उत्साही तारुण्य, लोभस वार्धक्य

लिटरेचर फेस्टिव्हलसाठी जयपूरला गेले असताना भेटलेल्या चार लक्षणीय स्त्रियांची गोष्ट. दोघी विशीतल्या, एक पन्नाशीची, तर एक सत्तरीजवळची.


जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस. मीडिया गॅलरीत बसून बातमी लिहीत असताना टेबलावर सॅक धप्पकन टाकून शेजारच्या खुर्चीवर एक मुलगी येऊन बसली आणि ‘ईश्वर!’ असं म्हणून तिने एक सुस्कारा सोडला. ‘क्यों ईश्वर को याद कर रही हो?’ असं विचारल्यावर म्हणाली, ‘अब इतनी भागदौड करने के बाद बैठने मिला है, तो ईश्वर को ही याद करूँगी ना?’
‘कौन से पेपर के लिए लिख रही हो?’
‘मैं ब्लाॅगर हूँ फेस्टिवल के ब्लाॅग लिखती हूँ.’
फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या सत्रांविषयी ब्लाॅग लिहिण्यासाठी स्पर्धा घेऊन सहा जणांना ब्लाॅगर म्हणून निवडण्यात येतं. त्यात ही निवडली गेली. सत्र संपलं की विशिष्ट वेळाच्या आत ब्लाॅग लिहून फेस्टिव्हलच्या वेबसाइटवर टाकण्याचं बंधन या ब्लाॅगर्सवर असतं.
‘दिव्य मराठी’चं नाव ऐकल्यावर तिचे डोळे चमकले. कानपूरच्या एका मुलीला ‘दिव्य मराठी’त काय रस असेल बरं, असं मनात आलं. तर तिला रस होता मराठीत. कारणीभूत होता अभिनेता अतुल कुलकर्णी. त्याच्यासाठी तिला मराठी शिकायचं आहे. त्याच्यासाठी ‘नटरंग’ तिने व्हिडिओची गती कमी करून, संवाद कळावेत म्हणून साडेसहा तास बसून पाहिला आहे. ‘कट्यार काळजात घुसली’मधली गाणी अनेक महिने ती लूपवर ऐकत होती, शेवटी आईने वैतागून तिला धमकी दिल्यावर ते बंद झालं. ती पोटात असताना तिच्या आईने ‘मृत्युंजय’चा हिंदी अनुवाद वाचला होता, म्हणून हिचं नाव ठेवलं वृषाली. समोरच ठेवलेलं चकलीचं पाकीट पाहून ती ज्या उत्स्फूर्तपणे ‘अगं बाई, चकली!’ म्हणाली, तेव्हा तिच्या मराठीप्रेमाची खात्रीच पटली. वृषाली २६ वर्षांची आहे. वेगवेगळी अनेक कामं तिने आतापर्यंत केली आहेत. गेल्या वर्षी तिला कर्कराेग झाल्याची भीती निर्माण झाली होती, अनेक शस्त्रक्रियांमुळे तिने बराच काळ घराच्या आत काढला होता. त्यामुळे जयपूरच्या मोकळ्या हवेत ती खुलली होती. काही दिवसांतच ती आॅस्ट्रेलियाला रवाना होतेय, प्रकाशन व्यवसायातील शिक्षणासाठी. ‘लडकी हाथ से गयी,’ असं तिच्या वडिलांना वाटतंय. खरं तर आतापर्यंत लग्न होऊन जायला हवं होतं, असं त्यांना वाटतंय. पण वृषालीला खूप मोठं आकाश खुणावतंय.
***
फेस्टिव्हलचा तिसरा दिवस. विख्यात तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांची मुलाखत झाल्यानंतर प्रश्नोत्तरं सुरू होती. सतरा-अठरा वर्षांची वाटावी अशा मुलीने त्यांना प्रश्न विचारला, ‘इंग्रजी साहित्य आणि बाकीच्या भाषांमधलं (other or regional) साहित्य असा उल्लेख सर्रास केला जातो, तर भारतीय भाषांना बाकीच्या असं म्हणण्याबद्दल काय वाटतं?’ लेखक हसले आणि त्यांनी सांगितलं, ‘भारतभूमीत निर्माण होणाऱ्या सर्व साहित्याला भारतीय साहित्यच म्हणायला हवं.’
प्रश्न वरवरचा नव्हता, त्यामागे काही विचार होता, म्हणून लक्षात राहिला. यानंतर काही तासांनी ती मुलगी चहा पिताना शेजारीच होती असं जाणवल्यावर तिच्याशी बोलण्याचा मोह आवरला नाही. ‘तुझा प्रश्न चांगला होता, काय करतेस तू?’
ती फेस्टिव्हलला आली होती ब्लाॅगर म्हणून. इंग्रजी साहित्य विषय घेऊन दिल्लीच्या लेडी श्रीराम काॅलेजमधून बीए झाली. पुढच्याच महिन्यात ती जपानला जातेय, जपानी भाषाशास्त्र शिकायला. तिचं नाव स्वस्तिका जाजू. वय वर्षं २१. यातली आठेक वर्षं तिने औरंगाबादेत घालवल्याने तिला ‘दिव्य मराठी’ आणि मधुरिमा चांगलेच ओळखीचे होते. स्वस्तिका इंग्रजीतून लिहिते, तर वृषाली हिंदीतून.
