलेल्या निर्बंधाचं समर्थन किती दिवस करणार अाहोत? सीमांचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या नावाचा वापर करून, इतर नागरिकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारांबद्दल बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी करणारं, त्यांना राष्ट्रद्रोही ठरवणारं प्रजासत्ताक अभिमान वाटावं असं आहे का‌? एकीकडे हे विश्वचि माझे घर, ग्लोबल व्हिलेज, ग्लोकल अशा शब्दांचं समर्थन करून त्यानुसार वागायचं; तर दुसरीकडे राष्ट्रवादाचं समर्थन करायचं, हे विचित्रच नव्हे का?

राष्ट्रवाद ही संकल्पना आता मागे पडत चालली आहे. जगभरात सध्या साडेसहा कोटींहून अधिक व्यक्ती निर्वासित आहेत, विविध कारणांमुळे त्यांना त्यांचा देश सोडून जाणं भाग पडलं आहे. स्वत:च्या इच्छेने शिक्षण वा नोकरीसाठी आपला देश सोडून इतरत्र कायमस्वरूपी निवासासाठी गेलेल्यांची संख्या याहूनही मोठी असणार. आपल्या प्रत्येकाच्या ओळखीत अशा अनेक व्यक्ती असतातच. मग अशा व्यक्तींनी कोणता राष्ट्रवाद बाळगायचा, मूळ देशाकरता, की आता निवारा दिलेल्या. त्या उलट, आपण प्रजासत्ताक ही संकल्पना अधिक गांभीर्याने घेतली तर आपलं सगळ्यांचंच जीवन सुखकर होण्याची शक्यता अधिक. सार्वजनिक जीवनातला आपला वावर, शिस्त, वैयक्तिक आयुष्यातले नियम, स्वच्छता, प्रामाणिकपणा, वेळ पाळणं ही मूलभूत मूल्यं पाळली तर प्रजासत्ताकाचं स्वप्न खरं होण्याची शक्यता अधिक. अन्यथा, मुलींनी जीन्स घालाव्या की नाही, नोकरी करावी की नाही, कोणी काय खावं नि खाऊ नये, कोणी कोणावर प्रेम करावं, अशा प्रश्नांवर मतं देण्यातच आपली उमेदीची वर्षं, वेळ, व बुद्धी वाया जाईल.
प्रजासत्ताक चिरायू होवो, अशा शुभेच्छा.

Tuesday, 24 January 2017

रेल्वेचा ताण

काल संध्याकाळी मी पावणेसातच्या सुमारास दादरला पोचले. ७.००ची, पाच नंबरवरून सुटणारी दादर कल्याण सेमीफास्ट पकडून मुलुंडला जाण्यासाठी. ब्रिजवर असतानाच उद्घोषणा ऐकू येऊ लागल्या, चार नंबरच्या ट्रॅकवरून सध्या गाड्या जात नाहीत. पाचवर लोकल अालेली होती, वेळ ००.०० लावलेली, पण कुर्ला, भांडुप, मुलुंड आणि पुढे स्लो, अशी सेमी फास्ट असेल असं दिसत होतं. त्या गाडीच्या नेहमीच्या मैत्रिणी आत दिसल्या, मी बाहेरच उभी राहिले कारण बऱ्यापैकी गर्दी होती. गाडी सुटली. कुर्ल्याला ज्या बाया चढल्या, त्या म्हणाल्या की, गाडी फास्ट आहे, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली नि कल्याण. तिथेच डबा पॅक झाला होता. आम्ही मुलुंडच्या तिघी, कळव्याची एक आणि ठाण्याची एक अशा पाच जणी दाराजवळ होतो. विचार करू लागलो, आता काय करायचं. घाटकोपरला उतरता आलं असतं कदाचित, पण मग मागून येणाऱ्या कोणत्याही गाडीत किमान तासभर तरी चढता आलं नसतं. आमची गाडी जवळपास ३० मिनिटांनी त्या दिशेने निघालेली पहिली फास्ट होती, त्यामुळे सर्वच स्थानकांवर अलोट गर्दी होती. घाटकोपरला चढण्याच्या रेटारेटीत तीनचार जणी फलाटावर पडल्या. काही जणी चढू शकल्या. आता यापुढचं स्टेशन ठाणे. ते येतं दुसऱ्या बाजूला. काही फुटांचं अंतर, पण ते पार करणं निव्वळ अशक्य होतं. आम्ही तसा विचारही करू शकत नव्हतो. ठाण्याची मुलगी होती, तिचं बहुधा लहान मूल घरी होतं, ती त्या विचारात होती, पण आम्ही तिला रोखलं. ठाण्याला गाडी पोचली तेव्हा किंचाळ्या, आरडाओरडा या पार्श्वभूमीवरच बाया चढल्या/उतरल्या. आम्ही ठाण्याला न उतरण्याचा निर्णय योग्यच होता, याची खात्री पटली. दहाएक मिनिटांत डोंबिवली आलं, आम्ही सहज उतरू शकलो. समोरच्याच फलाटावर सीएसटी लोकल आली आणि आम्ही त्या स्लो लोकलने ८च्या सुमारास मुलुंडला उतरलो.
जवळजवळ एक तास यात वाया गेलाच, शिवाय टेन्शन प्रचंड होतं. ताणलेल्या अवस्थेत, दारात अर्धा तास उभं राहून पाय खूप दुखू लागले. आम्ही पाच जणी फर्स्ट क्लासच्या एका डब्यातल्या. अशीच अवस्था १२ डब्यांमधल्या अनेकांची झाली असणार.
कारण काय?
तर चुकीचा इंडिकेटर.
जबाबदार कोण?
ज्यांची लहान मुलं पाळणाघरात आहेत, क्लासमधनं पिकअप करण्यासाठी वाट पाहताहेत, म्हातारे आईवडील/सासूसासरे जेवणासाठी वाट पाहताहेत - स्त्रिया किंवा पुरुष - कोणीही असेल; त्यांच्यावर किती ताण येत असेल अशा प्रसंगात, तो आपण मोजू शकतो का?
आयुष्यभराच्या अशा, निव्वळ रेल्वेच्या गलथान कारभारामुळे येणाऱ्या ताणाचा, मुंबईकरांच्या जीवनमानावर काय विपरित परिणाम होत असेल, तो आपण मोजू शकतो का?

