दुस-याच्या सुखासाठी...


माझ्या कामाच्या निमित्ताने म्हणजे तुम्हा सर्वांना भेटायच्या निमित्ताने माझं मुंबईबाहेर अनेकदा जाणं होतं. इतक्या वेगवेगळ्या मैत्रिणी भेटतात ना तेव्हा, पुढचे काही दिवस त्यांच्या आठवणीत खूप छान जातात माझे. नुकतीच मी नाशिक आणि सोलापूरला गेले होते. शंभरेक मैत्रिणी तरी भेटल्या असतील. जवळजवळ प्रत्येक जण घर सांभाळून काही ना काही तरी वेगळं करत होती. समाजसेवाच असं नव्हे, तर स्वान्त सुखाय, आपल्या आनंदासाठीही. कोणी लेखिकांना प्रोत्साहन देण्यासाठी छोटं मंडळ चालवते, तर कोणी संस्कृत शिकवते. कोणी पाकक्रिया शिकवते, कोणी लिहिते, कोणी वाचते आणि वाचून दाखवते. कोणी प्रवास करते, कोणी अनाथ मुलांसाठी संस्था चालवते कोणी गरीब बायांना त्यांचं घर चालवण्यासाठी काही कौशल्य शिकवते/काम मिळवून देते. वकील, डॉक्टर आणि शिक्षिका असलेल्या मैत्रिणींना तर वेगळी समाजसेवा करावीच लागत नाही. त्यांचं पोटापाण्याचं काम वगळताही त्या अनेक जणींचं कौन्सिलिंग करतच असतात, तर एखादी असते खूप शिकलेली, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून लहान कंपनीत जाणारी आणि काही वेळ शिकवण्यात घालवणारी. मुलं मोठी झाल्यावर नव्याने शिक्षणाकडे व अभ्यासाकडे किंवा गाण्याकडे/चित्रकलेकडे वळणार्‍याही अनेक जणी. नवलाची गोष्ट म्हणजे पैसे कमावणं हा यातला उद्देश मुळीच नसतो.

आणि यानंतर मी मुंबईत येते. तिथे भेटतात फक्त नोकरी करताना आणि घर सांभाळताना जेरीला आलेल्या बाया. घड्याळाच्या काट्याच्या तालावर, कामाला येणार्‍या बाईच्या मदतीवर, लोकल किंवा बस वेळेवर पोहोचण्यावर यांचं आयुष्य इतकं अवलंबून असतं की त्यांचं जगणंच त्या ताणापायी एक कंटाळवाणा प्रवास होऊन जातं. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी तर सोडाच, स्वत:साठीसुद्धा काही करायची इच्छा आणि ऊर्जा त्यांच्यात उरत नाही बहुधा दिवसाअखेर. (मीही त्यातलीच म्हणायची का?) खूप कमी जणी अशा भेटतात, विशेषत: तरुण किंवा मध्यम वयातल्या. निवृत्तीनंतर असं काम करणार्‍या असतात अनेक जणी, नाही असं नाही. त्या मात्र खूप काही करत असतात. बाकीच्यांना कदाचित एकदा या दुसर्‍यासाठी काम केल्यावर मिळणारं समाधान अनुभवायला मिळालं की त्याही स्वत:पलीकडे, घरापलीकडे जाऊन काही तरी करतील. तथास्तु.
मृण्मयी रानडे, संपादक मधुरिमा 
mrinmayee.r@dainikbhaskargroup.com

Comments