मृत्युपत्राची गरज

नुकतंच सुनीताबाई देशपांडे यांच्यावर मंगला गोडबोले यांनी लिहिलेलं पुस्तक वाचलं. अत्यंत चोख व्यक्तिमत्त्वाच्या सुनीताबाईंचं मृत्युपत्र त्यात वाचायला मिळालं आणि डोळे लख्ख उघडले. असं वाटलं सगळय़ांना ते वाचायला द्यावं आणि प्रत्येकाला तसंच एक मृत्युपत्र करायला सांगावं. त्यातला संपत्ती वा मालमत्तेविषयीचा संदर्भ महत्त्वाचा नाही आहेच, पण मला अधिक महत्त्वाचे वाटले ते प्रकृतीविषयीचे मुद्दे. ‘मला कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम यंत्रणेच्या मदतीने जिवंत ठेवण्याचा आटापिटा करू नये,’ ही त्या मृत्युपत्रातली महत्त्वाची अट. आपण कोणावरही वा कशावरही अवलंबून नसलं पाहिजे हे सुनीताबाईंच्या संपूर्ण जीवनाचं आधारभूत तत्त्व होतं. शेवटी-शेवटी पुलंवर पार्किन्सन आजारामुळे तशी वेळ आली होती आणि कदाचित त्यामुळेच सुनीताबाईंना कोणावर अवलंबून नसावं, आपलं कोणाला करावं लागू नये असं तीव्रतेने वाटलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपल्या ओळखीच्या किंवा घरातल्याही वृद्धांच्या तोंडून आपण नेहमी ऐकत असतो की, ‘देवा, हातपाय चालू आहेत तोवर उचल, अंथरुणात पडून राहायला लावू नकोस.’ ज्या व्यक्ती ह़दयविकाराच्या झटक्याने, काही मिनिटांच्या कालावधीत हे जग सोडून जातात, त्यांना म्हणूनच सुदैवी मानलं जातं, की ना त्यांना काही त्रास झाला ना कोणाला त्यांचं काही करावं लागलं. अर्थात मृत्यू कसा यावा हे आपल्या हातात नसतं, म्हणूनच सुदैव आणि दुर्दैव असे शब्द आपण वापरतो या बाबतीत. पण असे अनेक जण असतात ज्यांना खूप पैसा खर्च करून, अनेक यंत्रांच्या मदतीने जिवंत ठेवलं जातं. उपचाराला कसं नाही म्हणायचं, आपलं माणूस आहे त्यामुळे प्रसंगी कर्ज काढूनही उपचार केले जातात. अशी व्यक्ती मरण पावल्यानंतर म्हणूनच आपण म्हणतो, सुटला बिचारा. मेलेला सुटलेलाच असतो, खरे सुटलेले असतात त्याच्या घरचे. अशा वेळी जर आरोग्यविषयक अटींचं मृत्युपत्र असेल, काही गोष्टी स्पष्ट केलेल्या असतील, तर कदाचित सर्वांचंच आयुष्य थोडं सुखकर होईल. प्रॉपर्टी वगैरेचेही प्रश्न उभे नाही राहणार, हा बोनस म्हणायचा. कदाचित निर्दयी किंवा अमानुष वाटेल, पण असा विचार करून पाहायला काय हरकत आहे? एकंदरीत काय, मृत्युपत्र करून ठेवणं महत्त्वाचं. होय ना? 

Comments

Post a Comment