परवा इंदूरची एक मैत्रीण भेटली होती. ती हिंदी आहे. तिच्या मराठी मैत्रिणीची गोष्ट मला सांगत होती. या मराठी मुलीचं लग्न ठरलं ते पुण्यातल्या मराठी मुलाशी. त्यानंतर तिच्या आईने तिला चक्क मराठी भाषेचं एक पुस्तक आणून दिलं कारण आता ती पुण्यात राहायला जाणार होती. कारण ती बोलायची इंदुरी मराठी, म्हणजे हिंदीचा जबरदस्त तडका दिलेली मराठी. मग पुण्यात अशी भाषा ऐकली तर सासरचे काय म्हणतील, या भीतीने हे पुस्तक आणि तिची मराठीची शिकवणी वगैरे सोपस्कार झाले. माझी हिंदी मैत्रीण मला म्हणते, ‘कैसा है ना आप लोगों में? भाषा एकदम शुद्ध होनी चाहिए.’ यावर मला हसावं की रडावं कळेना. तसं पाहायला गेलं तर इंदुरी मराठी ऐकायला इतकी गोड वाटते की ऐकतच राहावं. निदान आमच्या बंबईया हिंदी/मराठीपेक्षा निश्चितच छान. मग का इतकी छान भाषा बोलायचं सोडून मुद्दाम तथाकथित शुद्ध भाषा बोलायला शिकायची? एकदा ती मुलगी पुण्यात राहायला आली की तिच्यावर त्या भाषेचे संस्कार होऊन ती पुणेरी मराठी बोलायला लागलीच असती की. मग का हा अट्टहास? वेगवेगळ्या बोली आहेत म्हणून आपल्या भाषांचं सौंदर्य टिकून आहे आणि नवनवीन शब्द त्यात वापरले जात असल्याने ते वाढतंही आहे. त्या वेगळेपणाची एक मजा आहे. मी मधुरिमाच्या वाचक मैत्रिणींना भेटण्याच्या निमित्ताने नाशिक, जळगाव, औरंगाबाद, सोलापूर या ठिकाणी येते मुंबईहून तेव्हा मला या भाषावैविध्याची नव्याने जाणीव होते. दरवेळी नवीन शब्द कानावर पडतात. त्या त्या ठिकाणच्या मैत्रिणी जेव्हा लिहितात तेव्हाही शक्यतो आम्ही असे वैशिष्ट्यपूर्ण शब्द कायम ठेवण्याची खबरदारी घेतो. सगळीकडे एकसारखी प्रमाणित भाषा बोलली गेली तर असं वेगळं काही वाचायलाही मिळणार नाही. पाठ्यपुस्तक वाचल्यासारखं होईल. हो ना? तुमच्या बोलण्याच्या शैलीमुळे तुम्हाला आलाय का एखादा संस्मरणीय अनुभव? कळवाल आम्हाला?
Comments
Post a Comment