माझा प्रवास फेस्टिवल


मला लहानपणापासून प्रवासाची आवड होती का, हे नक्की सांगता येणार नाही. पण आता गेली काही वर्षं आवडतो, हे निश्चित. एकटीने अधिकच. पत्रकार असल्याने कामाच्या निमित्ताने तशी संधीही मिळते. लिटरेचर फेस्टिवलच्या निमित्ताने जयपूरला पाच वेळा जाणं झालं. २०१२मध्ये सर्वप्रथम मी या फेस्टिवलचे वार्तांकन करण्यासाठी गेले. ट्रेनचा १८ तासांचा काहीसा कंटाळवाणा प्रवास आहे हा. त्यातली गंमत म्हणजे सवाई माधोपूर स्थानकातून ट्रेन मागे येते मग दुसऱ्या दिशेने जयपूरकडे निघते. या स्थानकात उतरले होते पूर्वी, रणथंभोर जंगलाच्या सफारीसाठी आले होते तेव्हा. या स्थानकात गाडी शिरते त्याच्या काही मिनिटं आधी डावीकडे एक जुनाट पण आकर्षक बांधकाम दिसतं. चित्रपटगृह आहे ते. प्रकाश नावाचं. मला ते फार आवडलं पाहताक्षणी. पण तेव्हा फोटो नाही घेता आले. परतीच्या प्रवासात मला वाटतं रात्र होती, त्यामुळे फोटो नाही घेता अाले. मग पुढच्या वर्षी मी पुन्हा फेस्टिवलसाठी गेले तेव्हा, सवाई माधोपूर यायची वेळ झाली तेव्हा कॅमेरा हातात घेऊन दारात उभी राहिले. टीटीई होता दारात, त्याने विचारलं, क्या चाहिए? म्हटलं, ‘वो थिएटर की फोटो लेनी है, पिछले साल से इंतजार कर रही हूँ।’ तर त्याला अगदी आठवणींचे कढच आले. म्हणाला, ‘हे माझ्या मित्राच्या वडलांच्या मालकीचं. शाळाकाॅलेजात असताना कित्येक सिनेमे पाहिलेत इथे.’

जयपूरला पोचले. फेस्टिवलचं ते पाचवं वर्ष असेल. थंडी होती बऱ्यापैकी, जन्माने आणि कर्माने मुंबईकर असलेल्या मला जरा वैतागवाणीच ती. जे काही जुनापुराणं स्वेटर, शाल होतं ते फारसं पुरेसं पडत नव्हतं. दिवस संपल्यावर रिक्षाने हाॅटेलवर परत जाताना तर बर्फ व्हायचा माझा. मग रूमवर जायचं, गरम सूप मागवायचं, आणि ब्लँकेटमध्ये स्वत:ला गुंडाळून बातमी पाठवायला लॅपटाॅप उघडायचा.

जयपूर लिटरेचर फेस्टिवल डिग्गी पॅलेस या प्रशस्त हवेलीच्या परिसरात आयोजित केला जातो, अगदी पहिल्या वेळेपासून. दोन बंदिस्त सभागृहं आणि मैदानांवर मांडव घालून तयार केलेली चार अशा सहा ठिकाणी पाच दिवसांत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळात एकेक तासाची सत्रं होतात. यंदा १८५ सत्रांमधनं जवळपास ५०० लेखक/वक्ते सहभागी झाले होते. या फेस्टिवलमधली बहुतेक सगळी सत्रं एखाद्या नवीन आलेल्या पुस्तकाच्या भोवती गुंफलेली असतात. यात अनेक विषय असतात, निव्वळ साहित्यिक मूल्य असलेल्या कादंबऱ्या, कवितासंग्रह असतातच, परंतु नाॅन फिक्शन प्रकारातली पुस्तकं जास्त असतात. त्यात राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांच्याविषयीची पुस्तकं असतात. उदा. यंदा झालेल्या काही सत्रांचे विषय होते - ब्रेक्झिट, अनुवादाचं कौशल्य, लेखन कसं करावं, स्त्रीवाद, जेंडर, पुराणं, इजिप्त, हिंदुत्व, इतिहास, हवामानातला बदल, वगैरे. या सत्रांमध्ये पुस्तकांचे लेखक, राजकीय नेते, कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक सहभागी झाले होते. यंदा ज्या पुस्तकांवर चर्चा झाल्या, त्यातली काही अशी होती - The sixth string नमिता देवीदयाळ, Gene machine - The Race to Decipher the Secrets of the Ribosome डाॅ. वेंकी रामकृष्णन, Shyam an illustrated retelling of the bhagavata देवदत्त पटनायक, Newsman: Tracking India in the Modi Era राजदीप सरदेसाई, Healed: How Cancer Gave Me a New Life मनीषा कोईराला, Poonachi पेरुमल मुरुगन, Not quite not white शर्मिला सेन, Daughters of the Sun: Empresses, Queens and Begums of the Mughal Empire इरा मुखोटी, Jahangir: An Intimate Portrait of a Great Mughal पार्वती शर्मा, after trainspotting आयर्विन वेल्श, Empire Of Cotton: A Global History स्वेन बेकर्ट, इ.

