अशीही एक किट पार्टी

आठ मैत्रिणींचा एक ग्रूप. जवळजवळ 25 वर्षांपासूनचा, म्हणजे कॉलेजजीवन सुरू झाल्यापासूनचा. आता सगळय़ा जणी चाळिशीत आलेल्या. पंचवीस वर्षांत नेहमी भेटत नसल्या तरी फोन/ईमेलवरून संपर्क होता. सगळय़ा जणी एकमेकींच्या लग्नाला, मुलींच्या बारशाला गेलेल्या. (सगळय़ांना मुलीच आहेत आणि त्याही आता एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या आहेत.) हळुहळू प्रत्यक्ष भेटी कमी होऊ लागल्या आणि भेट व्हावी म्हणून मुद्दाम काहीतरी करावंसं वाटायला लागलं त्यांना. मग एकीने पुढाकार घेऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संडे ब्रंच बुक केला सगळय़ांसाठी. दुपारी साडेबाराच्या सुमारास सगळय़ा जमल्या आणि जेवण, कॉफी घेऊन बाहेर पडल्या तो अंधार पडला होता. सहा सात तास कसे गेले ते कळलंच नाही त्यांना, इतकं एकमेकींशी बोलण्याजोगं, सांगण्याजोगं आणि ऐकण्याजोगं होतं. आणि यात केवळ आपल्या दर्दभऱया कहाण्या नाही हं ऐकवल्या त्यांनी. आनंदाच्याही खूप गोष्टी त्यांच्याकडे आणि त्या आनंदात आपल्या सगळय़ात जवळच्या मैत्रिणींनी सहभागी झाल्याने तो शतगुणित झाला होता. निघताना निरोप घेण्यातच त्यांचा अर्धा तास गेला असेल. या जेवणालाही वर्ष उलटलं, दर तीन महिन्यांनी नक्की भेटायचंच, या आश्वासनावर अर्थातच पाणी पडलं होतं. पुन्हा मधनंमधनं फोन/ईमेलवरूनच गप्पा होऊ लागल्या. मग एकीने उपाय शोधून काढला. तिने सर्वांना कळवलं की आपण एक ‘किट - कीप इन टच’ प्रकल्प सुरू करूया. प्रत्येकीने रोज सगळय़ांना एक ईमेल लिहायची. एक ओळसुद्धा चालेल, पण आपल्या ठरलेल्या दिवशी काही ना काही लिहायचंच. या त्यांच्या किट प्रकल्पाला दोन महिने होत आलेत. बहुधा कोणी आपली लिहायची पाळी चुकवत नाही. कॉलेजमधल्या विसर पडलेल्या घटनांना उजळा मिळतोय, त्या दिवशी काही विशेष घडलं असेल तर ते लगेच सर्वांना कळवलं जातंय, तरुण वयातल्या मुलींना वाढवताना येणाऱया अनुभवांची देवाणघेवाण होतेय आणि खूप काही शिकायला मिळतंय पुन्हा, ज्यांच्यासोबत कॉलेजच्या वर्गात बसून अभ्यासाचे धडे घेतले त्यांच्यासोबत आयुष्याचे धडे मिळतायत. खूप खूष आहेत त्या. तुमचीही आहे का अशी एखादी किट पार्टी?

२४/२/१२ 

Comments