आज एका इंग्रजी दैनिकात एक बातमी वाचली. कासव आणि कासविणीचा घटस्फोट! शीर्षक वाचून काही अंदाज येईना बातमी काय असेल याचा म्हणून लगोलग वाचायला घेतली. आणि वाचून थक्क झाले. शंभरहून अधिक, निश्चित सांगायचं तर 115, वर्षांचं महाकाय कासवांचं (जायंट टर्टल्स) एक जोडपं - बिबी आणि पोल्डी - युरोपात ऑस्ट्रियामधल्या एका प्राणिसंग्रहालयात आहे. त्याआधी ते दुस-या देशात होतं. आता या कासविणीला अचानक जोडीदार नकोसा झालाय. काही दिवसांपूर्वी तिने चक्क पोल्डीच्या कवचाचा लचका तोडला. नंतरही तो जेव्हा तिच्याजवळ गेला, तिने त्याच्यावर हल्ला केला. तिला तिच्या पिंज-यात एकटंच राहायचंय, हे बिबीने तिच्या वागण्यातून स्पष्ट दर्शवलं आणि प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी चक्रावून गेले. हे लक्षात आल्यावर त्यांनी या जोडप्याला रोमँटिक खाद्य देऊ केलं; जेणेकरून ती दोघं एकत्र येतील. त्यांना एकत्र काही खेळ खेळायला प्रवृत्त केलं. एवढंच काय, हे कर्मचारी या दोघांशी सारखं बोलतायतही, की अरे असं काय करताय? मिटवा हे भांडण. परंतु ही ढिम्म. तिला तो नकोच आहे. त्यामुळे आता त्यांना कदाचित वेगळं ठेवण्यात येईल. कदाचित त्यांच्यासाठी दुसरे जोडीदारही शोधण्यात येतील. अभ्यासकांसमोर मात्र या जोडप्याने एक नवाच विषय आणून ठेवला आहे. या दोघांमधले मतभेद लुटुपुटुचे आहेत की खरेखुरे? का वागली असेल बिबी अशी? तिच्या मेंदूत/शरीरात कोणत्या प्रकारचे बदल झाले म्हणून तिला एका शतकाचा तिचा जोडीदार नकोसा झालाय? ती बोलू शकत असती तर काय सांगितलं असतं तिने या अभ्यासकांना? कंटाळा आलाय मला, काहीतरी नवीन, एक्सायटिंग हवंय आयुष्यात आता? की तो खूप भराभर चालतो, आणि त्याच्या बरोबर फिरताना मी मागे पडते म्हणून? की मला तरुण जोडीदार हवाय म्हणून? की म्हणाली असती बास झालं हे कोणाची तरी बायको म्हणून राहणं, आता मला एकटीला राहायचंय. हवंय कोणी कशाला सोबत? काय वाटतं तुम्हाला?
Comments
Post a Comment