आश्वासक

हळुहळू पन्नाशीकडे पोचतेय मी, इतक्या वर्षांत लक्षात राहिलेल्या किती जणी भेटल्या असतील त्याची गणतीच नाही. त्या लक्षात राहिल्या याची कारणं साधारण सारखीच. त्यांच्यातली जिद्द, अपार मेहनतीची तयारी, अगदी निरपेक्ष नसलं तरी जिवापाड प्रेम करण्याची शक्ती, नवनवीन शिकत राहण्याची इच्छा, ही त्यात वरच्या क्रमांकावर येणारी. अशा व्यक्तींची यादी करायला घेतली तर सगळ्या मावशा, काकवा, माम्या, आत्या, बहिणी, वहिन्या, भाच्या वगैरेंचा उल्लेख करावा लागेल सुरुवातीलाच. कारण कळायला लागल्यापासून या सगळ्याजणी आपल्या अवतीभवती असतात, आपल्या बोलण्यात त्यांचे संदर्भ येत असतात, आपल्या आयुष्यातल्या लहानमोठ्या प्रसंगांच्या साक्षीदारच असतात असं नव्हे तर त्यांच्याशिवाय त्या प्रसंगांना पूर्णत्व मिळत नसतं. पण यांच्याशिवायही अनेक जणी आपल्या आयुष्याचा काही भाग व्यापून असतात, लहानमोठा, कमीजास्त. त्यांची नावंही अनेकदा माहीत नसतात आपल्याला. माझ्या ट्रेनमधल्या मैत्रिणीच घ्या ना. एकीला तिच्या पोलीस नवऱ्याने खूप छळलंय, लेकीला फितवत असतो तो त्यांच्या, आणि तरीही ती हसरी आहे. कधी कंटाळलेली नसते. उत्साहाने कायकाय पदार्थ करून डब्यात आणते आणि मला आग्रहाने खाऊ घालते. खूपदा मला विचारतेही, आता काय करू मी, तुम्हीच सांगा. मी तिला धीर देण्याशिवाय आणि कधीतरी जमेल तसं जवळ घेण्याशिवाय काहीच नाही करू शकत. तिची जिद्द, मुलीसाठी काहीही करायची तयारी, नीटनेटकं राहणं, घर नीट ठेवणं, आईवडलांची सेवा करणं हे सगळं खूप मोलाचं वाटतं मला.
दुसरी आमची भाजीवाली मावशी. तिची दोघं मुलं, नवरा आणि एकदोन मदतनीस असे मिळून भाजी विकतात. नऊवारी नेसणारी ही मावशी रोज प्रेमाने बोलणार, कधी साडी नेसलेली असले मी तर कौतुक करणार, पाव किलोच भाजी तर म्हणणार जरा जिवाला खात जावा. बरं हे सगळं माझ्याशीच नव्हे, तिच्या अनेक ग्राहकांशी तिचं असं नातं आहे. त्यामुळे भाजी घ्यायची नसली तरी तिला हात केल्याशिवाय मी घरी जातच नाही संध्याकाळची. भाजी घ्यायला येणाऱ्या ग्राहकांशी शांतपणे बोलणं, त्यांच्या कोणत्याही कितीही मूर्ख वाटणाऱ्या प्रश्नांवर न चिडता उत्तरं देणं, तिला कसं जमतं असं मला नेहमीच वाटत राहातं.
आमच्या घरी जवळजवळ चाळीस वर्षांपासून येणारी आमची मदतनीस. शिकलेली फार नाही, पण रोजचा पेपर डोळ्यांखालनं घालते, पुस्तकं वाचते. तिचं काम आणि टापटीप निव्वळ अतुलनीय आहे. माझ्या लेकीवर तिने माझ्यापेक्षा जास्त जीव लावलाय. तिच्यामुळे माझं आयुष्य किती सुखकर झालंय, हे मला पक्कं माहीत आहे. दुसरी मदतनीस तामिळ आहे, त्या माध्यमातनं दहावी शिकलेली आहे. नवरा दारू पितो, रिक्षाही चालवतो जमेल तशी. पण घर बहुधा हिच्याच कमाईवर चालतं. तिचा धाकटा लेक मूकबधीर आहे. नशिबाने ते लवकर लक्षात आलं. मुंबईत त्या मानाने सोयी बऱ्याच आहेत, आणि ही त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला नेहमी तयार असते. त्याला शाळेत नेआण ही तिचीच जबाबदारी. तिच्या चेहऱ्यावरचं हसू फार गोड आहे. या दोघी आल्या की निवांत वाटतं.
संध्याकाळच्या ट्रेनला भेटणारी एक शिक्षिका. मुलुंड ते दहिसर रोजचा प्रवास. तिसरीचौथीच्या मुलांची वर्गशिक्षिका आहे ती. बरीचशी मुलं गरीब वस्तीतली. त्यांच्या तक्रारी, त्यांच्या आयुष्यातल्या समस्याच वेगळ्या. कोणाचे वडील दारू पिऊन मारहाण करतात, कोणाचे दुसऱ्या बाईला घेऊन कुठेतरी गेलेले. फी भरायचीही मारामार. मग ही त्यांची फी भरणार. एखाद्याच्या वडलांना फोन करून खडे बोल सुनावणार. अगदी मृदू स्वभावाची, हळुवार पण आपण जितकं कोणासाठी करू शकतो ते करायचंच, या विचारांवर ठाम असणारी.
