प्रार्थना

माझी एक रशियन मैत्रीण आहे, आता अमेरिकेत स्थायिक झालीय. दोन-तीन वर्षांपूर्वी भारतात आली होती, सरागेट मदरकडून मूल हवं होतं तिला. नवरा मूळचा इटालियन, आता अमेरिकन. दोघंही 42-43 वर्षे वयाचे असल्याने त्यांची निरोगी मूल जन्माला घालण्याची क्षमता हळूहळू कमी होत चाललेली. ती मला आणि इतरांना सांगायची, ‘प्लीज पे्र फॉर मी.’ एकदा आम्ही दोघीच असताना ती म्हणाली, ‘मी वीस वर्षांची होते. मॉस्कोत राहत होते आई-वडिलांसोबत. अमेरिकेला जायचं हे एकमेव ध्येय होतं माझं.’ एका मित्रासोबत असुरक्षित संभोगानंतर तिला शंका आली की ती गरोदर आहे. तेव्हा तिने मनापासून देवाची प्रार्थना केली की देवा, मला मूल नकोय. ‘त्याने माझं तेव्हा ऐकलं आणि म्हणून मला नंतर हवं असूनही मूल होत नाहीये. आता मी कितीही प्रार्थना केली तरी त्या प्रार्थनेचा परिणाम उलटवू शकत नाहीये मी.’ अजूनही तिचे मूल होण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत, प्रार्थनाही अर्थातच आहेत; पण त्याला फळ आलेलं नाही.

तिच्या प्रश्नाला वैद्यकशास्त्राच्या मदतीने ती उत्तर शोधतेच आहे; पण धार्मिक म्हणा वा आध्यात्मिक, तेही प्रयत्न तिने चालूच ठेवले आहेत. ती न्यूयॉर्कमधल्या एका जपानी मंदिरात जात असते मन:शांतीसाठी. कधी समविचारी मैत्रिणींना घरी बोलावून सामूहिक प्रार्थना करत असते. कधी जगभर पसरलेल्या तिच्या मैत्रिणींना ई-मेलवरून विनंती करत असते, माझ्यासाठी अमुक एका वेळी प्रार्थना करा म्हणून.

तिचा असा मेल आला की मला आठवतं एलिझाबेथ गिल्बर्टचं ‘ईट प्रे लव्ह’ हे पुस्तक. या पुस्तकावर आधारित चित्रपटात ज्युलिया रॉबर्ट्सने प्रमुख भूमिका केली होती. या चित्रपटातील काही भागाचं चित्रीकरण गेल्या वर्षी भारतात झालं होतं. त्यातही लेखिकेने प्रार्थनेच्या शक्तीबद्दल लिहिलं आहे. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातही पुरस्कार स्वीकारताना शाहरुख खान म्हणतोच ना, ‘अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हे मिलाने की कोशिश में लग जाती है।’ तुम्हाला आलीय प्रचिती कधी प्रार्थनेच्या शक्तीची?

Comments