लगबगीचे दिवस

बघता बघता गुढीपाडवा आला की. होळीपर्यंत बस्तान मांडलेली थंडी आता काढता पाय घेतेय. त्यामुळे शाली, स्वेटर्स, गोधडय़ा, मफलर, इ. दोन दिवस उन्हात कडक वाळवून बासनात बांधून ठेवायची लगबग असेल सगळीकडे. आणि त्याचबरोबर लगबग असेल परीक्षांची. लगोलग लगबग असेल वाळवणं घालायची, लोणची घालायची. लगबग आमरस पुरीचा बेत करण्याची. लगबग उन्हाळय़ाच्या सुटीत कुठे फिरायला जायचे त्याच्या नियोजनाची. लगबग मुलांना घेऊन हक्काने आठवडाभर तरी माहेरी जाण्याची. आणि सुटीत आजोळी येणाऱया भाचवंडांसाठी खाऊ करून ठेवण्याचीसुद्धा. कदाचित लगबग घरी असलेल्या एखाद्या लग्नाची वा मुंजीची. आणि चैत्रातली विशेष लगबग हळदीकुंकवाची, आंब्याची डाळ आणि पन्हं करण्याची. तर, सर्वांना चैत्र पाडव्याच्या, नववर्षारंभाच्या खूप शुभेच्छा.

काल घरी काही कार्य होतं, तीसचाळीस माणसांच्या पंक्ती दोन दिवस सकाळसंध्याकाळी उठत होत्या. बहुतेक पाहुणे निघून गेले आणि अचानक लक्षात आलं की अंग खूप दुखतंय. सारखं बोलून घसा दुखतोय. काही करू नयेसं वाटतंय पण समोर घरभरचा पसारा दिसतोय. पंक्तीत वाढून, सारखं खाली वाकून, उठबस करून पायाचे तुकडे मोडलेत. आणि दुसरीकडे घरातली, सत्तरीतली मोठी काकू तासन्तास ओटय़ासमोर उभी राहून काही ना काही करत होती, तिच्या तोंडून हूं का चूं नाही. एकदाही तिने ‘आई गं’सुद्धा केलं नाही. आणि आम्ही तिशीचाळिशीतल्या मुलीसुना रजा घेऊन घरी बसलोय. आमच्या पिढीचा स्टॅमिनाच कमी झालाय, असं आतापर्यंत अनेकदा जाणवत होतं, त्यावर आता शिक्कामोर्तब झालं एवढंच. आईच्या किंवा आजीच्या पिढीतल्या बायकांना प्रत्येक गोष्ट करायची जेवढी हौस आहे, उत्साह आहे आणि आतिथ्य निभावण्याची क्षमता आहे, त्याच्या निम्म्यानेसुद्धा आमच्यात नाही, या तरुण वयातही नाही. मंगळागौरीचे खेळ असोत की दिवाळीतला फराळ असो, आम्ही तर लगेच दमतो किंवा चक्क कंटाळतो. कुठे गेला तो उत्साह, हौस, स्टॅमिना? कशामुळे हरवली जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याची आमची क्षमता? तुमच्याकडे आहे याचं उत्तर?

Comments