only men in Bollywood?

दिल्लीत पंतप्रधानांशी चर्चा करताना बाॅलिवूडचे पुरुष प्रतिनिधी. छाया इंटरनेट

तर गेल्या आठवड्यात, बाॅलीवूडमधल्या काही समस्या माननीय पंतप्रधानांच्या कानावर घालण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं. अक्षय कुमार, अजय देवगण, करण जोहर वगैरे मंडळी यात सहभागी होती. पंतप्रधानांशी त्यांनी चर्चा केली, मग त्याचे छानछान फोटो ट्विटरवर शेअर केले. पण नेमकं झालं काय होतं की, या शिष्टमंडळात ज्या अठरा व्यक्ती होत्या त्या पुरुष होत्या. चर्चेचे फोटो पाहून हे अर्थात अनेकांच्या लक्षात आलं. त्या अभिनेत्री दिया मिर्झा, काही पत्रकार आदी होत्या. मग त्यांनी त्यावर प्रश्न विचारले. उदा. एकाही महिलेला बोलावलं नाही या चर्चेसाठी, का बरं? कोणी म्हटलं की, बाॅलीवूडमध्ये महिला नाहीच्चेत का आता? कोणी म्हटलं की, बाॅलीवूडमधले महिलांचे प्रश्न संपलेले दिसतात.
कोणाला ऑक्टोबरात झालेली अशीच बैठक आठवली, ज्यातही एकाही महिलेचा समावेश नव्हता. मध्यंतरी उद्योगजगतातील एका प्रतिष्ठित पुरस्काराच्या निवड समितीतही सात-आठ पुरुषच असल्याचं या पुरस्काराच्या जाहिरातीतनंच समोर आलं होतं. महिलांना या चर्चेत समाविष्ट करून का घेतलं नाही, शिष्टमंडळात कोण असेल हे कोणी ठरवलं, या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीयेत. ज्या व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तींनी हे ठरवलं असेल त्यांनी मुद्दाम महिलांना वगळलंय किंवा कसं, तेही ठाऊक नाही.
यातनं लक्षात इतकंच येतं की, बाॅलीवूडसारख्या मोठा व्याप असलेल्या उद्योगजगताचे जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या फक्त पुरुषांनाच भेडसावतात असं आपल्याकडच्या काही जणांना निश्चितपणे वाटतंय. आणि अर्थात यातनं मार्ग काढणंही फक्त पुरुषांनाच जमणार असतं, हे वेगळं सांगायला नको. ज्या बाॅलीवूडमध्ये दिग्दर्शक, निर्मात्या, कलाकार, पटकथालेखक, छायाचित्रकार, संकलक, सहायक दिग्दर्शक, रंगभूषाकार आदी जवळपास सर्व भूमिका महिला पार पाडतात, तिथे अडचणी फक्त पुरुषांना येतात यावर विश्वास बसणं अशक्य आहे.
चिंता आणि खंत या गोष्टीची वाटते की, हा भेदभाव इथेच संपत नाही. दिया मिर्झाने जेव्हा ट्विटरवर अक्षयकुमारला हा प्रश्न विचारला की, महिला का नाहीत या चर्चेत, तेव्हा तिला पुरुषांनी अत्यंत वाईट शब्दांत दुरुत्तरं केली आहेत. तू कोण, तुलाच प्रसिद्धी हवीय, प्रत्येक ठिकाणी काय महिला-पुरुष असं आणतेस, वगैरे वगैरे. म्हणजे, धडधडीत चुकीची गोष्ट समोर दिसत असूनही ती चूक दर्शवणाऱ्या व्यक्तीलाच लक्ष्य करायचा गेल्या काही वर्षांतला सोशल मीडियावरचा खेळ इथेही रंगलाच. महिलांवर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करण्याचा मोह पुरुषांना आवरता आवरत नाही, हे पुन्हा एकदा दिसलं. दिया मिर्झाने आणखी एक गोष्ट लक्षात आणून दिलीय की, तिने हा प्रश्न ट्विटरवर विचारेपर्यंत अनेकांना, महिलांसह, या फोटोत काहीच वावगं आढळलं नव्हतं. एका उद्योगजगताचे प्रतिनिधी फक्त पुरुष कसे काय असू शकतात, सहभागींमध्ये एक तरी महिला का नाही, हेच अनेकांच्या लक्षात आलेलं नव्हतं, कारण आपल्याला वर्षानुवर्षं हेच पाहायची सवय झाली आहे, ती आपल्यात खोलवर मुरलीय. आणि हे सगळं, यंदाच मीटू नावाचं वादळ या उद्योगजगतात येऊन गेल्यानंतर!
तुमच्या आजूबाजूला दिसतात का तुम्हाला अशा ‘फक्त पुरुषांसाठी’ असलेल्या समित्या, मंडळं, बैठका, चर्चा?

Comments