काळजीवाहू सरकार

३.३.२२

घरात कोणी आजारी व्यक्ती असली की त्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी मनुष्यबळ लागतं. खासकरून रुग्ण व्यक्ती अंथरुणावरून उठू शकत नसेल तर. असं मनुष्यबळ प्रत्येक कुटुंबात पुरेसं असतंच असं नाही. अशा वेळी आपण व्यावसायिक मदत घेतो. आजकाल अनेक शहरांमध्ये अशी माणसं, ज्यांना केअरटेकर म्हणतात, पुरवणाऱ्या संस्था वा  ब्युरो आहेत. 
आमच्या घरी ७६ वर्षांच्या आजीसाठी नुकतीच अशी गरज पडली. आजी रुग्णालयात असतानाच हे कळलेलं होतं की ती घरी आल्यावर २४ तास केअरटेकरची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे मी ब्युराेंकडे चौकशा करून आजींना घरी कधी सोडतील याचा अंदाज देऊन ठेवला होता. 
एक ब्युरो होता आजीकेअर, ठाणे. दुसरा होता कमलराज, घाटकोपर. आजी केअर १२ तासांचे ८०० ₹ तर कमलराज १२ तासांचे ६००₹ घेतात.
आजीकेअरबद्दल काही जणांनी चांगले अनुभव सांगितले होते त्यामुळे त्यांना आधी फाेन केला. त्यांनी दोन बायका आमच्यासाठी राखून ठेवल्या होत्या. त्यानुसार आजी २५ तारखेला रात्री घरी येणार हे कळल्यावर त्या रात्रीच आठ वाजता सुनंदा ही केअरटेकर हजर झाली. 
तिने आजीला जेवायला घातलं, औषधं दिली, पाठीला मलम लावून दिलं. तिला झोपवून सुनंदा १० वाजता जेवली. तिने पोळीभाजी आणि पाण्याची बाटली आणलेली होती. मी तिला ताट, पाण्याचं भांडं दिलं. आपल्या घरात बसून कोणी डब्यातून जेवतंय आणि बाटलीने पाणी पितंय, हे मलाच रुचेना. त्यात ही आजीची काळजी घेणारी व्यक्ती. आजी ११ दिवस रुग्णालयात काढून, त्याच संध्याकाळी घरी आली होती. नक्की काय मदत लागेल, रुग्णालयात बेल वाजवली की नर्स किंवा डाॅक्टर उपलब्ध असतात तसं घरी नसतं. परंतु सुनंदाने आजीला आणि आम्हालाही विश्वास दिला की ती सांभाळून घेईल. आणि खरोखरच तिने तसं केलं. सुनंदा पुढच्या सात रात्री आजीला सांभाळायला आली. तिला तीन लहान मुलं होती, तिचा नवरा त्यांची रात्री काळजी घ्यायचा. त्याची चांगली नोकरी कोविडच्या काळात गेली होती आणि तो सध्या डिलिव्हरी पर्सन म्हणून काम करत होता. ती दोनतीन वेळा फोन करून त्यांची खबरबात घेत असे. सुनंदानेच पुढेही काम करावं अशी आमची इच्छा होती. परंतु ती आमच्या घरी येण्याआधी ज्या रुग्णाची काळजी घेत होती त्या घरी तिला पुन्हा बोलावण्यात आलं आणि आमचा नाइलाज झाला. 
मग ब्युरोने तिच्या जागी रेखा ही सेविका पाठवली. ती भिवंडीहून मुलुंडला येते. अंगणवाडी सेविका आहे. तीही आजीची उत्तम काळजी घेते. तिचं सगळं आवरून मगच जेवते. एक रात्री ती स्वयंपाकघरात बसून जेवत असताना मी काेथिंबीर निवडत होते तर म्हणाली, तुम्ही कशाला केलं, मी निवडली असती. नाहीतरी आजी झोपली की काहीच काम नसतं. आजी एखाद्या वेळी उठते फक्त रात्रीही. मग मी तिला मटार सोलायला दिले संध्याकाळीच आणलेले, ते तिने आजीशी गप्पा मारता मारता निवडून टाकले. आजी आता थोडा वेळ गप्पा मारण्याइतक्या बऱ्या झाल्या होत्या.
