लादलेला विवाह, लादलेलाच घटस्फोट

टीव्हीवरच्या एका लोकप्रिय मालिकेत सध्या ‘कहानी में जबरदस्त ट्विस्ट’ आहे. बालविवाह लावून देण्यात आलेल्या जोडप्याचा आता घटस्फोट लावून देण्यात येतोय. बालविवाह म्हणजे त्या वेळी नवरा नवरीला निर्णय घेण्याची अक्कल नसणार हे आपण समजू शकतो. पण आता कायद्याच्या दृष्टीने सज्ञान झाल्यानंतरही त्या दोघांना न विचारता, केवळ मुलाने मुंबईत परस्पर दुसरे लग्न केले आहे, या कारणास्तव त्यांना घटस्फोटाच्या कागदांवर सह्य़ा करायला लावायच्या, हे कितपत योग्य आहे? यात आपल्या सुनेची काळजी जरूर आहे, आपल्या मुलाची चूक आहे त्यामुळे सुनेची जबाबदारी स्वीकारण्याचा मोठेपणाही आहे. परंतु तरीही मालिकेत आजवर तरी या सुनेने ‘नको हा नवरा’ असं चेहऱयावर दाखवल्याचं दिसलेलं नाही. ती या सगळय़ा परिस्थितीचं निरीक्षण करतेय, तिला अर्थातच वाईट वाटतंय, पण तिने त्याच्यापासून दूर जाण्याचा विचारही केलेला दिसत नाही. ती सासरच्यांना धरून आहे, सासूसासऱयांचं तिच्यावर अतिशय प्रेम आहे. ती शिकलेली आहे, असहाय नक्कीच नाही. मग घरातली मोठी माणसं या दोघांचा घटस्फोट करून तिचं दुसरं लग्न लावायचा विचार तिला न विचारताच कसा घेऊ शकतात? तसंच हा जो मुंबईत दुसरी बायको ठेवणारा नवरा आहे, तोही पहिली बायको नकोच, असं स्पष्टपणे म्हणत नाहीए. किंबहुना त्यांच्यात अजूनही भावबंध शिल्लक आहेत, असंच दाखवलं जातंय. तरीही घटस्फोट म्हणजे एकीकडे मोठेपणाचा आव आणायचा नि पुन्हा बाईच्या डोक्यावर आपला निर्णय लादायचा, असंच झालं ना हे? ही मालिका बालविवाहाच्या विरोधात आहे, दररोजच्या एपिसोडच्या शेवटी एक सल्लाही ती देत असते. पण हा बाईला निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा संदेशही त्यातून जातोच आहे. आधीच आपल्याकडे मुलीला न विचारता तिचं शिक्षण थांबवणं, तिचं लवकर लग्न लावून देणं, तिला मित्र असण्याची परवानगी न देणं हे रूढ आहे. त्यात अशी शिकवण देणं, विशेषकरून या मालिकांचा जबरदस्त पगडा समाजावर असताना, बरोबर आहे का? काय वाटतं तुम्हाला?

Comments