बँकेतले दोन अनुभव

काल आणि आज दोन वेगळय़ा बँकांमध्ये जाण्याचा योग आला. परदेशात अकाली मरण पावलेल्या एका मित्राची पत्नी इथली काही कामे पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली होती. मित्राचे राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते बंद करण्याची सर्व कागदपत्रे तिने सकाळी पूर्ण केली आणि दोन तास बँकेत बसून घरी आली तोच बँकेतून फोन आला, खाते बंद करण्याचा दंड भरायचा बाकी आहे. पुन्हा ती बँकेत गेली तेव्हा मी तिच्यासोबत गेले. या बँकेत त्या वेळी किमान 50 ग्राहक उभे/बसलेले होते, काही बाहेर होते. आम्ही संबंधित कर्मचाऱयाकडे गेलो. मित्राच्या पत्नीने जी कागदपत्रे सकाळी सादर केली होती त्यात दंड भरल्याची पावतीही होती हे आम्ही त्या कर्मचाऱयाच्या लक्षात आणून दिले. मग ती सॉरी म्हणाली आणि तिने ते कागद पुढे पाठवले. ज्या टेबलावर पाठवले तिथला कर्मचारी बरोबर 20 मिनिटे गायब होता. आल्यावर त्याने पुढचे काम पूर्ण केले आणि आम्ही बाहेर पडलो. काहीही कारण नसताना आमचा पाऊण तास बँकेत गेला होता.

दुसरा अनुभव आज सकाळचा. पीपीएफ खाते उघडण्यासाठी मी एका खाजगी बँकेत गेले. साधारण काय कागद लागतील याचा अंदाज होता त्यामुळे ते आणि फोटो सोबत होते. बँकेत एखाददुसराच ग्राहक होता. मी आत जाऊन काहीशी घुटमळत असतानाच एका कर्मचाऱयाने विचारले, काय हवंय? मी सांगितल्यावर तिने समोर बसायला सांगितले, अर्ज दिला, तो लगेच भरून घेतला आणि चार दिवसांनी पासबुक घेऊन जायला सांगितले. दोनदा अर्ज भरताना अडचण आल्यावर तिने तिच्या वरिष्ठ सहकाऱयाला फोनवरून विचारून तो विषय तिथेच संपवला. मी या 10 मिनिटांत फक्त एका कर्मचाऱयाशी बोलले, शांतपणे बसून अर्ज भरला आणि बाहेर पडले.

हे असे का, हे मला समजलेले नाही. (राष्ट्रीयीकृत बँकेत सकारात्मक आणि खाजगी बँकेत नकारात्मक अनुभव येतही असतात, पण अपवादानेच.) दोन्ही बँका, कर्मचारी आणि ग्राहकही भारतीयच. मग त्यांच्या कामात एवढा मोठा फरक का बरे? तुम्हालाही असे अनुभव आले असतीलच. त्यामागचा कार्यकारणभाव समजलाय का तुम्हाला?

20-1-12 

Comments