प्लीज, सॉरी आणि थँक यू

एखाद्या कृतीवर समोरच्याची प्रतिक्रिया यावी, त्याला दाद मिळावी अशी अपेक्षा माणसाचीच नव्हे तर अगदी घरोघरी पाळलेल्या कुत्र्यामांजराचीसुद्धा असते. मग एखाद्या पाककृतीला, चित्राला, कौतुकास्पद कामगिरीला किंवा लिखाणालाही दाद मिळावी, अशी अपेक्षा करणं चुकीचं तर नव्हेच, पण साहजिकच आहे. पाळीव प्राण्यांसाठी पाठीवरून फिरवलेला हात पुरेसा असतो तर माणसाला वा, मस्त, छान, क्या बात है हे शब्द. पण तेही देण्यात आपण खूप कंजूषपणा करतो नाही बºयाच वेळा? आईने केलेले कांदेपोहे एखाद्या दिवशी मस्त जमलेले असतात किंवा मुलाने खोली मस्त आवरून ठेवलेली असते किंवा नवºयाने रविवारी सकाळी आपण उठायच्या आधीच चहा करून ठेवलेला असतो, पण आपल्या तोंडून काही निघत नाही, ‘आई, पोहे एकदम झकास’. किंवा, ‘आज किती छान दिसतेय खोली बाळा.’ किंवा, ‘आयता चहा पिताना किती मस्त वाटतंय हो.’ असं म्हणतात की प्लीज, सॉरी आणि थँक यू या तीन शब्दांच्या बळावर दुनिया जिंकता येते. पण ते तोंडातून निघतील तेव्हा...

अशीच भरभरून दाद दिलीय मधुरिमाच्या वाचकांनी. महिला आणि पुरुषांनीही. आम्ही वेगवेगळे विषय हाताळायचा प्रयत्न नेहमीच करत असतो. त्यातून मनोरंजन तर व्हावेच, खेरीज वाचकांच्या एका मोठ्या वर्गाला ते वाचनीय वाटावेत आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करावे असा आमचा हेतू असतो. सर्वच विषय सर्वांनाच पटतील/रुचतील असे नसते. ते पटावे असे अपेक्षितही नसते. परंतु ते का पटले नाही वा का पटले, हे आमच्यापर्यंत पोचले पाहिजे, असे मनुष्यसुलभ स्वभावाला अनुसरून आम्हाला वाटत असते. म्हणूनच या पत्रांचे स्वागत आहे. त्यातून वेगळे विचार तर आमच्यापर्यंत पोचतातच; पण आमचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे का, याचा अंदाज येतो. म्हणून या पत्रांचे अप्रूप. तर काही चुकत असल्यास सॉरी, आम्हाला त्याबद्दल प्लीज लिहा. (आणि काही आवडलं तरीही, अर्थातच.) आणि पत्रं लिहिल्याबद्दल सर्वांना थँक यू!

Comments