यावरनं विषयांच्या व्याप्तीचा अंदाज येऊ शकतो. तसंच यातली बरीच पुस्तकं ही ललित साहित्य या प्रकारात मोडणारी नाहीत, हेही कळून येतं, अपवाद मुरुगन यांच्या पूनाची या कादंबरीचा. या पुस्तकाविषयीच्या सत्रात मुरुगन स्वत:, त्यांचे अनुवादक, आणि प्रकाशकही सहभागी झाले होते. मुरुगन तामिळमधूनच बोलत होते. प्रेक्षकांमध्ये तामिळ लोक होते कारण त्यांच्या बोलण्यानंतर अनुवादक बोलण्यापूर्वीही टाळ्या पडत होत्या किंवा हशा येत होता. प्रकाशकाला चर्चेत सहभागी करून घेण्याची कल्पना आवडली कारण अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशकाची भूमिका एरवी माझ्यापर्यंत पोचणं कठीणच.

यंदा हिंदीत काही सत्रं होती, राजस्थानी साहित्याविषयीची एकदोन. तामिळ लेखिका सलमा याही तामिळमधूनच बोलल्या, मनोरंजन ब्यापारी बंगालीतून बोलले. कन्नड लेखक जयंत कैकिणी यांची मुलाखत होती. पण बाकी भारतीय भाषांना स्थान नव्हतं. हिंदीतही गुलजार, जावेद अख्तर, उदय प्रकाश ही नेहमीची यशस्वी नावं अधिक. मी गेले होते तेव्हा एका वर्षी भालचंद्र नेमाडे यांची कोसलाच्या इंग्रजी अनुवादाच्या निमित्ताने मल्याळी लेखक जीत थयिल यांनी मुलाखत घेतली होती, एका वर्षी ऊर्मिला पवार यांचा आयदानच्या निमित्ताने सत्रात सहभाग होता.

भारतीय भाषांना स्थान देणारा फेस्टिवल हवा आणि व्यापारीकरण नको अशा भूमिकेतून जयपूरमध्येच समानांतर साहित्य उत्सव गेल्या वर्षीपासून सुरू झाला आहे. विद्रोही साहित्य संमेलनासारखाच हा उपक्रम, परंतु सध्या तरी फारसा प्रतिसाद नसलेला. आम्ही मुद्दाम तिथे चक्कर मारली पण फारसे प्रेक्षक नव्हते आणि रिकाम्या खुर्च्यांसमोरच वक्ते बोलत होते. यात एकदोन मराठीतही सत्रं होती, असं उपक्रमाच्या वेबसाइटवरनं कळलं. यामागची थोडी कथा एका पत्रकाराने सांगितली. कन्हय्यालाल सेठिया हे राजस्थानातलं साहित्यातलं मोठं नाव. त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही करावं असं काही साहित्यिकांसमोर बोलून दाखवलं. त्यासाठी त्यांच्या गावात काही करावं असा प्रस्ताव होता. परंतु ते गाव जयपूरपासून फार दूर असल्याने तिथे जाण्याऐवजी जयपुरात हा उत्सव सुरू झाला. कदाचित आणखी काही वर्षांनी त्यालाही जेएलएफसारखी गर्दी होईल. (पण जेएलएफमध्ये भारतीय भाषांना अधिक स्थान हवंच, ही मागणी का करावी, हे पटलं नाही. हा काही सरकारी उपक्रम नाही, तो एक खाजगी कार्यक्रम आहे. असो.)





