पुंडलिक वरदा

पुंडलिक वरदा हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. उद्या आषाढी एकादशी. पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची रांग लांबच लांब पार गावाबाहेर गेली असेल. वारीबरोबर चालत गेलेले अनेक वारकरी कळसदर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागले असतील. विठुरायाही भक्तांच्या दर्शनाने खुश होऊन गेला असेल. मीही एकदा या वारीत दोन दिवसांसाठी सहभागी झाले होते. एक उत्सुकता होती, काय आहे हे वारी प्रकरण ते पाहण्याची, अनुभवण्याची. देशमुख दिंडीसोबत दोन दिवसांत 35 किमी चालले असेन. सोबत ओळखीची समवयस्क मित्रमंडळी होतीच. मात्र, ती दरवर्षी जाणारी, दिंडीचे सगळे नियम, परंपरा माहीत असणारी. मी नवखी. त्या दोन दिवसांमधलं मुख्य लक्षात काय राहिलं तर इतकं चालून मुंबईला आल्यावर पाय अजिबात दुखत नव्हते. मी अपेक्षा केली होती की गरम पाण्यात पाय घालून बसावं लागेल, ऑफिसला दांडी मारावी लागेल एखादा दिवस. पण नाही, मी एकदम फ्रेश होते. देवाला जाऊन आलेय त्यामुळे पाय दुखत नाहीत, असं मानण्याइतकी भाविक मी नाही, पण असं झालं हे मान्य.

तीन वर्षांनंतर आजही लक्षात राहिलीय ती गर्दी. लाखो माणसं, जनसागर, नजर जाईल तिथपर्यंत माणसं असं आपण नेहमी म्हणतो. पण इथे खरोखरच तशी परिस्थिती होती. लक्षात राहिली तरी 17/18 दिवस एकाच दिशेने वाट चालणारी एक परिपूर्ण दुनिया. लक्षात राहिली माळशिरसच्या एका कुटुंबाने केलेली आम्हा बायकांची राहायची/अंघोळीची सोय. आणि निघताना बांधून दिलेली शिदोरी - भाकरी आणि चटणीची. (अनेक वर्षं हे कुटुंब वारक-यांची अशी सेवा करतंय आणि त्यातच धन्यता मानतंय.) आणि लक्षात राहिला परतीचा प्रवास, त्याच रस्त्यावरून केलेला, पण गाडीतून. सुनासुना रस्ता. रस्त्यावर आणि आसपासच्या शेतात पडलेला कचरा. क्वचित कुठेतरी विसरून गेलेले कपडे. रिकामी हॉटेलं. मनात एक अजब समाधान आणि खिन्नता. आणि पुढच्या वर्षी नक्की यायचं हं, हा निर्धार.

Comments

  1. सुंदर आणि नेटका लेख. माउली.

    ReplyDelete

Post a Comment