सकाळच्या बाईंचा थोडा गोंधळ झाला. आजीकेअरने मला ज्या बाईचे तपशील पाठवले होते ती २६च्या सकाळी आली तर नाहीच पण फोनही उचलेना. काय झालं होतं माहीत नाही पण तिच्याशी संस्थेचाही संपर्क होऊ शकला नाही. एरवी राखीव बाया असतात परंतु त्या दिवशी राखीव बाईलाही ताप आला, त्यामुळे ती येऊ शकली नाही. दुपारी चार वाजता संस्थेने मला कळवलं की त्यांच्याकडे १ तारखेपर्यंत बाई उपलब्ध नाही. मग मी दुसऱ्या ब्युरोच्या मांजरेकर बाईंना फोन केला. त्यांच्याशीही मी आधीच बाेलून ठेवलेलं होतं. त्यांनी दोन बाया ठरवलेल्या होत्या. मग दिवसासाठी हिराताईंना पाठवते, असं मांजरेकर बाई म्हणाल्या. या बाई घाटकाेपरच्या असल्फा परिसरात राहतात, घरनंच ब्युरो चालवतात. आजवर अनेकांना त्यांनी काम मिळवून दिलं आहे असं हिराताईंनी सांगितलं.
आजीकेअरच्या बायकांचे पैसे थोडे जास्त आहेत, कारण तो अधिक व्यावसायिक रीत्या चालवला जातो, त्यांचं स्वतंत्र आॅफिस आहे, वगैरे. त्यांचे पैसेही आजीकेअरच्या नावाने ट्रान्सफर करावे लागतात, आपण थेट बायांना द्यायचे नसतात. पण मांजरेकर बाईंच्या ब्युरोतल्या बायांना आपण थेट पैसे द्यायचे, त्या बायका बाईंना कमिशन घरी नेऊन देतात. आजीकेअरने मला बायांचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि लसीकरण यांचे तपशील कळवले होते. मांजरेकर बाईंनी नाही कळवले तसे. पण त्यांचाही नंबर त्यांची सेवा घेतलेल्या व्यक्तीनेच दिलेला होता त्यामुळे मी निश्चिंत होते.
तर हिराताईंचा नंबर त्यांनी मला कळवला होता. त्यांनी मला आदल्या दिवशी फोनही केला होता. फोनवर बोलताना मला साधारण जाणवलं होतं की त्यांना इंग्रजी वाचता येत नसावं. म्हणून मी त्यांना घरचा पत्ता, बस मार्ग, बाकी तपशील देवनागरीत लिहून कळवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मला एकही फोन करावा लागला नाही आणि त्या विनासायास घरी पोचल्या. हिराताई पन्नाशी नुकतीच ओलांडलेल्या. मूळ उस्मानाबादच्या, धनगर समाजातल्या. कमी वयात लग्न झालेल्या. हिराताई बडबड्या होत्या पण वचावचा बोलत नव्हत्या. त्यांनी सकाळी येऊन आजीचा जणू ताबाच घेतला. तिचं अंग पुसून दिलं, नाश्ता भरवला, औषधं दिली. मी चहा विचारला तर म्हणाल्या मला चहाची सवय नाही. दुपारी आजीची फिजिओथेरपी, जेवण, औषधं वगैरे आटपून आम्ही एकत्रच जेवायला बसलो. त्यांच्या डब्यात भाकरी आणि मेथीची भाजी होती. त्यांनी आम्हाला अर्धी अर्धी भाकरी खायलाच लावली. मीही त्यांच्यासाठी वरणभात टाकलाच होता. गप्पा मारत आम्ही मस्त जेवलो. दुसऱ्या दिवशी त्या माझ्यासाठी म्हणून दोन भाकरी घेऊन आल्या. आणि जेवायला बसलो तेव्हा म्हणाल्या, भाकरी उगीच करून आणल्या, उद्या पीठच आणते, गरम भाकरी करून घालते. आणि खरंच दुसऱ्या दिवशी त्या दोनेक किलो पीठ घेऊन आल्या. आजीलाही हळूहळू भूक लागू लागली होती, मग आजीला भाकरी करून दिली त्यातली.
