दिलासा देणारा मृत्यू

गेल्या दहा दिवसांत सात मृत्यूच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. मागच्या वर्षाची अखेर आणि नव्या वर्षाची सुरुवात या बातम्यांमुळे काहीशी अस्वस्थ, हताश झाली. एक मृत्यू तर अवघ्या 14 वर्षांच्या कोवळय़ा मुलाचा, अपघातात झालेला. बाकीचे सत्तरी पार केलेल्या, अनेक दिवसांपासून आजारीच असलेल्या व्यक्तींचे. शेवटची बातमी ऐकली ती आज सकाळी, लोकलने ऑफिसला येताना. कोणा एका व्यक्तीने बहुधा आमच्याच लोकलपुढे उडी मारून आयुष्य संपवलेले, असे डब्यातल्या इतर बायकांच्या बोलण्यावरून कळले. तो युवक आणि ही आत्महत्या करणारी व्यक्ती वगळता इतरांचा मृत्यू हा त्यांच्यासाठी आणि काही प्रमाणात त्यांची काळजी घेणाऱया कुटुंबीयांसाठी एक सुटकाच होती, असे आता वाटते. पार्किन्सन, दमा, मधुमेह अशा रोगांनी वर्षानुवर्षे शरीरात घर केलेल्या व्यक्तींसाठी मृत्यू हा सुटका नाहीतर आणखी काय असतो हो? या रुग्णांचे खाणेपिणे, औषधे वेळच्या वेळी देणे, त्यांचे मूड सांभाळून त्यांच्याशी वागणे या सर्वांमुळे घरच्यांना काही वेगळं आयुष्यच उरलेलं नसतं. त्यांना आजारी पडायला जणू सवडच नसते. त्यांचं आयुष्य त्या आजारी व्यक्तीच्या आनंदाभोवती, कम्फर्टभोवती फिरत असतं. मग एक दिवस जे कधी ना कधी व्हायचं असतं ते होतं आणि या भोवतालच्या माणसांना एक मोठं रिकामपण येतं. दिवस त्या आजारी व्यक्तीशिवाय कसा घालवायचा, ते ठाऊकच नसल्याने वेड लागल्यासारखं होतं. हळूहळू त्याचीही सवय होते आणि स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळतो. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, छंद, बाहेरगावी फिरायला जाणं हे सगळं जमू लागतं. आणि काही दिवसांनी वाटायला लागतं, अरे, आपल्या आयुष्यात काही फरकच पडलेला नाही. ती खूप महत्त्वाची व्यक्ती, विशेषत: आई किंवा वडील, आपल्यासोबत नाही आणि तरी आपण हसतखेळत जगतोय, याबद्दल कुठेतरी अपराधी वाटायला लागतं. पण मग लक्षात येतं की ‘शो मस्ट गो ऑन’ हेच खरं. आणि त्यातून हाच दिलासा मिळतो की आपण गेल्यावर, आपल्या मागे राहणाऱया आपल्या लाडक्या व्यक्तीही असंच आपल्याशिवाय चांगलं जगू शकतील. खरं ना?

13-1-12

Comments