लेक लाडकी

प्रत्येक गावातील/शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ हा त्या गावच्या समाजजीवनाचा उत्तम निरीक्षक असतो. बाई त्या डॉक्टरकडे गरोदर असताना जाते, तिच्यासोबत नवरा, आई, सासू कोणी तरी असतंच. मग प्रसूतीनंतर सगळं कुटुंब, तिच्या मैत्रिणी, शेजारणी तिला आणि बाळाला पाहायला येतात. म्हणजे डॉक्टरला तिच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या विचार/परंपरांविषयी कळत असतं.

मुलीच्या जन्मानंतर आईसकट सर्वांच्या काय प्रतिक्रिया येतात, यावरून डॉक्टरांना समाजात काय चाललंय याचं उत्तम भान येत असतं. या डॉक्टरांना प्रसंगी कुटुंबाचं वा मातेचं समुपदेशनही करावं लागतं, तो त्यांच्या कामाचाच भाग असतो. गेल्या काही वर्षांत कळत नकळत या डॉक्टरांशी एक दुसरीही गोष्ट जोडली गेली ती म्हणजे गर्भलिंगनिदान आणि त्यानंतर मुलीचा गर्भ असल्यास तो काढून टाकण्याची शस्त्रक्रिया. सोनोग्राफीचे यंत्र ही खरे तर या डॉक्टरांसाठी जादूची कांडी असते, पोटातल्या बाळाविषयी खूप माहिती या यंत्रामुळे मिळते. त्यामुळे लाखो मातांचे आणि बाळांचे प्राण वाचले आहेत; परंतु याच यंत्राचा उपयोग जेव्हा बाळाचे लिंग कोणते ते पाहण्यासाठी, ठरवण्यासाठी नव्हे, होऊ लागला, तेव्हा सगळे चित्र पालटले. डॉक्टर खलनायक झाले, समाजाने त्यांची छी थू केली; पण या कृत्यामागची ‘मुलगी नको’ ही समाजाची भावना कायमच आहे, ती कमी होताना दिसत नाही. मुलगी आईला/आजीलाही का नको असते, तर आपण जे भोगलं ते तिच्या वाट्याला यायला नको म्हणून. या भोगामध्ये सगळंच आलं, मानसिक व शारीरिक अत्याचार, हुंडा, सासुरवास इत्यादी. हे कमी होत नाही तोवर मुलगी नको असं आईला वाटलं तर तिची मोठी चूक आहे, असं नाही ना? या भोगांवर मात करून जेव्हा मुली स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी काही भव्यदिव्य करून दाखवतील, सतत करत राहतील, मोठ्या संख्येने करतील, त्याचा गाजावाजा होईल तेव्हा या आईच्या नजरेसमोर काही तरी चांगलं येईल आणि तीही मुलीला जन्म द्यायला आडकाठी करणार नाही. अशा दिवसाची आपण सारेच वाट पाहतोय ना?

Comments