लव्ह टू हेट यू

जिथे प्रेम आहे तिथे द्वेष कसा काय असू शकतो, असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे! कारण वरकरणी या दोन परस्परविरोधी भावना आहेत. एका भावनेत प्रसंगी दुसऱया व्यक्तीसाठी स्वत:चा जीव देण्याची तयारी तर दुसरीत जीव घेण्याची. मग ‘लव्ह टू हेट यू’ ही काय भानगड आहे? मनोवैज्ञानिक वास्तव असे आहे की जिथे आत्यंतिक प्रेम आहे तिथेच द्वेषही असू शकतो, किंबहुना असतो. या दोन्ही भावना परस्परविरोधी नसून एकमेकींच्या जोडीनेच वाटचाल करत असतात. एवढेच काय, प्रेम आणि द्वेष या भावना निर्माण होतात, तेव्हा मेंदूत उद्दीपित होणारी काही केंद्रेही समान असतात, असे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. या दोन्ही भावना टोकाच्या आहेत आणि त्या एकाच व्यक्तीबाबत निर्माण होऊ शकतात. हे समजायला कठीण वाटले तरी आपण आपल्या दैनंदिन जीवनात याची अनेक उदाहरणे पाहत असतो. पती वा पत्नीचा खून अनेकदा याच भावनांचा परिपाक असतो. पत्नीवर जिवापाड प्रेम आहे म्हणूनच तिने केलेली अमुक एक गोष्ट न आवडल्याने तिचा खून केला, असे अनेक गुन्हेगारांनी म्हटलेले आहे. माझे अमुक व्यक्तीवर आत्यंतिक प्रेम आहे परंतु ती व्यक्ती माझ्यासाठी तिच्या पती/पत्नीला सोडायला तयार नाही म्हणून मला तिचा द्वेषही वाटतो, हे वास्तव आहे. ‘गाइड’ वा ‘अभिमान’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमधून याचे दर्शन आपल्याला झालेले असते. मला तिची अमुक गोष्ट आवडते पण तमुकमुळे मी तिचा द्वेष करतो, असेही अनेक जोडप्यांमध्ये दिसून येते. असे असले तरी या दोन्ही भावनांमध्ये फरक आहेच. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा इतर कोणत्याही व्यक्तीने तसे केलेले आपल्याला अजिबात नको असते. परंतु, एखाद्या व्यक्तीचा आपण द्वेष करतो, तेव्हा अधिकाधिक लोकांनी तसे करावे, असे आपल्याला वाटत असते. यातूनच कदाचित व्हॅलेंटाइन दिनाला ‘आमचा विरोध आहे म्हणून सर्वांनीच तो करावा’, असे आपल्याकडच्या तथाकथित संस्कृतीरक्षकांना वाटत असावे. हा दिवस म्हणजे पाश्चिमात्त्य संस्कृतीचे भारताच्या अतिप्राचीन व जगातील सर्वोत्कृष्ट संस्कृतीवर अतिक्रमण आहे, आपल्याकडे असले ‘सवंग’ प्रेमबिम असे काही नाही, त्याचे असे जाहीर प्रदर्शन तर अजिबात नाहीच, असे हिंदुत्ववादी पक्षांचे व संघटनांचे म्हणणे असते. त्यामुळेच मागच्या सुमारे दहा वर्षांमध्ये दगडफेक, दुकाने फोडणे आदि घटनांनीच हा दिवस 14 फेब्रुवारीच्या आधीपासून गाजत असे. गेल्या वर्षी हा विरोध बराचसा कमी झाला होता आणि यंदा तर कोणी त्याविरुद्ध ‘ब्र’ही काढलेला नाही. यामागचे कारण सरळसोपे आहे. निवडणुका तीन दिवसांवर आल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर देशातला सर्वात मोठा मतदारवर्ग असलेल्या युवकयुवतींचा रोष ओढवून घेण्याची कोणत्याच पक्षाची तयारी नाही. भारतीयांना या दिवसाबद्दल कळले तेच सुमारे 15 वर्षांपूर्वी. तेदेखील मुंबई, दिल्लीसारख्या आधुनिक शहरांमधून याचा जास्त बोलबाला