अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसर्यांदा निवडून आल्याचे स्पष्ट झाल्यावर बराक ओबामा यांनी त्यांच्या समर्थकांसमोर केलेले भाषण तुम्ही पाहिलेच असेल. नसले पाहिलेत तर यूट्यूबवर जाऊन मुद्दाम पाहा. सुमारे 25 मिनिटे ओबामा बोलत होते आणि त्यांच्या वाक्यावाक्याला टाळ्या पडत होत्या. त्यातली काही वाक्यं मला खूप महत्त्वाची वाटली. ते त्यांच्या पत्नीला उद्देशून म्हणाले, ‘मिशेल, मी आता अधिकच तुझ्या प्रेमात पडलो आहे. ज्या पद्धतीने अमेरिकी नागरिकांनी तुला प्रतिसाद दिला, तू ज्या प्रकारे या निवडणुकीसाठी मेहनत घेतलीस त्यामुळे मला तुझा खूप अभिमान वाटतो. 20 वर्षांपूर्वी तू माझ्याशी लग्न करायला तयार झाली नसतीस तर मी आज इथे उभा नसतो.’ आपल्या सहचरीला, तिने केलेल्या कष्टांना अशी सार्वजनिक ठिकाणी दाद देणं, तिचं खुल्या दिलाने कौतुक करणं मी आपल्याकडच्या राजकीय नेत्यांकडून कधीच ऐकलं पाहिलं नाहीये. म्हणजे त्यांना त्यांच्या पत्नीच्या सहकाराची, साथीची, मदतीची जाणीव नसेलच असं नाही; परंतु तिला असे खुलेआम श्रेय देणं त्यांच्या पुरुषी मनोवृत्तीला पटत नसावं कदाचित. दुसरीकडे राजकारणात किंवा उद्योगक्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांच्या मुलाखती वाचल्या/ऐकल्या/पाहिल्या तर त्यात घरच्यांनी कसा पाठिंबा दिला, पती, सासरच्या मंडळींनी काम करण्यास प्रोत्साहन दिल्यामुळेच आम्ही इथवर येऊन पोचलो, हे 100 टक्के वेळा दिसून येतं. कदाचित 100 टक्के वेळेला ते खरं नसेलही; परंतु त्या तसं बोलून निश्चितपणे दाखवतात. मग पुरुषांना हे कबूल करणं कमीपणाचं वाटतं का? का बरं? की कोणाच्या तरी, विशेषत: पत्नीच्या, म्हणजे एका महिलेच्या, सहकार्यामुळेच आपण हा पल्ला गाठू शकलो असं म्हटलं तर त्या यशाची झळाळी कमी होईल अशी भीती त्यांना वाटत असावी. कोणत्याही क्षेत्रात काहीही करून दाखवायचं तर ते एकट्याचं कामच नव्हे, पुरुष असो वा स्त्री. कोणाची तरी, म्हणजे एका जिवाभावाच्या मैतराची गरज असतेच. ती व्यक्ती पती/मित्र असेल वा पत्नी/मैत्रीण. प्रश्न फक्त तिचं श्रेय तिला देण्याचा आहे.तुमच्या यशस्वी आयुष्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल, सांगाल ना आम्हाला?
Respect is not to be demanded but to be comanded.
ReplyDeleteso Jay, you mean only Michelle Obama has done something worth respecting?
ReplyDelete