***
फेस्टिव्हलचा पाचवा आणि शेवटचा दिवस. मी ज्या घरात राहत होते पाहुणी म्हणून, तिथे सकाळचा चहा घेत असताना एक वयस्कर परदेशी बाई मोठाली बॅग घेऊन हजर झाली. लिंडा तिचं नाव. हाॅलंडहून आली होती, दीड महिना राहणार होती. इतके दिवस? पर्यटनासाठी नव्हे, तर दंत उपचारांसाठी ती आली होती, हे ऐकून काहीसा धक्काच बसला. आणखी धक्का बसला तिच्या नाकातली सोन्याची चमकी पाहून. भारत हे वैद्यकीय पर्यटनाचे मोठे केंद्र असल्याचे ऐकून होते, लिंडा त्याचाच एक घटक. हाॅलंडपेक्षा एकपंचमांश किमतीत भारतात दंत उपचार होतात, त्यामुळे विमानप्रवास आणि राहण्याचा खर्च जोडूनही ते स्वस्तच पडतं. लिंडा १९७१मध्ये सर्वप्रथम भारतात आली, येतच राहिली. भारतीय हातमागावरचे चादरी, पडदे, कापडं यांचा व्यवसाय करू लागली. त्या काळात इंटरनेट सोडाच, हाॅलंडहून भारतात फोन लावणंही महामुश्कील असल्यानं तिला सतत इथे येण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ट्रंक काॅल लावायच्या आठवणी तिच्या मनात ताज्या होत्या. ती दक्षिण भारतात नेहमी जायची. ‘नाक टोचून चमकी घातल्यामुळे मी सहज स्वीकारले गेले,’ असं ती म्हणाली. आता तिने व्यवसाय कमी केला आहे. तिला सरकारची पेन्शन मिळते. तिने तिचं मोठं घर विकून दोन खोल्यांचं घर घेतलं आहे. मनात येईल तेव्हा नातींना भेटायला जर्मनीला जाते. आणि भारतात येते. ‘आता बाहेर जाऊन आधी स्थानिक सिमकार्ड घेणार, इथल्या मित्रमंडळींना सांगणार की मी आलेय,’ असं ती म्हणाली, तेव्हाचा तिचा आनंदी आणि उत्सुक चेहरा पाहून वाटलं, म्हातारपण यावं तर असं. प्रत्येक व्यक्तीलाच.
***
फेस्टिव्हल संपायला काही तास असतात. जेवताना शेजारी येऊन बसतात तामिळ कवयित्री/कादंबरीकार आणि राजकीय नेत्या सलमा. त्यांची मुलाखत आदल्याच दिवशी ऐकलेली असते आणि त्यांच्या विलक्षण आयुष्याने मनात घर केलेलं असतं. लहान वयात लग्न झालेलं. कविमन शांत बसत नाही, पण स्वत:च्या नावाने कविता प्रसिद्ध करण्याचं धारिष्ट्य नाही. बाईच्या लैंगिक जाणिवांविषयीच्या त्या कविता कोणत्या कोणत्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या, त्यांचा संग्रहही प्रसिद्ध झाला. पण नाव नाही. या संग्रहाच्या प्रकाशनाला सलमा गेल्या, पण कोणालाच माहीत नव्हतं की हीच ती कवयित्री. तब्बल बारा वर्षं त्यांनी अनामिक राहून कविता लिहिल्या. याच सुमारास त्या ३३ टक्के आरक्षणामुळे राजकारणात उतरल्या, सरपंच झाल्या. माझ्यापेक्षा हिलाच राजकारण चांगलं जमतं, अशी पावती पतीनेच दिलेली. यानंतर लेखन सुरूच राहिलं असलं तरी त्यांच्यावर त्यांची स्वत:चीच सेन्साॅरशिप असल्यासारखी. द्रमुक पक्षाच्या त्या मोठ्या नेत्या. आता आपण काही लिहिलं आणि त्याचा वेगळाच परिणाम झाला तर, अशी भीती त्यांना वाटते. सध्या त्या दोन कादंबऱ्यांवर काम करत आहेत.
***
एकीकडे विशीतल्या मुली, प्रसंगी घरच्यांचं मन मोडून आपल्याला हवं ते शिकायला, काम करायला बाहेर पडतायत. मधेच आहे नुकतीच पन्नाशी ओलांडलेली अशी एक कवयित्री जी आता राजकारणात असल्याने लैंगिकतेबद्दल लिहावं की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत आहे. आणि दुसरीकडे सत्तरी गाठलेली एखादीही परदेशात एकटी प्रवास करतेय. एकीकडे तारुण्यसुलभ उत्सुकता, अनिश्चितता; एकीकडे अभिव्यक्तीची दडवून ठेवावी लागणारी ऊर्मी सांभाळत लिहीत राहण्याची इच्छा, तर दुसरीकडे उर्वरित आयुष्य निवांत आनंदात घालवण्याचा उत्साह. स्त्रीची ही हवीहवीशी लोभस रूपं.

Comments