माय मराठी

मराठी भाषा दिनानिमित्त वेळोवेळी लिहिलेलं इथे एकत्र केलंय.

माझा एक अमराठी मुंबईकर पत्रकार मित्र आहे. त्याने नुकतंच मुंबईतल्या एका भिंतीवर रंगवलेल्या फुलपाखराचे चित्र शेअर केलं आणि ओळी लिहिल्या - छान किती दिसते फुलपाखरू! मी त्याला म्हटलं, अरे, तुझ्याकडून हे आलं हे पाहून आनंद झाला. तर तो म्हणाला, महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकलेल्या कोणाच्याही मनात याच ओळी येतील हे चित्र पाहून.

***
आज मराठी राजभाषा दिन. राज्यभर या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत, वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमध्ये याभाेवती गुंफलेले लेख, कविता प्रसिद्ध होत आहेत. व्हाॅट्सअॅप विद्यापीठातही यावर अनेक गमतीशीर धडे गिरवले जात आहेत. म्हणजे पाय या शब्दाला इंग्रजीत केवळ लेग म्हणतात, मराठीत मात्र वीसेक शब्द आहेत. किंवा उष्टं, खरकटं, बावळट या शब्दांना इंग्रजीत काय म्हणाल, असा सवाल केला जातो. किंवा ळ हे अक्षर कसं फक्त मराठी भाषेत आहे, वगैरे वगैरे. म्हणजे इंग्रजीत शब्द नाही म्हणून मराठी थोर, दुसऱ्या भाषेत ळ नाही म्हणून मराठी महान. काही तरी गडबड नाही वाटत यात? मुळात कोणतीही एकच भाषा मोठी, इतरांपेक्षा चांगली अशी भूमिका योग्य आहे का? भाषा किती संपन्न, समृद्ध, श्रीमंत, व्यापक, लवचिक, सामावून घेणारी आहे याची काही परिमाणं असू शकतात. आणि प्रत्येक भाषा तशी असतेच, ती ज्या संस्कृतीत, भौगोलिक प्रदेशात, कोणत्या काळात जन्माला येते यावर तिचा शब्दसंग्रह अवलंबून असतो. आपण इंग्रजीत लेग हा एकमेव शब्द असल्याबद्दल हसतो. पण मराठीत बर्फाला किती शब्द आहेत आणि एस्किमोंच्या भाषेत किती आहेत याची तुलना केली तर मराठी अगदी बापुडवाणी वाटेल. याच कारण आहे महाराष्ट्रात, जिथे मराठी उगम पावली, तिथे बर्फ सर्वसाधारणपणे पडत नाही. एस्किमोंचा भवताल बर्फानेच व्यापलेला आहे. त्यामुळे आपण असे विनोद करतो, तेव्हा त्यातून नक्की काय साधायचं असतं, याचा विचार केलेला बरा.


