चिरतरुण प्रेमगीते

भारतीयांचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे आपलं हिंदी चित्रपट संगीत. त्यातली बहुतेक गाणी प्रेम या संकल्पनेभोवती फिरणारी. ही कर्णमधुर गीतं अनेक वर्षांपासून आपल्या भावविश्वाचा भाग असतात. त्यातली अनेक गाणी आपल्या जन्माच्याही आधीची असतात आणि तरीही आपण ती आवडीने ऐकत असतो. कधीकधी तर एखाद्या गाण्याचं चित्रीकरण कोणावर झालंय, हेही आपल्याला ठाऊक नसतं. (कधीकधी अज्ञानातही सुख असतं. हाय ये तेरे चंचल नैनवा, कुछ बात करे रुक जाए हे लता मंगेशकरांचं अप्रतिम गाणं मी हल्लीच पहिल्यांदा ऐकलं. खूप आवडलं म्हणून यूटय़ूबवर जाऊन त्याचा व्हिडिओ पाहिला आणि पस्तावले. हातात ट्रान्झिस्टर घेऊन अतिशय विनोदी पद्धतीने नाचणारा फिरोज खान दिसला आणि माझं त्या गाण्यावरचं मन उडालं बघा!) ‘अछूत कन्या’मधलं ‘मै बन का पंछी बन बन डोलू रे’ हे गाणं आपल्या सर्वांच्याच आवडीचं. ते तर जवळजवळ 80 वर्षांपूर्वीचं. म्हणजे किमान तीन ते चार पिढय़ांपूर्वीचा तो रोमान्स. अजूनही किता ताजा आणि निर्मळ वाटतो ना. म्हणजे हे गाणं चिरतरुण आहेच पण त्यातली प्रेमभावना अधिक चिरतरुण, कालातीत आहे, हे जास्त खरं. रेडिओवर सकाळी जुनी गाणी लागतात, निवेदक त्यांचं वर्ष सांगत असतो म्हणून ते गाणं इतकं जुनं, 1960/70च्या दशकातलं आहे, यावर विश्वास ठेवायचा. कारण ती गाणी अजूनही खूप ताजी, आजची वाटतात. आजकाल सर्वच एफएम वाहिन्यांवर जुन्या हिंदी गाण्यांचे विशेष कार्यक्रम होतात आणि ते ऐकणारी तरुणमंडळीही खूप असतात. तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाचं शीर्षक ज्या गाण्यावरून घेतलंय ते गाणंसुद्धा (तेरा मुझ से है पहले का नाता कोई) 1973मधलं, जवळपास 40 वर्षांपूर्वीचं आहे. म्हणजे अगदी आजच्या तरुण पिढीलाही प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी आईवडलांच्या तारुण्यातल्या रोमँटिक गीतांच्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो. भारतीयांच्या प्रेमाच्या अनुभवाला या चिरतरुण प्रेमगीतांची साथ असते, हे किती मोठे सुदैव.

१०/२/१२


Comments