ईगल डॅड

इंटरनेटवरून सध्या एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय. न्यू यॉर्कमधल्या एका पार्कमध्ये बर्फ पडलंय, त्यात एक चार वर्षांचा मुलगा फक्त चड्डी आणि बूट घालून धावतोय. मध्येच तो रडतो, उचलून घ्यायला सांगतो पण त्याचे आईबाबा त्याला चक्क बर्फात आडवं व्हायला लावतात. प्रत्यक्ष त्याच्या वडिलांनीच शूट केलेला हा व्हिडिओ. जेमतेम मिनिटभराचा. हा प्रकार खास चिनी पालकत्वाचा. अमी चुआ या चिनी अमेरिकी लेखिकेच्या टायगर मदर या वादग़्रस्त पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ प्रसारित झाल्याने त्याच्यावर प्रचंड चर्चा सुरू आहे. मुलांना इतक्या कडक शिस्तीच्या वातावरणात वाढवायचं नाही, ते अमानुष आहे इथपासून जर मुलाला झेपत असेल तर असे करायला हरकत नाही, अशी टोकाची मते नेटवर व्यक्त केली जात आहेत. चीनमध्ये मुलांना, खरंतर एकुलत्या एक मुलाला, अतिशय शिस्तीच्या, बंधनाच्या वातावरणात वाढवलं जातं. त्यांच्यावर सतत अभ्यास करण्याची सक्ती असते, त्यांना अजिबात टीव्ही पाहायला दिला जात नाही, तसंच त्यांना एखादं तरी वाद्य वाजवायला शिकावंच लागतं. या पालकत्वाच्या पद्धतीवर अर्थातच अनेक आक्षेप घेतले जाऊ शकतात. या छोटय़ा मुलाच्या बाबतीत प्रामुख्याने त्याच्या तब्येतीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा छोटुकला कमी दिवसांचा जन्माला आलेला, दोन महिन्यांनंतर रुग्णालयातून बाहेर येऊ शकलेला. परंतु त्याच्यानंतर त्याच्या आईवडलांनी त्याला उणे 20 तापमानाच्या पाण्यात पोहायला शिकवलं, तो दिवसातून अनेक तास चालू शकतो, दोन वर्षांचा असताना त्याने पर्वतारोहण केले आहे, त्याचा बुद्ध्यांक 200च्या वर आहे. त्याचे वडील त्याला व्यवसायाच्या विषयीही शिकवत असतात. लोकांच्या प्रतिक्रिया गेली खड्डय़ात, मी माझ्या मुलाला मला हवं तसंच वाढवणार, असे त्यांनी म्हटले आहे. या मुलाची या वयातली प्रगती लक्षात घेता त्याचे पालक बरोबर आहेत की काय, असे वाटायला लागते. लक्षात एवढंच घ्यायचं की मुलाच्या प्रकृतीचा अंदाज घ्यायचा. कारण आज जगात वावरताना प्रत्येक व्यक्तीला ‘टफ’ असावेच लागते, मुलांना नुसते लाडावून ठेवून उपयोग नाही, हेही खरेच ना?

२/३/१२

Comments