मागच्या तीन महिन्यांत तीन अशा गावांना गेले जिथला कापडबाजार अतिशय प्रसिद्ध आहे. जळगाव, इंदूर आणि जयपूर. स्त्रीसुलभ खरेदीच्या प्रेमापोटी तिन्ही गावांतल्या बाजारात जाऊन तिथली वैशिष्टय़पूर्ण ड्रेसची कापडं घेतली. जळगावहून खूप सुंदर प्रिंटची सुती कापडं, इंदूरच्या बाजारातून महेश्वरी तर जयपूरहून बांधणी अशी भरपूर खरेदी झाली. काही दिवस सगळी कापडं कपाटात जागा मिळेल तिथे कोंबून ठेवली होती. परवा सुटीच्या दिवशी वापरातले आहेत त्या ड्रेसची पाहणी केली. हळुहळू उन्हळा येतोय, त्या दृष्टीने हलक्या रंगाचे, सुती ड्रेस पाहून ठेवले. आणि लक्षात आलं की भरपूर कपडे आहेत माझ्याकडे. नवीन आणलेल्यापैकी एकाही कापडाचा ड्रेस शिवायची आवश्यकताच नाहीए. मला एकदम अपराधी वाटायला लागलं. पैसे खर्च केल्यापेक्षा गरज नसताना खर्च केल्याचा माझा मलाच खूप राग आला. पण आता काही उपयोग नव्हता, कापडं पावसाळा संपेपर्यंत तशीच बासनात बांधून ठेवावी लागणार. (पावसाळय़ात सुती आणि हलक्या रंगाचे कपडे वापरणं चिखलामुळे अशक्य असतं म्हणून.) मग मी विचार केला, बाहेरगावी गेल्यावर नेहमीच खरेदीवर बरेच पैसे का खर्च होतात? तिकडचं स्पेशल कापड, हस्तकला, खाऊ असं सगळं विकत घ्यायची किती हौस असते आपल्याला. तसं बघितलं तर मुंबईत देशातल्या सर्व राज्यांच्या हस्तकला आणि हातमाग विभागांची कार्यालयं/दुकानं आहेत, डिसेंबर जानेवारीत अनेक मोठी प्रदर्शनं लागतात, ज्यांमध्ये ही कापडं/वस्तू मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतात. तसं म्हटलं तर किमतीत फार फरक नसतो. मग तरीही असं का होतं? बाहेरगावी गेलं की खरेदी करायचीच, हा जणू नियमच होऊन बसला आहे. सर्व पर्यटन संस्थांच्या जाहिरातींमध्येही एक दिवस खरेदीसाठी ठेवलेला असतो. दुबई, हाँगकाँग, मलेशिया या ठिकाणी तर अनेक लोक फक्त खरेदीसाठी जातात. खरेदीमुळे ताण कमी होतो, नैराश्य कमी होतं, छान वाटतं असं मानसशास्त्रानेच सिद्ध केलंच आहे. पण या छान वाटण्यासाठी घरात आपण अनावश्यक सामानाची गर्दी करत असतो, आणि पैसा चक्क उधळत असतो, हेही तितकंच खरं ना?
१७/२/१२
१७/२/१२
Comments
Post a Comment