डाॅ. वेंकी यांच्याबरोबर काढलेला सेल्फी

तर, फेस्टिवल सतत एकाच ठिकाणी होत असल्याने अनुभवाचा, चुकांमधून शिकण्याचा फायदा निश्चितपणे हाेतो. तो तिथे जाणाऱ्या प्रत्येकाला जाणवतोच. यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागतं, मदतनीस म्हणून काम करण्यासाठी अर्ज मागवले जातात आणि अनेक विद्यार्थी हा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. या विद्यार्थ्यांचा संबंध साहित्याची असतोच असं नाही. पण तरीही कामाच्या निमित्ताने मोठमोठ्या व्यक्तींना भेटता येतं, हे त्यांना मोलाचं वाटतं. या सगळ्यासाठी, लेखक/वक्त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी पैसा लागतो आणि तो प्रायोजकांच्या मार्फत येतो. झी काही वर्षांपासून मुख्य प्रायोजक आहेत व फेस्टिवल झीजेएलएफ या नावानेच ओळखला जातोय सध्या. बाकी गूगल, दैनिक भास्कर, राजस्थान पत्रिका, मातृभूमी, ब्रिटिश कौन्सिल, डेल, आदि अनेक प्रायोजक आहेत. काही सभागृहांना प्रायोजकांची नावं देण्यात येतात. किंवा काही सत्रांमध्ये प्रायोजकाचं नाव पडद्यावर दिसतं. अन्यथा सतत या नावांचा मारा प्रेक्षकांवर होत नाही, जाहिरातबाजी होत नाही, ते फार नजाकतीने subtly केलं जातं. एकाच ठिकाणी फेस्टिवल होत असल्याने काय कुठे असणार, ते नव्याने ठरवण्याची गरज भासत नाही, फक्त त्यात काही सुधारणा हवी असल्यास त्या करण्यासाठी वर्षभर वेळ असतो. एक फेस्टिवल संपताना पुढच्या वर्षीच्या तारखाही जाहीर केल्या जातात, इतकं जबरदस्त नियोजन केलेलं असतं. फेस्टिवल टीमवर्क आर्ट्स या कंपनीतर्फे आयोजत केला जातो. ही कंपनी भारताबाहेरही असे फेस्टिवल व इतर कार्यक्रम आयोजित करत असते. हे सगळं आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शेजारी मांडलं तर कुठे गडबड होतेय ते सहज स्पष्ट होतं. टीमवर्कचे सर्वेसर्वा संजय राॅय यांच्याशी मी मुद्दाम या विषयासंबंधी बोलले, तेव्हा त्यांनी हे मुद्दे मांडले. एकच ठिकाण आणि आगाऊ उत्तम नियोजन आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. पैसा आमच्याकडेही सुरुवातीला नव्हताच, असं ते म्हणाले.

तर पहिल्या वेळची गोष्ट. सकाळी डिग्गी पॅलेसला पोचले. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर असा एखादा कार्यक्रम पाहात होते. आधी ओळखपत्र गळ्यात घातलं, फेस्टिवलमध्ये कुठेही फिरण्याची मुभा त्याच्यामुळे मिळणार होती. मग हातात घेतलं आडवीच्या आडवी पसरलेली कार्यक्रमपत्रिका. पाच दिवसांचे कार्यक्रम त्यात होते, तेही एका वेळी पाच किंवा सहा सत्रं. त्यामुळे किती वाजता काय आहे, काय नक्की ऐकायचंय, हे ठरवणं हा मोठाच कार्यक्रम असतो. अनेकदा असं होतं की एकाच वेळी दोन किंवा तीन कार्यक्रम अगदी ऐकावेच असे असतात, मग ठरवणं फार कठीण होऊन जातं. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला ही पत्रिका दिली जाते, त्यामुळे वेळोवेळी हा कागद उलगडून त्यात डोकं घालून बसलेले खूप लोक दिसतात.

