जगण्याचा हुरूप देणारी सुरेखा

आमच्याकडे 10 वर्षांपूर्वीपर्यंत कामाला एक बाई यायच्या. मराठीच होत्या, कोकणातल्या. बाइभच्या जीवन सर्वसाधारण त्या वर्गातल्या इतर बायांसारखं, म्हणजे दारू पिणारा नवरा आणि यांच्या पगारावर चालणारं घर. परवा त्यांची मुलगी सुरेखा घरी आली होती, तिच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला. तिची कथा आईसारखीच. पण सुरेखा खमकी होती आणि तिला आपल्याला नक्की काय हवंय, हे ठाऊक होतं. लग्नानंतर तिने गावाला सात आठ वर्षं काढली. पण नवरा मुंबईत, दारू प्यायचा, कामावर जायचा नाही. आणि गावी तिला करण्यासारखं काही नव्हतं. एक दिवस ती उठून मुंबईला आली, दोन्ही मुलांना शाळेत घातलं आणि घरकाम करायला लागली. सकाळी आठला घरचं आवरून जी बाहेर पडायची ती रात्री आठला घरी पोचायची. खूप कष्ट घेतले तिने. नशिबाने मुलगा आणि मुलगी चांगले निघाले. दोघं शिकले, नोकरी करायला लागले. हळुहळू सुरेखाने गावाला घर बांधलं. ‘मुंबै शिश्टम’ असलेलं. अत्यंत शहाणपणाने तिने नवऱयाला गावी पाठवलं, तिकडच्या घराची राखण करायला. नाहीतरी तो इकडे मुंबईत दारू पिऊन हिचा कष्टाचा पैसा उडवायचा. तोही तिथे मजेत आहे. आता मुलगा आणि मुलीचं आठवडय़ाभराच्या अंतराने लग्न आहे. मुलाला वेगळी जागा घेऊन दिली आहे तिने. सूनही नोकरी करणारी आहे आणि मुलीनेच शोधलेला जावई ‘माळकरी’ आहे, कोणतंही व्यसन नसलेला. त्यामुळे सुरेखा खूष आहे.

अशा कित्येक सुरेखा आपल्या ओळखीच्या असतात, किंबहुना आपल्या सर्वांना दैनंदिन कामात महत्त्वाची अशी मदत करणाऱया बहुतांश बाया ‘सुरेखा’च असतात. त्यांच्यात खूप जिद्द असते. सर्वात मोठी महत्त्वाकांक्षा असते ती मुलांना शिक्षण मिळावं ही आणि त्यासाठी कितीही कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. आपल्या आयुष्याबद्दल त्या फार कधी तक्रारही करत नाहीत. पण परिस्थितीला शरणही जात नाहीत. तुमच्या ओळखीत आहे अशी एखादी सुरेखा, जिच्याकडे बघून तुम्हालाही हुरूप येतो जगण्याचा आणि परिस्थितीचा सामना करण्याचा? कळवाल तिची गोष्ट आम्हाला?

20.04.2012

Comments