नेहमीसारखी घरातल्या कट्ट्यावर नाष्टा करत बसले होते. आमच्या इमारतीच्या आसपास खूप झाडं आहेत, त्यामुळे वेगवेगळे पक्षी असतात नेहमीच. चिमणी, कावळा, कबुतर, साळुंकी हे सगळीकडे आढळणारे (खरं तर हल्ली चिमण्याही नाही आढळत सगळीकडे!) पक्षी तर असतातच; पण बुलबुल, तांबट, बाया, नाचण, हळद्या, भारद्वाज, फुलचुख्या आणि खंड्या असे रंगीबेरंगी द्विजगणही दिसत असतात. त्यामुळे कट्टा ही घरातल्या सर्वांचीच आवडती जागा आहे. तर आज सकाळी पोहे खात असताना आला एक कावळा- बहुधा रोज येणाराच असावा, कारण मला काही दोन कावळ्यांमधला फरक ओळखता येत नाही, त्याला हवी होती पोळी. मी म्हटलं, थांब जरा. उठले, आत जाऊन पोळीचा तुकडा घेऊन आले तर पठ्ठ्या बसलेला ग्रिलवर तसाच. पोळी पुढे केली तर चोचीत घेतली नि उडून गेला. एखाद्या वेळी खाली पडली पोळी तर तो घेत नाही, हा अनुभव आम्हाला सर्वांनाच आल्याने आम्ही काळजी घेतो. तर पोळी घेऊन कावळा गेला समोरच्या नारळाच्या झाडावर. तिकडे त्याचं घरटं आहे. थोड्या वेळाने पाहिलं तर कोकिळेसारखं दिसणारं पिल्लू चोचीचा मोठ्ठा आ वासून बसलं होतं आणि हा त्याला घास भरवत होता. मग घरातल्या कुंडीच्या खाली ठेवलेल्या ताटलीत सांडलेलं पाणी त्याने चोचीत भरलं नि पिल्लाला जाऊन पाजलं. तेव्हा आठवली लहानपणी शिकलेली गोष्ट. कोकिळा आळशी असते नि घरटंच बांधत नाही वेळेवर. मग ती अंडं घालते कावळ्याच्या घरट्यात. कावळ्याला कळत नाही, हे आपलं अंडं नाही आणि तो ते अंडं उबवतोही. प्रत्यक्ष बघितलं तेव्हा विश्वास बसला आणि त्या कावळ्याचं इतकं वाईट वाटलं. बिचा-याला कळतही नाहीये तो कोणाला वाढवतोय. पण मग वाटलं, तोच निसर्गाचा नियम आहे. आपण माणसं नाही का, जाणूनबुजून आपल्या पोटी न जन्मलेलं मूल दत्तक घेऊन त्याला/तिला पोटच्या मुलासारखंच वाढवत?
Comments
Post a Comment