एक दिवस त्या घरी केलेल्या शेवया घेऊन आल्या. आमच्या वेगळ्या असतात, तुम्ही खाऊन बघाच, असा हट्टच त्यांनी धरला होता. मला त्यावर काही बोलता आलं नाही. त्यांना आमच्या घरची आमटी आवडली फार. त्यांनी एक दिवस आणलेली भरली वांगी फारच भारी होती, मी एक दिवस तशी करायचा प्रयत्न नक्की करणार आहे.
हिराताईंनी काही वर्षं एका आॅर्थोपेडिक डाॅक्टरच्या दवाखान्यात काम केलं होतं त्यामुळे त्यांना फिजिओथेरपीचा थोडा अनुभव होता. आजीला कसं चालवायचं, किती आधार द्यायचा याचा त्यांना चांगला अंदाज होता. त्या खूप प्रेमाने तिचंही करत होत्या. मलाही स्वयंपाकघरात मदत हवी का, भाजी निवडू का, सतत विचारत असायच्या. सहासात दिवसांनी त्यांना गावाहून फोन आला की कोणीतरी वारलं. मग भावकीत असं करावं लागतं सांगत त्या गावी चालल्या. मी मांजरेकर बाईंना फोन करून दुसऱ्या बाईची सोय करवली, हिराताईंचे पैसे दिले, आणि निरोप दिला. हिराताई धीराच्या असाव्यात असं त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टींवरनं वाटलं. गोष्टी खऱ्याखोट्या माहीत नाही अर्थात, ती शहानिशा करणं मला शक्य नाही. एक म्हणजे त्यांचा मुलगा मनोरुग्ण झाला हाेता काही वर्षांपूर्वी. नातलगांनी त्याला येरवड्याला न्या असा सल्ला दिला. पण ताईंच्या डोक्यात एक गोष्ट फिट्ट असावी, येरवडा म्हणजे इलेक्ट्रिक शाॅक. आणि शाॅकमुळे मेंदूवर परिणाम होतो. त्यांनी पाच वर्षं त्याला सांभाळलं, अनेक डाॅक्टर केले आणि तो बरा झाला. आज तो चांगला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांची सून मुलीला जन्म दिल्यानंतर न्यूमोनिया होऊन दहाव्या दिवशी मरण पावली, तिच्या आईकडे होती तेव्हा अर्थात. पण हिराताईंनी त्या लहानगीला मुंबईला आपल्या घरी आणलं आणि त्या तिला प्रेमाने वाढवतायत. मुलगा असता तर ही गोष्ट कोणीही केली असती पण मुलगी असून केली याचं मला कौतुक वाटलं. त्या चौथी शिकल्या आहेत, मुंबईतल्या पालिकेच्या शाळेत. "मी आजवर कधी रस्ता चुकले नाही की एखादं घर मला सापडलं नाही असं झालेलं नाही कारण आपलं तोंड एरवी कशासाठी वापरायचं मग," असं त्या म्हणाल्या. ट्रेन पकडताना पण त्या रोज कोणाला विचारतात, ही ट्रेन घाटकोपरला जाते ना. म्हणाल्या, विचारलं तर कोण काय बाेलतंय आपल्याला, आहाेत अडाणी ठीकेय, की मग. 
हिराताई आजीशी बोलताना म्हणाल्या, मला जात्यावरच्या ओव्या खूप येतात. माझ्या मामीने अशा पाचशेहून अधिक ओव्या जमा केल्या आहेत आणि ती त्याचा कार्यक्रमही करते. त्यामुळे मला यात रस वाटला, म्हटलं तुमच्या ओव्या एक दिवस रेकाॅर्ड करू. मग दुसऱ्या दिवशी मला म्हणाल्या, रेकाॅर्ड करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी सांगा, चांगली साडी नेसून येईन. मग अचानक त्यांना गावी जायला लागलं. जायच्या आधी म्हणाल्या, दीदी, रेकाॅर्ड करायचं राहिलं आहे, मुद्दाम येईन त्यासाठी.

