बातमीतली सासू

काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली. नाशिक जिल्ह्यातल्या एका महिलेने तिच्या सुनेला किडनी दान करून तिचा जीव वाचवला. बातमी अत्यंत सकारात्मक, आशादायी आहे, परंतु ती ज्या पद्धतीने वाचकांच्या समोर आणण्यात आली होती त्यातून या नात्याकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोनच स्पष्ट झाला. एकीकडे सुनेचा जीव घेणारी सासू, तर दुसरीकडे ही तिला जीवदान देणारी सासू, अशी स्पष्ट तुलना या बातमीच्या मांडणीत होती. या बाईने जे केले ते मानवतेच्या दृष्टीने पाहता असाधारण होतेच. खेरीज अवयवदानाच्या बाबतीत जितक्या अशा सकारात्मक बातम्या वाचायला मिळतील तितक्या कमीच पडतील, अशी भारताची या विषयातली स्थिती आहे. पण बातमीत असे गृहीत धरले होते की सासू आणि सून यांच्यात वितुष्टच असले पाहिजे. त्यांनी एकमेकींसाठी काहीही चांगले केले तरी त्याची बातमी होते. त्या आजीने तिच्या सुनेला किंवा त्या काकीने तिच्या सासूला कसं छळलं याच्या कहाण्या पिढ्यान्पिढ्या चघळल्या जातात अनेक घरांमधून. आपण आपल्या मुलीबाळींवर हाच संस्कार करत राहतो की सासू आणि सुनेचं पटत नसतं. याला नणंदेच्या नावाची फोडणी असतेच शिवाय. म्हणजे ती मुलगी लग्न करून सासरी जाते तीच मुळी सासू आणि नणंद या दोन राक्षसांना कसं तोंड देणार आहोत आपण या भीतीच्या सावटाखालीच. त्यामुळे सून आणि वहिनी ही दोन छान नाती सुरू होतात ती याच चुकीच्या समजुतीच्या पायावर. त्यातून अनुभवातून ती शिकली तर ही नाती खूप सशक्त, आनंदाची नि प्रेमाची होतातही. पण त्यात खूप वेळ गेलेला असतो.

सासूने सुनेची आई किंवा सुनेने मुलगी व्हावे की नाही, हे प्रश्न तात्त्विक झाले. प्रत्यक्षात हे नातं जसं आहे तसं स्वीकारायला काय हरकत आहे? माझ्या घरात आलेली नवीन अननुभवी मुलगी, जी तिच्या माहेरच्यांना सोडून आली आहे, म्हणजे सून आणि माझ्या घरात असलेली वडीलधारी, अनुभवी, आईसारखी व्यक्ती म्हणजे सासू, अशी साधी व्याख्या केली तर? या सकारात्मक विचाराने या नात्यांना सामोरं गेलं तर घरातले सगळेच आनंदात राहू शकतात. घरातल्या मुलांनाही या वातावरणाचा लाभ मिळतो. बाकी सासूशी पटवून घेतलं तर नि सुनेशी चांगलं वागलं तर होणारे फायदे आपल्याला माहीतच आहेत.

Comments