मराठी, इतर अनेक भाषांसारखीच, संपन्न आहे हे मात्र खरं. भाषा पाच कोसांवर बदलते म्हणतात, मग एवढ्या मोठ्या पसरलेल्या महाराष्ट्रात ती बदलत बदलत वेगळीच बोली होऊन जाणारच. पण तिचं मराठी मूळ काही हरवत नाही. युरोप, अमेरिका, आॅस्ट्रेलिया वगैरे ठिकाणी वसलेल्या मराठी लोकांची भाषा अनेकदा ‘शुद्ध’ वाटते, कारण ती फक्त घरात बोलली जाते, ती बोलणारी/ऐकणारी माणसं अगदी कमी असतात. त्यामुळे भाषेत वेगळा प्रयोग होण्याची, ती वाकण्याची (म्हणजे कोणासमोर खाली वाकण्याची नव्हे हं) शक्यता कमी उरते. आपण महाराष्ट्रात असलेले लोक एक प्रकारे नशीबवान. आपल्या भाषेवर किती वेगवेगळे संस्कार होतात पाहा. मुंबईतली मराठी इंग्रजी/हिंदीने पुरती बदलून गेलेली. नागपूरकडची हिंदीमय झालेली. सोलापूर/कोल्हापूर/औरंगाबादकडे कन्नड/तेलुगु/उर्दूचा प्रभाव स्पष्ट दिसतो. पुण्यातही गेल्या काही दशकांत शिक्षण वा नोकरीसाठी भारतभरातून लोक येऊन स्थायिक होऊ लागले असल्याने पुण्यातली तथाकथित शुद्ध मराठी लोप पावू लागली आहे. यावरही गळे काढणारे लोक आहेतच. अर्थात आपण काही वेगळे नाही. जगभरात असे भाषेचे संरक्षक पसरलेले आहेत. त्यांना कुत्सितपणे ग्रामरनाझी म्हणजे व्याकरणराक्षस असं संबोधिलं जातं. असे लोक मराठीही आहेत. त्यांच्या दृष्टीने मी चहा प्यायले हे शुद्ध. मी चा पिली, मी चहा पिलो, मी चाय पिलो, वगैरे दिसलं की यांचं पित्त खवळतं. पण हे तिन्ही वाक्प्रयोग आणि इतरही, हे महाराष्ट्राच्या विविध भागांत नैसर्गिकपणे, सहजपणे होत आलेले आहेत, हे ते विसरतात. शुद्ध भाषा छापील पुस्तकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं यांमध्ये वापरली जावी, ही अपेक्षा एक वेळ करावी, कारण प्रमाण भाषा असं काही असतंच, असावंच. ते अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. पण बोलताना हे नियम लावावेत का? आजकाल सोशल मीडियामध्ये देवनागरी टंकण्याचं, मराठीतून लिहिण्याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. तिथे मराठीचे इतके प्रकार वाचायला मिळतात की, अचंबा वाटतो. अशी भाषा ऐकायला तर अधिकच मजा येते, कारण बोलीनुसार शब्दांवरचे, अक्षरांवरचे जोर, हेल, उच्चार, वाक्यरचना सगळं बदलत असतं. म्हणूनच कोल्हापूरचा राणादा (तुझ्यात जीव रंगला), कोकणातला अण्णा (रात्रीस खेळ चाले), नागपूरची राधिका (माझ्या नवऱ्याची बायको) वेगळं मराठी बोलत असले तरी संपूर्ण राज्याचे आवडते आहेत. सध्या २०२२ मध्ये तर अनेक मराठी मालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रांतांमधली मराठी ऐकायला मिळते आहे.
पुढची पिढी, म्हणजे आता विशीच्या आत असलेली, मराठी फार बोलणार नाही, वाचणार नाही, लिहिणार तर नाहीच अशी भीती अनेकदा बोलून दाखवली जाते. (पण मराठी नाटक, चित्रपट, मालिका, जालमालिका यांचा प्रेक्षकही या वयाचाही आहे हेही लक्षात ठेवायला हवं.) ती किती अंशी खरी आहे हे आपण प्रत्येकाने आपापल्या घरातल्या, शेजारच्या, नात्यातल्या मुलामुलींकडे पाहून ठरवावं. जर ती खरी आहे असं लक्षात आलं तर काय करता येईल? सामान्य माणसाच्या हातात काही आहे का करण्यासारखं? तर आपण आवर्जून मराठी बोलायला हवं. वाचायला हवं. लिहायलाही हवं. आता मोबाइलमध्ये वा संगणकावरही बोललेलं टंकण्याची सोय आहे, ती वापरून एखादी निरक्षर व्यक्तीही लंबाचौडा लेख लिहू शकते. ती वापरून तरी देवनागरी लिहा, म्हणजे ती वाचली जाईल. आपल्या नेहमीच्या वापरातले, आजीआजोबा हमखास वापरत असत असे शब्द वापरायला हवेत. आपलं स्वत:चं वर्तुळही मोठं करायला हवं, म्हणजे मराठीतलेच वेगवेगळे शब्द आपल्याही कानावर पडतील. सरकारने काय करायला हवं ते सरकार ठरवेल, आपण काय करायचं ते आपण ठरवू या.
आपण सगळ्यांनीच असं केलं तर काय बिशाद आहे मराठी नामशेष होण्याची, सांगा बरं!