५.२.२२

काल सकाळी नवीन बाई आल्या. त्यांचं नाव अंजनाबाई. या साठी ओलांडलेल्या आहेत पण खुटखुटीत आहेत. दुपारी जेवताना गप्पा मारताना कळलं की त्या हाॅलिडे इन हाॅटेलमध्ये पोळ्या करायच्या कामावर होत्या. तिथनं निवृत्त झाल्या, काही दिवस घरी बसल्या. पण मग काहीतरी दुखतंय खुपतंय असं वाटायला लागलं. शांत बसणं जमेना. मग हे काम सुरू केलं. कंबर दुखायची म्हणुन डाॅक्टरने आॅपरेशन करायला सांगितलं होतं, कामाला सुरुवात केल्यावर कंबरदुखी गायब. त्यांचे वडील सैन्यात होते, त्यांनी छिंदवाड्यात घर केलं. त्यामुळे यांचं लहानपण तिथे, शाळा हिंदी माध्यमाची. मराठी वाचता येत नाही नीट म्हणाल्या, काहीकाही अक्षरं वेगळी असतात. मग आमची आजी हिंदी शिक्षिका म्हणून निवृत्त झाली सांगितल्यावर खूष झाल्या. मुख्य म्हणजे आजीला नवीन बाई कशा असतील याचं टेन्शन होतं, ते दूर झालं.

१९.२.२२
दोन्ही बाई चांगल्याच रुळल्या, आमच्या आजींचंही नीट जमलं त्यांच्याशी. अंजनाबाई प्रेमाने आईशी बोलायच्या, औषधं, जेवण, अंग पुसणं, व्यायाम, सगळं नीट करायच्या. रात्री यायची ती गौरी तर उत्साहाचा झरा. आल्या आल्या, आई, मी आलेय. कशी आहेस तू? अशी हसऱ्या चेहऱ्याने विचारणा करायची. रात्रीचं जेवण, औषध, तेल लावून देणं, मच्छरदाणी लावून तिला झोपवणं सगळं मनापासून करायची. आई झोपली की मग जेवायची. सकाळी पण घरी जायची घाई नसायची तिला. दिवसाच्या बाई आल्यानंतरच ती निघायची.

आजीची पाठदुखी थोडी कमी झाली होती पण उजवा पाय प्रचंड दुखायला लागला होता. पायावर सूज आली होती. एकदा वेदना सुरू झाल्या की दोनेक तास तर उतारच पडायचा नाही. या दोघी मदतनीस तेव्हा हर प्रकारे आजीचं दु:ख कमी करायचे प्रयत्न करायच्या. ती रडत असली तर ओरडायच्या. रडू नकोस, रडण्याने आणखी दुखेल. आपण हे करू, ते करू, असं समजवायच्या. मग ते दुखणं वाढलं आणि आजीला पुन्हा रुग्णालयात भरती करावं लागलं. एका सकाळी सोनोग्राफीसाठी नेलं तर अंजनाबाई सोबत आल्याच. त्यांची मला तिथे खूप मदत झाली. पण मग आजीला पुन्हा भरती करावं लागल्याने या दोघींना तात्पुरती रजा दिली. आता पुढच्या आठवड्यात आजी घरी आली की ठरवू.

