छोटीशी गोष्ट

फेसबुकवर परवा एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली. छोटीशी. ‘एकदा काय झालं, एका मुलीला एका मुलाने विचारलं, माझ्याशी लग्न करशील का. ती नाही म्हणाली. त्यानंतर ती सुखाने राहिली. तिचं घर खूप स्वच्छ होतं, तिने स्वयंपाक केला नाही, खूप मौजमजा केली आणि नेहमी सुंदर दिसत राहिली. संपली गोष्ट.’

याच्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. बहुतेक बायकांनी त्यावर फक्त एक स्मायली टाकली होती. पुरुषांनी मात्र ज्या कॉमेंट्स केल्या होत्या त्या वाचून हसू आलं आणि वाईटही वाटलं. तिने स्वयंपाक केला नाही, मग ती काय उपाशी राहिली का, हा बहुतेकांचा सवाल होता. असं नेहमी म्हटलं जातं, उगीचच की, बायकांना विनोदबुद्धी नसते; पण ही प्रतिक्रिया वाचून वाटलं की, या पुरुषांना या गोष्टीमागची गंमत आणि व्यथा, दोन्ही का नाही कळलं?

क्वचितच कोणी बाई असेल जिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वयंपाकाविषयी विचार, नियोजन आणि प्रत्यक्ष कृती करावी लागत नाही. मी तर अनेकदा मध्यरात्री झोपेतून उठून मटकी भिजत घातली आहे किंवा दुधाला विरजण लावलं आहे. त्यात असलाच तर फरक इतकाच की, ही बाई एकटी राहत असेल तर एखाद्या दिवशी वरण-भात, भाजी-पोळी, कोशिंबीर असा साग्रसंगीत स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर ती एकच पोटभरीचा पदार्थ करून दिवस काढू शकते. त्याबद्दल तिला कोणी बोल लावणार नसतं; पण बर्‍याच घरांमध्ये सकाळी व रात्रीसुद्धा असा चारीठाव स्वयंपाक करावाच लागतो बायकांना, कितीही कंटाळा आला असला, तब्येत ठीक नसली तरीही. लग्न नाही केलं म्हणून तिची या जबरदस्तीच्या स्वयंपाकातून सुटका झाली एवढंच.

घर स्वच्छ होतं याचा संदर्भ दिवसभर आवरलं तरी पसरलेलंच दिसणार्‍या घरातल्या आणि त्यामुळे हतबल होणार्‍या बायकांना नक्की कळेल; पण अनेक घरांमध्ये बाई पसारा करते आणि नवर्‍याला टापटिपीची आवड असतेच की.

या छोट्याशा गोष्टीतून मला कळलं ते इतकंच की, जगभरातल्या बायका स्वयंपाक आणि घरकाम करून कंटाळलेल्या आहेत; पण त्यांना त्यातून बाहेर पडायचा मार्ग मिळत नाहीये. असे छोटेसे विनोद करून त्या तो ताण सुसह्य करायचा प्रयत्न करतायत एवढंच. काय वाटतं तुम्हाला?

Comments