मी आतापर्यंत चार वर्षं हाॅटेलमध्ये राहिले होते तिथे. यंदा होमस्टे हा पर्याय शोधायचं ठरवलं. नुकतीच माझी लेक पुदुचेरीला गेली होती solo trip वर, ती अशी राहिली होती. तिला ते फार आवडलं होतं. मग तिच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू केली. लेकीकडनं super host ही संकल्पना एेकली होती. म्हणजे या यजमानांकडे सोय उत्तम असते, सुरक्षित असतं, आणि तक्रारी सहसा नसतात. मग मी एक्स्प्लोरर्स नेस्ट हे ठिकाण निवडलं. त्याचा यजमान, सुपरहोस्ट, सैन्यातला माजी अधिकारी आहे, दहाएक वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडून हे सुरू केलंय. मी त्याला काही प्रश्न विचारले, त्याने माझी माहिती घेतली. फोटो छान दिसत होते. सोयीही चांगल्या होत्या. आणि खिशाला परवडणारं होतं. मग त्याच्याकडे राहण्याचं निश्चित केलं.

पोचलो तर बंगल्यांची निवांत काॅलनी. पहिल्या मजल्यावर जाणारा जिना. भरपूर झाडं. गेल्या गेल्या मोठी गॅलरी किंवा छोटी गच्ची. त्यात टेबलखुर्च्या. समोर एक खोली. उजव्या हाताला जुन्या हवेलीचा असावा असा लाकडी दरवाजा. आत गेल्यावर पन्नासेक वर्षं मागे गेल्यासारखं वाटलं. दिवाणखाना जुन्यापुराण्या वस्तूंनी भरून गेलेला. वेगवेगळे टेलिफोन, ट्रान्झिस्टर्स, कपाटं, चिलखत, आणि चक्क एक ग्रामोफोन, तोच तो एचएमव्हीच्या जाहिरातीत दिसतो तसा. या धक्क्यातून सावरत आत गेलो, डाव्या हाताला छोटं स्वयंपाकघर, जेवणाचं टेबल, उजव्या हाताला एक खोली. आणखी आत गेलो तर रिकामा चौक आणि उजवीकडे आमची खोली. छोटीशीच पण नेटकी, स्वच्छ. सामान ठेवलं, आणि चहा सांगितला तिथल्या मदतनीसाला. हे होते विष्णूजी, नेपाळी, साठीचे असावेत. मोजकं बोलणारे. काहीही सांगितलं की जी, इतकंच उत्तर. चहा घेत होतो तो यजमान आले, अरविंद ग्रोव्हर. ५५ ते ६०च्या दरम्यानचे असतील. गुरखे घालतात तशी उंच टोपी, कोट वगैरे जामानिमा कारण प्रचंड थंडी होती. अरविंदजी सैन्याच्या वाहतूक विभागात होते. बराच भारत फिरलेले. अशाच एका प्रवासात तो भरभक्कम दरवाजा त्यांना मिळाला होता. पाच हट्टेकट्टे सैनिक तो उचलायला लागले होते, इतकं त्याचं वजन आहे.




चार्ल्स डार्विन यांची खापरखापरपणती डाॅ. रूथ पडेल

फेस्टिवलची वारी सुरू झाली.

दुसरा दिवस असेल. मीडिया गॅलरीत बसून बातमी लिहीत असताना टेबलावर सॅक धप्पकन टाकून शेजारच्या खुर्चीवर एक मुलगी येऊन बसली, आणि 'ईश्वर!' असं म्हणून तिने एक सुस्कारा सोडला. 'क्यों ईश्वर को याद कर रही हो?' असं विचारल्यावर म्हणाली, 'अब इतनी भागदौड करने के बाद बैठने मिला है, तो ईश्वर को ही याद करूँगी ना?'


'कौन से पेपर के लिए लिख रही हो?'


'मैं ब्लाॅगर हूँ फेस्टिवल के ब्लाॅग लिखती हूँ।’


फेस्टिवलमध्ये होणाऱ्या सत्रांविषयी ब्लाॅग लिहिण्यासाठी स्पर्धा घेऊन सहा जणांना ब्लाॅगर म्हणून निवडण्यात येतं. त्यात ही निवडली गेली. सत्र संपलं की विशिष्ट वेळाच्या आत ब्लाॅग लिहून फेस्टिवलच्या वेबसाइटवर टाकण्याचं बंधन या ब्लाॅगर्सवर असतं.

