why multitasking sucks!

बायका अष्टावधानी असतात, multitasking असा गोड शब्द त्यांच्यासाठी कौतुकाने वापरला जातो. पण या एकाच वेळी सतरा गोष्टी करण्याच्या सवयीमुळे, किंवा तसं करण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे, कोणत्याच गोष्टीचा पूर्ण आनंद त्यांना घेता येत नाही. अगदी स्वत:साठी वेळात वेळ काढून, झोपेचा वेळ कमी करून, एखादी चालायला किंवा पळायला जाते. तेव्हा डोक्यात किती विचार असतात, किती गणितं सुरू असतात याची यादी केली तर बरीच लांबलचक हाेईल. स्वयंपाक, डबे, नोकरी करत असेल तर आॅफिसातलं काम, नसेल तर घरातली कामं, उद्या काय करायचं असेल त्याची तयारी, कपडे कोणते घालायचे, ही अगदी सहज लक्षात येणारी. त्याखेरीज आपण चालतोय त्याचा खरंच फायदा होणारेय ना तब्येतीला, सोबतीला कोणी घेऊ या का, या रस्त्याने चालायचा कंटाळा आला तर काय, कपडे नक्की कोणते घालावेत चालताना, सूर्यकिरणांचा फायदा घ्यायचा तर शक्य तितकं अंग उघडं ठेवायला हवं, पण तसं कसं जमेल, हे आणखी काही. क्वचित आज चालल्याची पोस्ट फेसबुकवर टाकू या, त्यावर काय लिहिता येईल बरं, हाही विचार असू शकतो. कोणी चालताना फोनवर बोलून घेतात, कारण एरवी असा निवांत वेळच मिळत नाही. कोणी गाणी ऐकतात. कोणी मैत्रिणीशी गप्पा मारत चालतात. काही नवराबायको एकत्र फिरायला जातात, पण तेव्हाही अनेकदा बायकोच्या हातात मेथीची जुडी दिसते, नुकतीच घेतलेली. या सगळ्यात आपण फिरतोय ती जागा कशी आहे, पहाटेच्या जादुई वेळेची गंमत, पक्ष्यांचे आवाज, नुकतीच फुलू लागलेली फुलं, आकाशातले रंग हे सगळं समोर असून दिसत नाही, जाणवतही नाही. मनुष्यप्राणी वर्तमानात फारसा जगत नाही, तो भूतकाळात तरी रमलेला असतो किंवा भविष्यकाळाच्या चिंतेत तरी असतो,असं म्हणतात,ते पटतं यामुळे. पुरुषांच्या डोक्यातही अनेक विचार एका वेळेला असतातच, पण त्यांचा गुंतवळ नसतो झालेला. एका वेळेला डोक्यात एकच विचार, आहे तो क्षण जगणं हे प्रत्यक्षात आणायला कठीण आहे, मान्य. पण त्या दिशेने प्रयत्न करायला हवाच.

Comments