लागले वेध परीक्षेचे

रस्त्यात दोघी मुलींच्या गप्पा कानावर आल्या. त्यातल्या एकीने तिच्या दहावीत असलेल्या मैत्रिणीला फोन केला होता, गप्पा मारायला थोडा वेळ येतेस का विचारायला. फोन तिच्या वडलांनी उचलला. ‘आता एसएससीची परीक्षा संपेपर्यंत ती खाली येणार नाही, तिला फोनही करू नकोस,’ असे त्यांनी तिला सांगितले. मग या दोघींची त्यावर चर्चा.

‘काय गं, आता अडीच महिने हे तिला कोंडून ठेवणार घरात? बिच्चारी.’ ‘हो ना, अभ्यास तरी कसा करावासा वाटेल, असं केलं आईबाबांनी तर?’

हे बोलणं ऐकून मी हैराण झाले आणि काहीशी बुचकळय़ातही पडले. दहावीची परीक्षा आहे म्हणून अडीच महिने बाहेरच्या जगाशी संपर्क तोडायचा, ही कल्पनाच मला असह्य़ वाटली. रोजची शाळा तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात संपेल. त्यानंतर थोडे दिवस क्लास. आणि नंतर 24 तास घरात? बरं, घरात टीव्हीसुद्धा बंदच असणार. म्हणजे डोक्यात फक्त अभ्यास आणि अभ्यास. बाप रे! वाचलेलं किंवा लिहिलेलं घुसणार आहे का डोचक्यात अशा परिस्थितीत? बरं या काळात बाहेरच्या जगात इतकं काय काय घडणार असतं. अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. पूर्वीसारखा निवडणुकांचा गदारोळ आता नसला तरी काही ना काही आवाज येतच असतात. खेरीज होळी आहे, लग्नाचा मौसम तर आहेच. क्रिकेटचे सामने आपल्या पाचवीलाच पुजलेले असतात. कोणाचे वाढदिवस येत असतील, घरी काही कार्य असेल. पण या दहावी/बारावीतल्या मुलांनी या सगळय़ाकडे दुर्लक्ष करून केवळ अभ्यास करावा, अशी त्यांच्या आईवडलांची इच्छा असते. आणि ती पूर्ण करण्यासाठी हे आईवडील चक्क रजा घेऊन मुलांवर 24 तास देखरेख ठेवत असतात. काय असते यामागे? मुलांनी समाजमान्य मार्गांनी यशस्वी व्हावे म्हणजे थोडक्यात भरपूर पैसे कमवावे, एवढीच इच्छा यामागे असते ना. पण या प्रयत्नात त्यांनी आयुष्यात सुखी व्हावे, त्यांना समाधानाने जगता यावे, यासाठी आईवडील प्रयत्न करतात का? तुम्ही या परिस्थितीत काय केलंत, किंवा काय करणार आहात?

3-2-12

Comments