***


मुंबईकर लहेजाची मराठी


मी अट्टल मुंबईकर. त्यामुळे माझी मराठीही मुंबईकर मराठी, नीरस, कुठलाही विशिष्ट लहजा, चढउतार नसलेली, सरळसोट. माझ्यावर कधीच बाहेरगावी जाऊन राहण्याची वेळ आली नाही, त्यामुळे या भाषेवर वेगळे संस्कार झालेच नाहीत, याची अतिशय खंत वाटते मला. लिखाणाची भाषाही तशीच, प्रमाण मराठी. इथे माधवी भट, बालाजी सुतार, श्रेणिक नरदे, प्रमोद चुंचूवार, आदि मंडळींच्या स्थानिक बोलीभाषेतल्या अतोनात गोड पोस्टी वाचून ही खंत अधिक जाणवत राहाते. मी त्यांची काॅपी करून लिहू शकते, पण ते फारच वरवरचं होईल. एक नक्की, फेसबुकवर या वेगवेगळ्या मराठीची ओळख झाली, हे भाग्यच.


***
श्रीमंत भाषा
जी भाषा लवचिक आहे, जी उदारमतवादी आहे, मोकळ्या मनाची आहे, नवीन स्वीकारण्यास उत्सुक आहे, ती भाषा निव्वळ टिकून राहाते असं नाही तर वाढतही जाते, संपन्न होते, असं म्हणतात. आणि मराठी या निकषांवर उत्तीर्ण होतेय, यात काही शंका नाही. कसं काय, असा प्रश्न पडलाय? मग जरा तरुण पिढीची भाषा ऐका. आंतरजालावर, व्हाॅट्सअॅप वा फेसबुकवर ते जी भाषा वापरतात ते वाचा. जितक्या सहज lol (laughing out loud) वापरतो आपण मेसेज करताना, तितकंच मराठी मंडळी हहपुवा (हसून हसून पुरेवाट) वापरतात बरं जालावर. Btw (by the way) हे आपण बोलण्यात आणि लिहिण्यातही नेहमी वापरतो. मराठीजन त्याला रच्याकने म्हणतात, म्हणजे रस्त्याच्या कडेने. आता हे शब्दश: भाषांतर असलं तरी तो एक मराठी शब्द तयार झाला आहेच ना? मराठी मध्यम वर्ग जो हल्ली बातम्या व लेखांचा विषय बनलेला आहे, तोही ममव असा ओळखला जातो. Irony म्हणजे उपरोध. काही उपरोधिक लिहायचं असलं की ‘आयरनीच्या देवा’ असं लिहिलं जातं. हे आणि इतर असे शब्द मराठी शब्दकोशात प्रवेश करणार नाहीत कदाचित. पण ते नव्याने तयार झालेले आहेत, भले कमी प्रमाणात असतील, पण वापरले जात आहेत हे नक्की. (सरकारी मराठी मात्र आपण सध्या बाजूला ठेवूया. कारण तिथेही नवीन शब्दच आहेत तयार केलेले, परंतु ते गेल्या अनेक वर्षांत भरपूर वापरले गेले असूनही रुळलेले नाहीत. अजिबातच.)
भाषा ही जिवंत गोष्ट आहे, ती आपल्यासारख्या जिवंत माणसांमुळे अस्तित्वात आलीय, राहणार आहे. त्यामुळे ती बोलत राहणं महत्त्वाचं. मराठीच्या शेकडो बोली आहेत, त्या बोलत राहणं, त्यात लिहायचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. साेशल मीडियामुळे ही भाषा जगाच्या कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसांपर्यंत पोचते आहे. टीव्हीही त्यात आलाच. खासकरून कोल्हापूर परिसरात बोललं जाणारं ‘चालतंय की’ आता जगभरातल्या मराठी बोलणाऱ्यांकडनं वापरलं जातंच ना! आपण आपली भाषा बोलत राहू, लिहीत राहू, वाचत राहू, एवढंच आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त सांगणं.

Comments

Post a Comment