माझ्यासाठी हा असा अनुभव पहिलाच होता. सांभाळणाऱ्या बाई लागणार हे निश्चित होतं. आणि १२ तासांच्या दोन की २४ तास घरीच राहणारी एक असे दोन पर्याय होते. २४ तास राहणाऱ्या बाईसाठी पैसे कमी माेजावे लागतात. पण तिचं आंघोळ, कपडे धुणं, जेवणखाण सगळंच आपल्या घरी होतं. १२ तासांची बाई जेवणाचा डबा घेऊन येते, तिची आंघोळ तिच्या घरी करून येते. अर्थात चहा, नाश्ता तिचाही होतोच. मला दोघींचा पर्याय आवडला म्हणून दोघी ठेवल्या. ब्यूरोतून बाई येत असेल तर एखाद्या दिवशी सुटी घेतली तर तिच्या ऐवजी बदली बाईही मिळतेच. त्यामुळे सहसा प्रश्न येत नाही. अर्थात कोणता पर्याय निवडायचा ते आपलं आपण ठरवायला हवं.

दुपारच्या बाई आमच्याबरोबरच जेवायला बसायच्या. त्यांची पोळीभाजी असायची. वरणभात आम्ही गरम आमच्यासाठी लावायचो त्यातला त्याही जेवायच्या. तसं तर दोघींनाही भाताची सवयच नव्हती. अंजनाबाईही एक दिवस आजीला मीठ खायचं जास्त म्हणून घरी केलेले बटाटा वेफर्स आणि सांडगे घेऊन आल्या. आजीला आम्ही रोज शहाळ्याचं पाणी देत होतो. एक दिवस त्यांनी विचारलं की शहाळं कितीला आणता? म्हटलं, साठ रुपये. तर म्हणाल्या, आमच्या इथे गाडी असते तिथे शंभरला तीन मिळतात, आणू का? मी कशाला नाही म्हणतेय, होच म्हटलं. मग त्यांनी तीनदा आणली शहाळी. तीन शहाळी तशी जडच होतात, पण ट्रेनमधनं त्यांनी आणली खरी.

घरी मदतनीस बाया येत आहेत हे कळल्यावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. अनेकांना खूप वाईट अनुभव आलेले होते. पण आम्हाला चांगलेच आले हे निश्चित. मी आईला त्यांच्यावर सोपवून निश्चिंत होते. थोडीफार का होईना, माझी कामं मला करता येत होती. याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. आणि त्या हे काम निव्वळ कर्तव्य पार पाडतोय या भावनेने करत नव्हत्या, तसं करत असत्या तरी त्यात तक्रार करण्याजोगं काही नव्हतं. पण त्यांनी जीव लावला होता. सगळीकडेच लावत असतील कदाचित, कदाचित नाहीदेखील. आजीचं आॅपरेशन नीट झालं, ती बरी आहे असा मेसेज मी काल रात्री अकरानंतर अंजनाबाई आणि गौरी दोघींना केला. अंजनाबाईंचा लगेच फोन आला, मी वाटच बघत होते तुमच्या मेसेजची, बरं झालं कळवलंत. गौरीचंही लगेच उत्तर आलं. मला याचं अप्रूप वाटतं.

आजारी व्यक्तीची सेवा हे फार कठीण काम आहे असं मला वाटतं. त्या व्यक्तीची मानसिक स्थितीही अनेकदा फारशी चांगली नसते. ती व्यक्ती चिडून काहीही बोलते, असहकार पुकारते, तिला चुचकारून लहान मुलासारखं बाबापुता करून खाऊ घालणं, स्वच्छता ठेवणं हे काम सगळ्यांना जमण्यासारखं नाही. अगदी कितीही पैसे मिळत असेल तरी. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर वाटतो. आणि असे ब्युरो जे चालवतात त्यांचंही कौतुक वाटतं. कारण त्यात मोठी जबाबदारी आहे. ती जे झेपवतात त्यांच्याबद्दल आदर, काैतुक सगळंच. 

हे सगळं फार बालिश, वरवरचं, थोड्या अनुभवावर आधारित, naive असं वाटू शकतं अनेकांना, कारण याच्या उलटे अनुभवही येतच असतात, ऐकिवात आहेत. पण हा माझा अनुभव आहे, आणि तो मांडावासा वाटला.
 

Comments