झाला. शुभेच्छापत्रांची दुकाने त्या निमित्ताने सजू लागली. प्रेमाचे संदेश देणारी शुभेच्छापत्रे, त्यावरचे लालभडक गुलाब, बदामाच्या आकाराचे फुगे, यांपासून सुरुवात होऊन सॉफ्ट टॉइज, चॉकलेट्स, बदामाच्या आकाराच्या अंगठय़ा वा कर्णभूषणे यांनी दुकाने भरू लागली. मग सर्व बडय़ा ब्रँडेड सुवर्णकारांनी त्यात उतरायचे ठरवले आणि ‘व्हॅलेंटाइन दिनी तुमच्या अक्षय प्रेमाचे प्रतीक म्हणून तुमच्या व्हॅलेंटाइनला द्या आमची हिऱयाची अंगठी वा पेंडंट’ अशा जाहिरातींनी वर्तमानपत्रांमधली पानेच्या पाने भरू लागली. पंचतारांकित हॉटेलेही रोमँटिक व्हॅलेंटाइन डिनरच्या जाहिराती करू लागली. आता गावोगावी झालेले मॉल्सही या स्पर्धेत उतरले आणि व्हॅलेंटाइन दिनाची विशेष ऑफर चित्रपटाच्या तिकिटांवर, खाण्यावर, खरेदीवर मिळू लागली. अशा रीतीने बाजारपेठेने या दिवसावर पुरता कब्जा मिळवला. आणि भारतीय तरुणवर्ग या दिवसाच्या लाटेवर आरूढ होऊन शुभेच्छापत्रांपासून हिऱयाच्या अंगठीपर्यंत वस्तू विकत घेऊ लागला. वर्गातील तास बुडवून ऑफरमधली तिकिटे काढून चित्रपट पाहू लागला. पिझा, बर्गर, पास्ता, चॉकलेट्स खाऊ लागला. हा दिवस फक्त असाच साजरा करता येतो, किंबहुना करायचा असतो, असे त्याला वाटू लागले. आणि बाजारीकरणाच्या प्रक्रियेत होते तसा हाही इव्हेंट झाला. या दिवसाची पैशांची उलाढाल कोटय़वधी रुपयांमध्ये होऊ लागली. एका वर्तमानपत्रातील बातमीनुसार या दिवशी डिटेक्टिव कंपन्यांचेही उखळ पांढरे होते म्हणे. का तर, अनेक संशयी पती आपल्या नोकरी करणाऱया पत्नीमागे ती हा दिवस इतर कोणाबरोबर तर साजरा करीत नाही ना, हे पाहण्यासाठी डिटेक्टिव लावतात! (नोकरी करणाऱया, त्याही आयटी वा कॉल सेंटरसारख्या वेळेचे तथाकथित सामाजिक बंधन न पाळणाऱया क्षेत्रात, महिलांची संख्या लक्षणीय आहे, ते पाहता या दिवसांत अशा अनेक डिटेक्टिवांना काम मिळत असेल, असे मानण्यास हरकत नाही.) सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून या दिवसाचे माहात्म्य साजरे करणारे चित्रपट दाखवले जातात, रेडिओवर प्रेमाची महती सांगणारी गाणी ऐकवली जातात. करोडो प्रेक्षकांचे दैनंदिन मनोरंजन करणाऱया मालिकाही यात मागे नसतात. उद्याच्या एपिसोडची गोष्ट आज लिहिणारे पटकथालेखक या दिवसाला मालिकेत घुसवतात आणि मालिकेतील जोडपी तो कसा साजरा करतात किंवा (करू शकत नाहीत बिच्चारी) असे दाखवून प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालतात. गंमत म्हणजे दुसऱया दिवसापासून जैसे थे जीवन सुरू होते. मागील पानावरून पुढे चालू. प्रेमबिम मागे पडते, विद्यार्थीवर्ग तोंडावर आलेल्या परीक्षांच्या तयारीला लागतो आणि प्रेमी युगुले पुन्हा प्रेम, भांडण, प्रेम, भांडण या चक्रात अडकतात. याचा अर्थ असा नव्हे की प्रेम क्षणभंगुर असते. प्रेमाएवढे चिरंतन आणि शाश्वत काहीच नाही. कोण्या एका संघटनेच्या फतव्याने प्रेम जडणे थांबत नसते की व्हॅलेंटाइन दिन साजरा केल्याने ते अधिक जोमाने होत नसते, हे कळणे महत्त्वाचे.

१४/२/१२ /

Comments