तिसरा दिवस. विख्यात तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांची मुलाखत झाल्यानंतर प्रश्नोत्तरं सुरू होती. सतराअठरा वर्षांची वाटावी अशा मुलीने त्यांना प्रश्न विचारला, 'इंग्रजी साहित्य आणि बाकीच्या भाषांमधलं (other or regional) साहित्य असा उल्लेख सर्रास केला जातो, तर भारतीय भाषांना बाकीच्या असं म्हणण्याबद्दल काय वाटतं?' लेखक हसले आणि त्यांनी सांगितलं, 'भारतभूमीत निर्माण होणाऱ्या सर्व साहित्याला भारतीय साहित्यच म्हणायला हवं.' प्रश्न वरवरचा नव्हता, त्यामागे काही विचार होता, म्हणून लक्षात राहिला. यानंतर काही तासांनी ती मुलगी चहा पिताना शेजारीच होती असं जाणवल्यावर तिच्याशी बोलण्याचा मोह आवरला नाही. 'तुझा प्रश्न चांगला होता, काय करतेस तू?' ती फेस्टिवलला आली होती ब्लाॅगर म्हणून. इंग्रजी साहित्य विषय घेऊन दिल्लीच्या लेडी श्रीराम काॅलेजमधून बीए झाली. पुढच्याच महिन्यात ती जपानला जातेय, जपानी भाषाशास्त्र शिकायला. तिचं नाव स्वस्तिका जाजू. वय वर्षं २१. स्वस्तिका इंग्रजीतून लिहिते, तर वृषाली हिंदीतून.

फेस्टिवल संपायला काही तास असतात. जेवताना शेजारी येऊन बसतात तामिळ कवयित्री/कादंबरीकार आणि राजकीय नेत्या सलमा. त्यांची मुलाखत आदल्याच दिवशी ऐकलेली असते आणि त्यांच्या विलक्षण आयुष्याने मनात घर केलेलं असतं. लहान वयात लग्न झालेलं. कविमन शांत बसत नाही, पण स्वत:च्या नावाने कविता प्रसिद्ध करण्याचं धारिष्ट्य नाही. बाईच्या लैंगिक जाणिवांविषयीच्या त्या कविता कोणत्या कोणत्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या, त्यांचा संग्रहही प्रसिद्ध झाला. पण नाव नाही. या संग्रहाच्या प्रकाशनाला सलमा गेल्या, पण कोणालाच माहीत नव्हतं की हीच ती कवयित्री. तब्बल बारा वर्षं त्यांनी अनामिक राहून कविता लिहिल्या. याच सुमारास त्या ३३ टक्के आरक्षणामुळे राजकारणात उतरल्या, सरपंच झाल्या. माझ्यापेक्षा हिलाच राजकारण चांगलं जमतं, अशी पावती पतीनेच दिलेली. यानंतर लेखन सुरूच राहिलं असलं तरी त्यांच्यावर त्यांची स्वत:चीच सेन्साॅरशिप असल्यासारखी. द्रमुक पक्षाच्या त्या मोठ्या नेत्या. आता आपण काही लिहिलं आणि त्याचा वेगळाच परिणाम झाला तर, अशी भीती त्यांना वाटते. सध्या त्या दोन कादंबऱ्यांवर काम करत आहेत.

फेस्टिवलला यंदा चार लाख लोक येऊन गेले, असं टीमवर्कने जाहीर केलंय. प्रत्येक व्यक्तीच्या ओळखपत्रावर बार कोड असतो, आणि ओळखपत्र रोज एकदा स्कॅन होतं. गेल्या वर्षी ही संख्या पाच लाख होती साधारण, म्हणजे फेस्टिवलची क्रेझ कमी झाली आहे, असं म्हणायला वाव आहे. मी मुंबईत काही वर्षांपासून होणारे टाइम्स लिटरेचर फेस्टिवल (हा बांद्र्यात मेहबूब स्टुडिओच्या आवारात होतो) आणि टाटा लिटफेस्ट (हा एनसीपीएमध्ये होतो) पाहिले आहेत. या दोन्हींचा मूळ आराखडा जयपूर फेस्टिवलवरच बेतलेला आहे. काही लेखक तर तिन्ही फेस्टिवलमध्ये सहभागी होतात. कोलकाता, चेन्नई, कोची, बंगळुरू, लखनऊ, दिल्ली इथेही अशा प्रकारचे फेस्टिवल्स आता होऊ लागले आहेत. फक्त डिग्गी पॅलेसइतकी जागा तिथे नसते. हा मोठा फरक. आणि एकूणच जयपूरची काहीशी राजेशाही संस्कृती, मस्त थंडी, स्थानिक चविष्ट पदार्थ, यांनी फेस्टिवलचा माहोल बनतो. पाहात राहाण्याजोगा असतो तरुणवर्ग. मुंबईकरांनी गरम कपडे हा प्रकारच माहीत नसतो, असला तर एखादा स्वेटर किंवा शाल तर. त्यामुळे पहिल्या वर्षी तर मी आजूबाजूच्या मुलामुलींचे, क्वचित मध्यमवयीन बायांचेही गरम कपडे पाहात बसले होते. कांथा वर्कच्या शाली, अंगरखे, गुडघ्यापर्यंतचे बूट, जर्किन, कोट, कार्डिगन, टोप्या… अमर्याद यादी. पाचही वर्षं मी अशी बुभुक्षितासारखी पाहात आलेय.