Monday, 9 January 2017

"Is anyone ever truly home?"


कोणी खरोखर पूर्ण आश्वस्त असतं का?

कोणी खरोखर पूर्ण आश्वस्त असतं का?
मला माहितीये, मी असते.
जेव्हा स्वत: केलेल्या पहिल्या गाजरहलव्याचा फोटो बाबा मला पाठवतो
जेव्हा आई मी दिलेला दुपट्टा मिरवते
जेव्हा सुटीनंतर काॅलेजच्या कँटीनमध्ये जाता क्षणी मी काहीही न बोलता अण्णा दोन कटिंग समोर ठेवतो
जेव्हा गवई वरचा सा गाठतो, श्रोत्यांची उत्कंठा ताणली गेलेली असतानाच
जेव्हा मी उत्तुंग शिखरावर असते आणि आजूबाजूचे ढग शाळेत काढलेल्या चित्रांसारखे दिसतात
माझा चहा बेचव होतो हे माहीत असूनही आजोबा जेव्हा मला त्यांच्यासाठी चहा करू देतात
जेव्हा माझा जिवलग मित्र त्याच्या विसाव्या वाढदिवसाला लाइटसेबर भेट दिल्यावर लहान मूल होऊन जातो
जेव्हा माझ्या टीचर ओणमच्या दिवशी माझ्यासाठी आठवणीने अवियल आणतात
जेव्हा माझा छोटा आत्तेभाऊ मी ११ वर्षांची असतानाचा माझा सुपरमॅनचा राखी टीशर्ट घालतो
जेव्हा मी शेकडो किमी दूर आणि खूप उंचावर असते हिमालयात, आणि आईबाबापर्यंत फाेनवरनंच माझ्या घशातला आवंढा, माझे हुंदके पोचलेले असतात
जेव्हा माझे ओठ थरथर कापतात आणि माझा आवाज फुटत नसतो, मला रडू येत असतं म्हणून नव्हे, तर मला समोरच्या माणसाला खाऊ की गिळू असं वाटत असतं
जेव्हा परीक्षेच्या आधीच्या अस्वस्थतेने माझे हात थरथरत असतात आणि माझा पाय हलण्याचा मी थांबवू शकत नाही
जेव्हा डेंटिस्टच्या खुर्चीत बसल्यावर थरकाप उडून मी गोठून जाते
जेव्हा मी पाच मिनिटांचं एक गाणं सलग दोन तास ऐकत राहाते
जेव्हा मी एकाच पानावर जणू अनंत काळापासून अडकलेली असते

मी आश्वस्त असते.
जिथे माझ्या मी असण्याला पूर्ण परवानगी आहे, मी घरी असते.


जसजसे मोठे, वयस्कर, प्रेमळ, निरुत्साही होत जाता,
अशी घरं शोधा.
ती तुमची नसतीलही कदाचित.
आसरा घ्या, पण चिकटून राहू नका.
शिका आणि स्वत:चं घर बांधा.
एक घर बांधायचा प्रयत्न तर करा
बाल्कनी आणि गच्ची असलेलं.
सतत हल्ल्याच्या भीतीने,
अभेद्य तटबंदी असलेला किल्ला नव्हे.
बोलवा, स्वागत करा, खाऊपिऊ घाला, जोपासा, कान द्या
आणि जेव्हा अपयश येईल
अपयश आलं मैत्रहो,
तर हे लक्षात घ्या
की, हे जगसुद्धा पाय रोवून उभं राहण्यासाठी चाचपडतंय अजून.
Gargi's original poem.
"Is anyone ever truly home?"
I know I am.
When Baba sends me a picture of the first gajar halwa that he made on his own
When Aai wears the dupatta I gave her
When college reopens after holidays and Anna from the canteen readies two 'cuttings' before I ask for them
When the performer hits the upper 'Sa' after the audience has nearly died of anticipation
When I'm atop a mountain and the clouds look identical to how I drew them in school
When I offer to make tea for my grandfather and he happily accepts,
knowing fully well my tea doesn't taste like tea
When my best friend turns into a child when I gift him a Lightsaber on his 20th birthday
When my teacher remembers to get me Aviyal on Onam
When my little cousin wears my grey Superman t-shirt from the time I was eleven.
When I'm hundreds of kilometers away and several thousand feet above sea level, on the phone with my parents, and nothing but sobs and sniffles find their way out of my throat
When my voice cracks, lower lip quivers, not because I want to cry but because I want to beat the living daylights out of the person in front of me
When my hands tremble and I can't stop shaking my foot because of anxiety before an exam
When I can't move a muscle because I'm almost literally petrified of my turn at the dentist
When I spend two hours listening to the same 5-minute song
When I am on the same page for what feels like...a really long time.
I'm home.
Home is where I'm allowed.

As you grow, up, older, warmer, colder
Look for homes; they may not be yours.
Take shelter - don't settle
Learn, and build your own.
Build a home, try -
one with a balcony and a terrace.
Not a fortress surrounded by defensive walls, always expecting attack.
Invite, welcome, feed, nurture, listen.
And if you fail,
when you fail, sweetheart
remember -
even the Universe is still finding its footing.