एक शाळेतली मैत्रीण. प्रचंड हुशार आणि मेहनती. नियोजन हे तिच्या रक्तात भिनलेलं, अर्थात शिस्तशीर आईवडलांकडनं आलेलं. उशिरा लग्न झालं. मुलगी दत्तक घेतलीय. आयटी क्षेत्रात मोठ्या जबाबदारीच्या पदावर काम करतेय. सगळं सांभाळताना तिची ओढाताण, दमछाक होतेच. पण आता तिला कळून चुकलंय की, आपण कशावर वेळ घालवायचा, कशाचा त्रास करून घ्यायचा, कशाचा आनंद घ्यायचा हे आपणच ठरवायला हवं. choose your own battles हा तिच्या आयुष्याचा मूलमंत्र बनलाय. त्यामुळे ती काम, घर, मुलगी, मैत्रिणी, वाचन, नीटनेटकी राहणी, भटकंती हे सगळं जमवतेय. शिवणयंत्र घेण्याचं अनेक वर्षांचं स्वप्न तिने गेल्याच वर्षी पूर्ण केलंय आणि ती त्याच्यावर लेकीसाठी काहीबाही शिवत असते. वेळेचं व्यवस्थापन तिच्याकडून शिकावं असं मला नेहमी वाटतं.
एक जुनी मैत्रीण. दोन मुलांमधला एक शारीरिक दुर्बल, नवऱ्याचं अकाली निधन झालेलं. तिच्या स्वत:च्या तब्येतीच्या काही तक्रारी. जबाबदारीची नोकरी. आणि या सगळ्यातनंही स्वत: आनंदी राहणारी, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी, उत्तम लिहिणारी, संवेदनशील आणि हसतमुख. मला पूर्वी प्रश्न पडायचा, अशा परिस्थितीत ही हसू कशी शकते? आता आता कळू लागलंय की, आनंदाचे काही क्षण तिला बाकीची आव्हानं पेलायला बळ देतात. आणखी एक अशीच औरंगाबादची सखी. तिचा एक मुलगा स्वमग्न आहे. तर तिने त्याच्यासारख्या मुलांसाठी शाळाच सुरू केली सरळ. आता तिचा व्याप बराच वाढलाय. स्वत:च्या मुलाची जबाबदारी, त्याला द्यावी लागणारी खास वागणूक, वेळ यात शाळेची जबाबदारी घेतलीय. मुलांना वेगवेगळे अनुभव कसे देता येतील, त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं करता येईल, पालकांना जागं कसं करता येईल, या सगळ्या कामासाठी पैसा कसा उभा करता येईल या चिंता तिला आहेतच, पण ती त्यांना काही काळ बाजूला ठेवून पुस्तकं वाचते, मैत्रिणींना भेटते, छान राहाते. तिने मुद्दाम गाडी घेतली, चालवायला शिकली, फिरणं सोयीचं व्हावं म्हणून, त्यामुळे ती अधिक कामं करू शकते.
एक मैत्रीण तशी अलिकडची. मुलींना सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून ती कधी नोकरी करू शकली नाही. आता नातू आहे, तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी तिने घेतलीय, जेणेकरून मुलीला याच कारणामुळे नोकरी करता आली नाही, असं व्हायला नको. नातवाच्या जबाबदारीमुळे ती काहीशी बांधली गेलीय पण त्यातूनही तिला अगदीच ज्या गोष्टी करायच्या असतील, फिरायला जायचं असेल तर ती तेवढं जमवतेच. इंग्रजीत 3 AM friend असा एक शब्दप्रयोग आहे, ही माझी तशी मैत्रीण आहे.
एक माझी सहकारी. छोट्या घरात संयुक्त कुटुंबात राहणारी. घरचं आणि आॅफिसचं काम इतकं की, ती गजर लावल्याशिवाय, झोप पूर्ण झाली म्हणून, कधीतरी जागी होत असेल का, असा प्रश्न पडतो. ती नीटनेटकी आहे, छान मॅचिंग करून आॅफिसला येते. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवणारी. कामाला पक्की. समजा आम्ही पाठवलेलं एखादं कुरिअर पोचलेलं नाही. हिला त्याचा छडा लागेतो चैन पडणारच नाही. आॅफिसात तिच्यावर सोपवलेलं काम वेळेत आणि परफेक्ट होणारच, याची खात्री असते सर्वांनाच. असा विश्वास कमावणं सगळ्यांना नाही जमत ना.