तरुण मुलंमुली इथे येतात ती फाेटो काढायला, आणि अर्थात ते सोशल मीडियावर टाकायला. शिवाय वेगवेगळे पदार्थ चाखायला. पण कार्यक्रमांमध्येही ती तेवढीच रंगतात, सामील होतात. गुलजार, जावेद अख्तर यांच्या कार्यक्रमांना पाय ठेवायला जागा नसते इतकी गर्दी असते. संजय राॅय यांनी गायिका उषा उत्थुप यांची मुलाखत घेतली तेव्हा तरुणांनी ती प्रचंड एंजाॅय केली. त्यांनी we are the world हे गाणं गायलं तेव्हा किती तरी जणांनी त्यांच्या आवाजात आवाज मिसळला, मोबाइलचे टाॅर्च लावून तिथे मस्त वातावरण उभं केलं. अनेक गंभीर चर्चांमध्येही ती सहभागी होतात. चांगले प्रश्न विचारतात. पुस्तकं विकत घेतात. त्यांची राजकीय मतं असतात आणि ती व्यक्त करतात. LGBTQ चळवळ वा तशा व्यक्तींना ती पाठिंबा दर्शवतात. त्यांच्या उत्साहाचं लोण साथीसारखं पसरणारंच असतं. पण राजकीय चर्चाही ते ऐकतात. शशी थरूर, राजदीप सरदेसाई, रवीश कुमार, तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. तरुणांचं तिथे असणंच ऊर्जादायी असतं हे नक्की.

फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या लेखकांना प्रत्यक्ष ऐकणं हा अनुभव अर्थात खास असतो. पत्रकार असल्याचा फायदा अशा वेळी मिळतोच. नाहीतर ज्या जेफ्री अार्चर यांचे शब्द धरून मी इंग्रजी वाचनाकडे वळले त्यांच्याशी अगदी जवळून बोलण्याची संधी मिळती ना. ते क्रिकेटचे फॅन. यंदाची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होतेय काही महिन्यांत. तेव्हा कोण जिंकेलसं वाटतं असं विचारलं तर म्हणाले, इंग्लंडला चांगली संधी आहे पण भारताची टीमही जबरदस्त आहे. त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला होता की, तुमची लिखाणाची पद्धत काय आहे. ते म्हणाले, मी काही शिस्तबद्ध लेखन करत नाही. सुचेल तेव्हाच लिहितो आणि मला जे जग माहीत आहे त्याबद्दलच लिहितो. मी भारतात अनेकदा अालो असलो तरी मला भारत त्या अर्थाने ठाऊक नाही, त्यामुळे मी भारताबद्दल नाही लिहिणार. तुम्ही रोज सायकलने प्रवास करत असाल, तर त्याबद्दल लिहा, पण जे माहीत नाही त्याबद्दल लिहू नका, असं आवर्जून सांगितलं त्यांनी.

तीच गोष्ट विख्यात नृत्यांगना सोनल मानसिंग यांची. त्या बोलत असताना त्यांची देहबोली, डोळे, विलक्षण बोलका चेहरा पाहात राहावा असा. किंवा साक्षात चार्ल्स डार्विन यांची खापरपणती कवयित्री व कादंबरीकार रूथ पडेल यांच्याशी गप्पा मारता येत्या ना. रूथ पडेल कवयित्री आहेत, त्यांनी त्यांची जयपूर ही कविता वाचून दाखवली. शास्त्र आणि कविता दोन्हीला अचूकपणा हवा असताे, असं सांगून त्या म्हणाल्या की, मी कवितेतही कल्पनाशक्ती वापरली तरी ती शास्त्राच्या नियमांना धरून असते.

