यशाची बिकट वाट

‘कॉर्पोरेट महिला राज’बद्दल मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा मनात आलं, का या अचीव्हर्सबद्दल आपल्याला विशेष कौतुक वाटतं? आपण बहुतांश बायका घर/कुटुंब आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारचे काम अशी कसरत करतच असतो की. त्यात कोणावर वृद्ध आजारी माणसांची जबाबदारी असते तर कोणावर अपंग मुलाची. कोणाला एकटीच्या बळावर मुलांना सांभाळून घर चालवावं लागतं. मग त्यांच्यात आणि या उच्चपदस्थ, तथाकथित करिअरिस्ट बायकांमध्ये काय वेगळेपण आहे बरं? त्या इतक्या वर कशा पोचू शकतात की त्यांना काही वेगळं बाळकडू मिळालेलं असतं? कारण एकूणच भारतातली कामाची संस्कृती ढिसाळ आहे. मन लावून, जीव ओतून काम करणाऱया लोकांचं कौतुक आपण मनापासून करतो पण जीव तोडून मेहनत करणं, ये अपने बस की बात नहीं! (कष्टेविण फळ नाही, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, हे फक्त वाक्प्रचारांपुरतंच.) त्यामुळे बाळकडू जरा कठीणच शक्यता दिसते.

पण विचार करा, जर आपण आपल्या मुलींना आणि मुलांनादेखील लहानपणापासून कष्टाचं महत्त्व शिकवलं, तर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना कोणतंही काम करायला लाज वाटणार नाही. शिवाय, कष्टाने ती किती पुढे जाऊ शकतील. आपण मुलींना लहानपणापासून घर स्वच्छ ठेवायला, स्वयंपाक करायला, कुटुंबीयांची काळजी घ्यायला शिकवत असतो. त्याच वेळी तिला थोडं स्वातंत्र्य दिलं, आर्थिक जबाबदारी टाकली, जमेल तितकं बाहेरचं जग बघायची संधी दिली तर जगाचा सामना करायला ती कितीतरी अधिक समर्थ होईल. तिच्या अंगी असलेल्या कौशल्याला खतपाणी घातलं, त्याची जोपासना करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिलं तर तिची स्वत:ची वाढही किती जोमाने होईल. तिच्यात आत्मविश्वास निर्माण होईल आणि जगाला सामोरं जायला तिची पुरेपूर मानसिक तयारी झालेली असेल. मुलगा आणि मुलीला एकाच प्रकारे, कोणताही फरक न करता, एकाच प्रकारे वाढवले तर तो मुलगा मोठा होईल तेव्हा आजूबाजूच्या स्त्रियांना योग्य प्रकारे, समानतेने वागवेल आणि ती मुलगी अधिक आत्मविश्वासाने जगू शकेल. पटतंय तुम्हाला?

Comments