आजच्या
आंतरराष्ट्रीय महिला दिनाची केंद्रीय भूमिका आहे #balanceforbetter म्हणजे
सुस्थितीसाठी समतोल. आता हा समतोल आपल्या आजूबाजूला दिसतो का याचा विचार
केला तर काय लक्षात येते? वरवर पाहिले तर भारतात अधिक महिला शिकू लागल्या
आहेत, अधिक महिला घराबाहेर पडू लागल्या आहेत. (पण कमावणाऱ्या महिलांची
संख्या कमी होते आहे ही चिंतेची बाब डोळ्यांआड करून चालणार नाही.) विसाव्या
शतकाच्या शेवटीशेवटी जी कार्यक्षेत्रे फक्त पुरुषांची मक्तेदारी होती
त्यातली बहुतेक कामे महिलाही करू लागल्या आहेत. संरक्षण क्षेत्रातही महिला
धडाडीने काम करत अाहेत. त्या लढाऊ वैमानिकही आहेत. पण अजून हे सगळे
सहजगत्या, नैसर्गिकरीत्या होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. चाकोरीबाहेरचे
क्षेत्र निवडणाऱ्या प्रत्येकीला विरोधाला सामाेरे जावेच लागते, समाजाशी
नसेल तर घरातल्यांशी संघर्ष करावाच लागतो. अनेक घरांमध्ये अशी परिस्थिती
आहे की, साध्या १० ते ५ नोकरीसाठीही घराबाहेर पडण्यावर बंधने आहेत, काही
पुरुषांनी घातलेली तर काही स्त्रियांनी स्वत:वर घालून घेतलेली. वर उल्लेख
केल्याप्रमाणे नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वेगाने कमी होऊ लागली आहे
कारण कुटुंबाच्या/कुटुंबातल्या जबाबदाऱ्या फक्त त्यांच्याच असतात, असे
मानणाऱ्या पुरुषांची संख्या आजही मोठीच आहे. मुलांची/ज्येष्ठांची आजारपणे
असोत की घरकाम की घरातले एखादे लहानमोठे कार्य असो, घरातली स्त्रीच तिथे
आवश्यक असते. मग भले तिचे कार्यालयातले/शेतावरचे/कारखान्यातले/दुकानातले
काम कितीही महत्त्वाचे असो. एक स्तनपान वगळता लहान मुलांची काळजी
घेण्यातले सगळेच पुरुष करू शकतात परंतु आजही मूल आजारी आहे म्हणून रजा
घेणाऱ्या पुरुषांची संख्या किती आहे ते आपण आजूबाजूला पाहू शकतोच. हीच
परिस्थिती महिलांना नोकरी सोडण्यास भाग पाडते आहे, कारण पुरुष जबाबदाऱ्या
घेतच नाहीत. संसार, लग्न, कुटुंब टिकवण्याची जबाबदारीही आपल्या पितृसत्ताक
समाजाने स्त्रीवरच टाकलेली आहे. नागपुरातल्या एका संस्थेने "स्त्रीपुरुष
समानतेमुळे संसार उद्ध्वस्त होतात', असा विषय २०१९मध्ये निबंध स्पर्धेसाठी
दिला आहे, हे याचेच द्योतक. "मुलगी शिकली प्रगती झाली', ही सरकारी घोषणा
ठीक आहे, पण "मुलगी शिकली आणि संसार बुडाला' यावरच सामान्य माणसाचा विश्वास
आहे, त्याचेही कारण स्त्री शिकून पुढे गेली, पुरुष शिकूनही मागेच राहिला,
हेच आहे. अजूनही कित्येक घरांमध्ये मुले अभ्यासात मागे पडली, आजारी पडू
लागली तरी आईच्या नोकरीकडे बोट दाखवले जाते.निव्वळ तिच्या पगारावर डोळा
ठेवूनच तिला कामावर जाऊ दिले जाते, भले तिला त्या पगारातला एक पैसाही
तिच्या मनाने खर्चायचे स्वातंत्र्य नसेल. तिच्याइतकेच काम करणाऱ्या
पुरुषापेक्षा ही रक्कमही अनेकदा कमी असते, पण किमान तिला आपण काही कमावतो,
याचे सुख तरी तिला मिळते. संरक्षण क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांची
संख्या भले वाढली असेल, पण गावांत, खेड्यांत, शहरांत, महानगरांत स्त्रीला
सुरक्षित वाटत नाही, हेही वास्तवच. स्त्रियांनी आणीबाणीत वापरायची अनेक अॅप
आज उपलब्ध आहेत, पण त्यांची गरजच का पडावी, याचा विचार आपण कधी करणार
आहोत? बसमध्ये, लोकल गाड्यांमध्ये पोलिसांच्या मदत सेवांचे दूरध्वनी
क्रमांक लिहूनही आपण महिला किती असुरक्षित आहेत, आणि पुरुष असेच वागणार,
हेच अधोरेखित करतोय. पुरुषांनी स्त्रीला मखरात ठेवून तिची पूजा करावी अशी
अपेक्षा नसून तिच्याकडे एक आपल्यासारखीच सामान्य माणूस म्हणून पाहावे,
इतकेच तर हवे असते. आई, बहीण, आजी, पत्नी, मुलगी, वहिनी, मैत्रीण या व इतर
असंख्य रूपात सतत समोर येणाऱ्या स्त्रीकडे भोग्य वस्तू म्हणूनच पाहू
शकणाऱ्या पुरुषांबद्दल वाईटच वाटावे की, स्त्रियांचा सहवास किती विविध
प्रकारे भरभरून देणारा असतो हे यांना कळलेच नाही.
अर्थात, चित्र इतके
काळेकुट्ट नाही हा एक दिलासा. महिलांवरच्या अत्याचाराविरुद्ध लढणारे अनेक
पुरुष आहेत. घरातली कामे, अगदी लेकरांना आंघोळ घालण्यापासून
स्वयंपाकापर्यंतची, आवडीने करणारे पुरुष आहेत. (आणि असे जाहीरपणे सांगायला
ते लाजतही नाहीत, हेही महत्त्वाचे.) आम्ही फेमिनिस्ट आहोत, असे आनंदाने
सांगणारे पुरुषही आहेत. अमेरिकेत एका फक्त मुलग्यांच्या शाळेत फेमिनिस्ट
क्लब सुरू करणारे दोघे तरुण यातलेच. आसपासचा एखादा पुरुष चुकीचे वागत असला
तर त्याला थांबवणारेही मोजकेच का होईना, पुरुष आहेत. यांची संख्या हळूहळू
का होईना, वाढतेय. त्यांच्यापासून इतर स्फूर्ती घेतील, ही आशा कायम आहे.
त्यांच्यामुळेच समाजात समतोल निर्माण होऊन स्त्रियांचे, पुरुषांचे,
पर्यायाने समाजाचे स्वास्थ्य सुधारणार आहे यात शंका नाही. हा आशेचा किरण या
महिला दिनी मोलाचा वाटतो.
Comments
Post a Comment