प्रेमाची परीक्षा

सकाळी त्याचा फोन आला तेव्हा ती आईला स्वयंपाकघरात मदत करत होती. मोबाइलवर त्याचा नंबर पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं आणि ती काहीशी सुखावलीसुद्धा. रोजच्या सवयीनुसार तिने आज सकाळी उठल्याउठल्या त्याला ‘गुड मॉर्निंग’ एसएमएस नव्हता केला. गेल्या अडीच वर्षांतली त्यांची ओळख. ओळख झाल्याझाल्या काही कळायच्या आतच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तेव्हापासून सकाळचा जीएम एसएमएस तिने चुकवला नव्हता. क्वचित रात्री झोपायच्या आधी भांडण झालं असेल तर ती ‘जीएम’ करण्यासाठी थोडी थांबायची, पण तो तिच्यापेक्षा फारच उशिरा उठायचा. त्यामुळे त्याला जाग येताच तिचा जीएम नाही, असं नाही व्हायचं कधी.

आज तिने एसएमएस न करण्याचं काही खास कारण नव्हतं, पण कुठेतरी आत वाटायचं तिला की समजा मी नाही केला एसएमएस तर त्याला काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटेल का? की काहीच लक्षात येणार नाही त्याच्या? म्हणून आज सकाळी त्याचा फोन आल्यावर मस्त स्वरात गुड मॉर्निंग म्हटलं तिने, तर तो म्हणाला, ‘आज तुझा जीएमचा एसएमएस नाही आला, दिवस सुरू झाल्यासारखं नाही वाटलं. म्हटलं फोन करूनच विचारावं, कशी आहेस राणी?’ हे ऐकून तिला किती छान वाटलं असेल, हे समजावून सांगण्याची गरज नाही ना?

नंतर मात्र तिचं तिलाच थोडं लाजिरवाणं, खूप लहान झाल्यासारखं वाटलं. परीक्षा घेतल्यासारखं. अविश्वास दाखवल्यासारखं. आपण त्याच्या विचारांच्या केंद्रस्थानी आहोत, हे ठाऊक असूनही का असं वाटावं आपल्याला? ती शोध घेऊ लागली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपल्याला अधूनमधून, अगदी रोजच्या रोज नाही, अशी खात्री पटवून दिलेली आवडते. प्रेम आहे माहीत आहे, पण ते असल्याचं अधूनमधून अशा छोट्या गोष्टींमधून त्याने सांगितलं तर खूप बरं वाटतं. मग एखाद्या दिवशी खूप वेळ एसएमएस/कॉल न करण्यासारखे बालिश प्रकार केले तर त्यावरच्या त्याच्या प्रतिक्रियेतून हलवून खुंटी बळकट केल्यासारखं वाटतं तिला.तुम्ही घेतलीय अशी परीक्षा कधी कोणाची?

Comments