‘हीरोइन’ करिना कपूर आणि ‘नवाब’ सैफ अली खान यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आणि तिला हायसं वाटलं. हो, लग्न जितकं लांबत होतं तितका सैफ आणखी म्हातारा होत होता ना. चाळिशी ओलांडल्यावर का करायचं लग्न, तेही करिनासारख्या जेमतेम तिशी ओलांडलेल्या सुकुमार यौवनेशी, असा विचार येत होता तिच्या डोक्यात. तोच बातमी थडकली ‘पर सरहद के उस पार से’, पाकिस्तानच्या सौंदर्यखणी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार आणि बिलावल भुत्तो (अत्यंत स्मार्ट आणि देखण्या बेनझीर भुत्तोंचा मुलगा) यांच्यात काही गुफ्तगू होत असल्याची. सैफ करिनापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे, तर हिनापेक्षा बिलावल 11 वर्षांनी लहान आहे. म्हणजे वयाचा अडसर प्रेमात येत नाही, हेच खरं. त्यात सैफ तर बिजवर, दोन मुलांचा बाप. त्याची पहिली बायको त्याच्यापेक्षा मोठी होती. म्हणजे मैं सोला बरस की, तू सतरा बरस का हे गाणं आता जवळपास कालबाह्य झालंय, असं वाटलं तिला. नवरा बायकोपेक्षा किमान एक ते तीन वर्षं तरी मोठा असावा ही कल्पना आता जुनी झाली. जसं लग्नाचं वय वाढू लागलं तसा दोघांच्या वयातला फरकही वाढू लागला. अनेक लग्नं कामाच्या ठिकाणी भेटलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडून होऊ लागली, त्यामुळेही वयाची अट जरा शिथिलच झाली. त्यातून सुशिक्षित मुलींची संख्या वाढली, त्यांच्या अटी वाढल्या, त्यांना मुलगे पूर्वीइतक्या सहज पसंत पडेनासे झाले. मग मुलांचीही लग्नाची वयं उलटून जाऊ लागली. तिशी ओलांडल्यानंतर मग या अटी कमी होतात, तडजोडीला दोन्ही बाजू तयार होतात; त्यातच बायको लहान हवी, नवरा दोन-तीनच वर्षांनी मोठा हवा या अटी मागे पडतात. ही अशी लग्नं सर्रास होऊ लागली आणि त्यात चर्चा किंवा गॉसिप करण्यासारखं काही उरलं नाही. शेवटी ‘मियाँ-बीबी राजी, तो क्या करेगा काजी’ हेच खरं ना?
Comments
Post a Comment