बाबा

लहान बाळासाठी आई सर्वाधिक महत्त्वाची असली तरी त्याच्या तोंडून पहिला आवाज, मी शब्द म्हणत नाहीए, निघतो तो म्हणजे बा बा बा... मग हळूहळू त्याचा बाबा होतो किंवा बाबा होतात. बाळ मोठं होत जातं तशी या बाबाची वेगवेगळी रूपं त्याला दिसू लागतात. खांद्यावर घेऊन रात्री झोपवणारा. थोडी मान धरायला लागल्यावर बाळाला पोटावर घेऊन त्याच्याबरोबर स्वत:ही झोपून जाणारा.

पाठीवर घेऊन घोडाघोडा खेळणारा. उंचावर उभं करून उडी मारायला लावून दोन्ही हातात घेणारा. आईपेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगणारा. बाइकवरून शाळेत सोडायला येणारा. मोटारीत तो ती चालवतानाही त्याच्या मांडीवर बसू देणारा, मधूनच हॉर्न वाजवू देणारा. ट्रेनने लांबच्या प्रवासाला निघालं की स्वत:च बरंचसं सामान उचलू पाहणारा. डब्यात काहीही विकायला आलं तरी ते घेण्याची तयारी दाखवणारा. रात्र झाली की सगळ्यांच्या बर्थवर चादरी पांघरून सगळे झोपले की मगच पाठ टेकणारा आणि रात्रभर सावध झोपणारा. मुलं खरेदीचा आनंद लुटत असताना, किमतीकडे पाहून वस्तू आवडलीच नाहीए असं दाखवणा-या आईला हळूच ती घ्यायचा आग्रह करणारा. मुलं मोठी झाली की कामाच्या व्यापातून वेळ मिळेल तसा त्यांचा अभ्यास घेणारा.

संध्याकाळी घरी यायला उशीर झाला की आवाज चढवणारा. फारच विचित्र वा त्याच्या मनाविरुद्ध वागलं तर एक कानफटात लावून देणारा. मुलगा किंवा मुलगी, शिकायला बाहेरगावी जाणार म्हटलं की प्रॅक्टिकल आणि इमोशनल अशा दोन्हींच्या कचाट्यात सापडणारा. चांगले मार्क मिळाले की जगाला बातमी देण्याआधी पेढ्याचा पुडा देवासमोर ठेवणारा. मुलीचं लग्न ठरलं की अचानक स्वभावाच्या विरुद्ध हळवा, सरबरल्यासारखा वागणारा आणि तिच्या लग्नात पैसा पाण्यासारखा ओतणारा. मुलाचं लग्न ठरलं की सूनबाई कशी असेल, तिच्याशी कसं वागायचं या ताणात सापडणारा. निवृत्त झाला की चोवीस तास घरात बसून आईचं डोकं फिरवणारा. आजारी पडला तरी त्याकडे दुर्लक्ष करणारा, फारच झालं तर त्यातल्या त्यात कमी पैसे कसे खर्च होतील हे पाहणारा. आणि अमरत्व मिळालं नसल्याने केव्हातरी मुलांना पोरकं सोडून जाणारा बाबा. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने समस्त बाबा वर्गाला सलाम.

Comments