एक आहे वेगळीच, मैत्रीण नाही म्हणता येणार कदाचित. ती तृतीयपंथी आहे. तिला आॅफिसात पहिल्यांदा भेटले तेव्हा तिचे अनुभव ऐकून काळजात हललं. पुण्याहून मुंबईला येताना ट्रेनमध्ये तपासनीसाने इतर सामान्य माणसांसारखं तिकीट विचारावं आपल्याला, हे तिचं स्वप्न. तिच्या एका कवितासंग्रहाला कोणी पुरस्कार दिला मध्यंतरी. पण त्यामागे केवळ LGBTQ व्यक्तींना सहानुभूती दाखवायचा हेतू आहे, हे तिच्या लक्षात आल्यावर तिने पुरस्कार नाकारला. तिच्या आयुष्यातले संघर्ष माझ्या आकलनापलिकडचे आहेत, किमान ती आहे तशी तिचा स्वीकार करणं मला नक्की जमवायचंय.दुसरी एक तिच्यासारखीच, ट्रेनमध्येच टाळ्या वाजवत येणारी. पण ती गाते छान. आणि गाडीच्या दारात लटकणाऱ्या, लटकून फोनवर बोलणाऱ्या मुलींना ओरडतेही. तिची इतकी वेगवेगळी रूपं मी पाहिली आहेत, पण तिचं खरं आयुष्य त्याच्या पलिकडचं आहे, याची मला चांगलीच जाणीव आहे.
या सगळ्यांशी मी जोडलेली राहाते, काहीशा स्वार्थी विचाराने कदाचित. पण ज्यांच्याशी वागताना स्वार्थाचा लवलेशही नसतो अशा तीन व्यक्तींचा उल्लेख इथे करायलाच हवा. एक माझी लेक आणि माझ्या दोन आई. लौकिकार्थाने अगं आई आणि अहो आई. आईने कोकणातल्या छोट्या खेड्यातून या महानगरीत येऊन महापालिकेत नोकरी केली. पण स्वेच्छानिवृत्ती घेऊन ती कानडी शिकली, थेट मुंबई विद्यापीठात. भाषेवर चांगली पकड यावी म्हणून ती रोज कानडी वर्तमानपत्र वाचू लागली, कानडी मालिका पाहू लागली. हळूहळू ती कानडी साहित्याचा मराठी अनुवाद करू लागली. याच दरम्यान बाबा अचानक गेल्याने तिला जबरदस्त धक्का बसला, पण काही काळातच याच कानडीचा हात धरून ती त्यातनं बाहेर आली. आज ती संगणकावर देवनागरी टंकते, ईमेल लिहिते. अनुवादाच्या कामात आणि इतर वाचनात दिवस कसा जातो, तिलाही कळत नाही. माझं वाचन कमी झाल्याबद्दल ती अनेकदा मला टाेकतेही. दुसरी आई लग्नानंतर काही वर्षांनी बीएड झाली, शिक्षिका म्हणून निवृत्त झाली, पण तिला शिकवण्याविना चैन पडेना. मग वरळीला नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइंडमध्ये जाऊन डीएड करणाऱ्या अंध मुलींना तिने शिकवलं, त्यांच्यासाठी धडे ध्वनिमुद्रित केले. मग मुलुंडमध्येच महाराष्ट्र सेवा संघाच्या दृष्टी सेवा केंद्रात दहावीच्या अंध मुलांना ती शिकवू लागली. पंचाहत्तरीकडे प्रवास करताना प्रकृती कधीकधी साथ देत नाही आता तिला, पण जमेल तसं ती तिच्या मुलांना शिकवत राहातेच. घरबसल्या धडे/कविता ध्वनिमुद्रित करणं तर नक्कीच जमतंय तिला. शिवाय तिच्या प्रिय झाडांचं लालनपालन करण्यात तिला अतुलनीय आनंद मिळतो.
लेकीला मी वाढवलं की तिने मला शिकवलं, असा प्रश्न मला पडतो इतकं तिचं वागणं मला समंजस वाटतं. ठरवून वर्षात अमुक एक पुस्तकं वाचणं असो की एकटीने सिनेमा पाहाणं, वेगवेगळी कामं हातात घेणं, अत्यंत पॅशनेटली ती करणं, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी नेहमी उपलब्ध असणं, घरातली कामं करणं, स्वयंपाकघरात अधनंमधनं का होईना डोकावणं, छान राहाणं, स्वत:ची काळजी घेणं, हे सगळं खूप मस्त आहे. या पिढीसमोर इतके पर्याय उभे असतात की, मुलं गोंधळून जातातच. पण त्यावर मदत मागतात ती, हे फार आवडतं. मदत मागणं भल्याभल्यांना जमत नाही, हे दिसत असतं रोजच्या रोज, म्हणून त्याचं कौतुक.
या सगळ्या जणी माझ्या आयुष्यात आल्या म्हणून माझं मलाच जाम भारी वाटत राहातं.
(आकाशवाणी मुंबई, अस्मिता वाहिनीसाठी महिला दिनाच्या निमित्ताने लिहिलेलं निवेदन.)

Comments