मी मीडिया रजिस्ट्रेशन केलं होतं त्यामुळे जेवणाची वेगळी सोय होती, सर्व लेखकांची वा वक्त्यांची असते तिथेच. तिथेच एकदा आर्चर भेटले, तर नोबेल विजेते जीवशास्त्रज्ञ डाॅ. वेंकी रामकृष्णन आम्ही बसलो होतो तिथेच बाजूला उभं राहून ब्रेक्झिटवरची चर्चा एेकत होते. या अत्यंत आवेशपूर्ण चर्चेनंतर त्यांनी शांतपणे एक निरीक्षण नोंदवलं. ते म्हणाले, ‘मी भारत, इंग्लंड, आणि अमेरिका या तीन देशांत राहिलो आहे. इंग्लंडमध्ये गरिबांवर किंवा उपेक्षितांवर होणारे अत्याचार, तसंच वर्णद्वेषाचे अनुभव, बाकीच्या दोन देशांपेक्षा वेगळे नाहीत. दक्षिण भारतातल्या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होणाऱ्या विवाहविषयक जाहिराती पाहिल्या तरी अंदाज येईल.’ त्यांच्या शेजारी उभं राहून, त्यांना कळणारही नाही, अशा पद्धतीने सेल्फी काढायचा मोह नाहीच आवरला मी. नोबेल विजेते असे नेहमीनेहमी नसतात आसपास ना आपल्या? डॅनियल लिबरमन नावाच्या लेखकाच्या सत्रातही डाॅ. वेंकी यांनी प्रश्न विचारले. लिबरमन धावण्याचा शरीरावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करतात. मानवी शरीर धावण्यासाठीच निर्माण झालेलं आहे, असं त्यांचं मत आहे. आदिमानवापासून आपण आजवर कसे आलो, यावर त्यांचा या अंगाने अभ्यास सुरू आहे. ते अनवाणी मॅरेथाॅनही धावतात. जयपूरमध्ये २६ जानेवारी रोजी ते अर्धमॅरेथाॅन धावले होते. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, या शहरात चालायला पदपथही नाहीत!

आवडत्या लेखकाचं पुस्तक हातात घेऊन त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी रांगेत उभी असलेली शंभरेक तरुण मुलंमुली पाहून आपणही एक पुस्तक लिहायला घ्यावं, असं वाटायला लागतं. पुस्तकांच्या दुकानातल्या गर्दीमुळे तिथे जाऊ नये असं वाटतं, हेही छानच की. देशभरातून पत्रकार तिथे येतात. त्यांच्याशी बोलता येतं. एक दिवस मी बातमी लिहीत होते. समोर घरनं नेलेल्या चकल्यांचं पाकीट होतं. समोर बसलेल्या एकाला ते देऊ केलं. तो होता दिल्लीवाला. म्हणतो, 'ये क्या है?' बाप रे, ये चकली नहीं जानता! म्हटलं, 'इसे चकली कहते है.' म्हणे, 'साउथ इंडियन शाॅप्स में देखा है, पर खाया नहीं कभी.' म्हटलं, 'खा के देखो.' तर इतकुसा नखाएवढा तुकडा घेऊन चव घेतलीन. पण चकलीच ती, आवडलीच त्याला. दिल्लीवाल्याला चकलीची चव दाखवल्याचं पुण्य पदरात जमा झालं, ते वेगळंच.

पाठीशी पुण्य असणार आधीचं थोडं. त्याशिवाय आमच्या हामस्टेच्या होस्टकडचा फोनो चालू असून त्यावर गाणंही ऐकता आलं नसतं. पहिल्यांदाच ती तबकडी फिरताना, त्यातनं गाणं बाहेर येताना पाहिलं‌/ऐकलं, त्यामुळे ते लवकर विस्मरणात नाही जाणार हे नक्की. यंदाच्या जयपूर भेटीतला हा जपून ठेवावा असा अनुभव.

Comments

  1. Mala vat te Marathi bhashechi festival hee vyawsaaik rupat hot baahut.
    Guntwnuk mhnle ki MSAP kiwa MSMM yaana gham fut to karan sagle fukkat pahije aste.
    Postala 500 rupaye bharun ek diwsasathi Sachitra smarak shikka banwnyaachi aaipat naahi,
    Lit Fest hyanchya maryade baherchi gosht aahe

    ReplyDelete

Post a Comment