बालपणीचा खाऊ


तिला त्या दिवशी रस्त्यावर टपोरे आवळे दिसले एका म्हातार्‍या बाईकडे, टोपलीत छान रचलेले. न राहवून तिने दहा रुपयांचा एक वाटा घेतला. घरी जाऊन त्याच्या फोडी करून मीठ लावून ठेवल्या. थोड्या वेळाने एक फोड तोंडात टाकली. त्या तुरट, आंबट, खारट चवीने ती एकदम लहान झाली आणि तिच्या मावशीच्या स्वयंपाकघरात जाऊन पोचली. मावशीकडे राहायला गेलं की मिठाच्या पाण्यात टाकलेल्या आवळय़ाच्या फोडी, कैर्‍या, असा कायकाय खाऊ सतत समोर असायचा.
उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, चनियामनिया बोरं, कमरकची फळं, उसाचे करवे आणि कोकणात आजोळी गेलं की रतांबे, करवंदं, आंबोशी आणि बिटके आंबे. किती खाल्लं तरी पोट भरल्यासारखंच वाटायचं नाही. या पदार्थांना नाही म्हटल्याचं तिला आठवत नव्हतं. आणि खरं तर यापेक्षा फार वेगळं, विकतचं, कुणाकडे मिळायचंही नाही. तिला आठवलं, एके दिवशी तिने मुलाला डब्यात उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिल्या होत्या. घरी आल्यावर तो म्हणाला, ‘अगं, माझ्या काहीकाही मित्रांना ते काय आहे तेच कळलं नाही.’

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेणारी आपली पिढी, आपल्या मुलांपर्यंत ती समज का बरं पोचवू शकली नाही, असं तिला वाटायला लागलं. मॉलमध्ये मिळणार्‍या पाकीटबंद चमचमीत गोष्टींसमोर बालपणीचा हा खाऊ फारच गावंढळ वाटायला लागला म्हणून तो घरी आणणंच बंद झालं असावं. ज्या मुलांना अजून खेड्यातलं किंवा गावातलं आजोळ आहे, जिथे शहरातल्यापेक्षा वेगळं वातावरण आहे, त्यांनाच ही गावठी खाऊची मजा माहीत आहे. अर्थात तीसुद्धा आपल्या पिढीतल्या माणसांनी या गावातल्या नातलगांशी संपर्क ठेवला असेल तरच. नाहीतर आपलं शहर आणि त्याहून मोठं दुसरं एखादं शहर याच्या पलीकडे मुलांनाही जर काही पाहायलाच मिळालं नाही तर त्यांना तिथल्या जीवनशैलीची कल्पना कशी येणार?

तिने हा सगळा विचार केला आणि मनाशी निश्चय केला, असा गावरान खाऊ जमेल तसा मुलासमोर ठेवायचाच आणि जमेल तेव्हा गावाकडच्या घराला भेट द्यायची. तुमच्या मुलांना आहे का हा खाऊ माहीत आणि आवडतो का त्यांना?

मृण्मयी रानडे

mrinmayee.r@dainikbhaskargroup.com

Comments