कुसुम गोखले, माझी माईमावशी. कोकणातल्या गणेश गुळ्यासारख्या छोट्या खेड्यातून मुंबई महानगरीत आलेली. ती फार शिकलेली नव्हती, पण अर्थातच तिन्ही मुलांना तिने खूप शिकवलं. आणि स्वत: शेवटपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहिली. तिचं कुतूहल, नवीन गोष्टींबद्दलची उत्सुकता लहान मुलाच्या वरताण होती. या शिकण्याचं एक महत्त्वाचं माध्यम होतं रेडिओ. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तो सुरू असायचा. मी शाळेत असताना सुटीत तिच्याकडे आम्ही भाचरं राहायला जायचो. तेव्हाही तो कानावर पडत असे. आणि नंतर माझी चाळिशी उलटल्यानंतर माझं आॅफिस तिच्या घराच्या जवळ असल्याने मी अनेकदा तिच्याकडे जात असे, तेव्हाही तो सुरूच असे. तिच्या पिढीतल्या अनेकींप्रमाणे ती रूढीपरंपरा पाळणारी होती, पण परंपरांमध्ये जखडलेली नव्हती. आरत्या, ओव्या, अभंग, कविता, भावगीतं तिच्या रोजच्या आयुष्याचा भाग होती. मग कधीतरी तिलाही काही सुचावं यात नवल ते काय. आज संध्याकाळी माझ्या एका भाचीला, काहीतरी आवरताना मावशीने केलेली ही बोडणाची आरती मिळाली. बोडण ही कोकणस्थ ब्राह्मण समाजात होणारी एक पूजा, किंवा प्रथा. सगळ्या कुटुंबात ही असतेच असं नाही. अनेक कुटुंबांत लग्न, मुंज, बाळाचा जन्म अशा शुभकार्यांनंतर बोडण घालण्याची पद्धत असते.
तर ही आहे तिने रचलेली बोडणाची आरती. यात बोडणात केल्या जाणाऱ्या काही कृतींचा समावेश अर्थातच आहे. याला चाल लवथवती विक्राळा आरतीची लागू शकते, किंवा एखाद्या नांदीचीही. (उदा. श्रीगणराय नर्तन करी)
बोडण भरू गं बोडण भरू। देवीचा उत्सव आनंदे करू
शुक्रवारी किंवा मंगळवारी । चार सुवासिनी एक कुमारी
तुळस पूजिली मागील दारी । साधली जर का अष्टमी धरू।।१।।
अन्नपूर्णा देवी बसे पराती । मंगल स्नानाला सुगंधी उटी ।
प्रथम पूजिला भावे गणपती । वाहू दूर्वांकुर नमन करू ।।२।।
सुवर्णालंकार बैठक लोड । नथ कुडी बिंदी पाटल्या जोड
नागमोडी वेणी गळ्यांत हार । शोभती तोरड्या वाजे घुंगरू ।।३।।
बेल दूर्वा पत्री फुले तुळस । धूप कापराचा सुटे सुवास
ताटी पंचामृत वाट्या ह्या पाच । हार डेरा केला दुधाने भरू ।।४।।
वडे घारग्यांचा नैवेद्य केला । पुरण खिरीचा बेत चांगला
पाच पाने वाढा भोवती ठेवा । वाजे घंटा झाली आरती सुरू ।।५।।
कुमारिका शोधी पैसा सुपारी । दहीदुधाची गं आवड भारी
विडा दक्षिणेची करा तयारी । वाहू हळदीकुंकू प्रार्थना करू ।।६।।
संध्येच्या पळीला सोनसाखळी । नमस्कार करा अंगारा भाळी
अंबेचा उत्सव हीच दिवाळी । आशीर्वाद देई मागणे करू ।।७।।
Comments
Post a Comment