नक्की काय हवं?

असं झालंय का कधी तुमच्यासोबत? एखाद्या गोष्टीची/समारंभाची तुम्ही खूप वाट पाहत असता आणि प्रत्यक्ष ती गोष्ट हातात येते किंवा तो समारंभ येऊन ठेपतो तोपर्यंत त्याची मजा निघून गेलेली असते. किंवा उत्साह खूप कमी झालेला असतो. किंवा काही तरी व्हावं असं तुम्हाला अगदी खूप मनापासून वाटत असतं, उदा. ‘त्या’ने हो म्हणणं, एखादी नोकरी मिळणं, मुलगी होणं, आवडत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणं, या झाल्या काही मोठ्या गोष्टी ज्या अनेकांना हव्याहव्याशा वाटत असतात, तर वेळेवर गाडी मिळणं, वाचनालयात हवं ते पुस्तक असणं, शिंप्याने कपडे दिलेल्या तारखेला तयार ठेवणं, आवडत्या डिझाइनची चप्पल आपल्या मापाची मिळणं, यांसारख्या छोट्या गोष्टी. त्या झाल्या की कधी कधी वाटून जातं, आपण एवढं महत्त्व दिलं याला, किती डोक्याला भुंगा लावून घेतला, तो यासाठी? ‘चीनी कम’ चित्रपटातला एक प्रसंग आठवतो.

अमिताभ बच्चन तब्बूच्या बापाने आपल्या लग्नाला हो म्हणावं, यासाठी त्या खांबाभोवती हात जुळवण्यासाठी किती आटापिटा करतो. आणि त्याला त्याची लंडनमधली बालमैत्रीण, जिला कर्करोग झालेला आहे, ती गेल्याचा फोन येतो. तो धावत पुन्हा त्या खांबाकडे जातो आणि म्हणू लागतो, तिला अजून जगू दे, तिला बरं होऊ दे. त्या क्षणी त्याला तब्बूच्या बापाच्या होकारापेक्षा मैत्रिणीच्या आयुष्याचं महत्त्व मोठं वाटतं; पण आता ती काही परत येणार नसते. मला तर असं खूपदा वाटतं, कशासाठी एवढा आटापिटा, अट्टहास, जिवाची तडफड, ताण, चिडचिड केली आपण? एवढ्याशा कारणासाठी? म्हणजे खरं तर आपल्याला कळतच नाही की काय, काय हवंय ते? की ते मिळत नसतं तोवरच त्याची मजा वाटत असते? एखाद्या व्यक्तीला खूप भेटावंसं वाटत असतं आणि प्रत्यक्ष भेटल्यावर काय बोलायचं ते कळतच नाही. कसा तरी वेळ जातो त्या भेटीत. का होतं बरं असं? तुम्हाला वाटतं असं कधी? कळवाल ना मला...

Comments