शुभ दीपावली

बघता बघता, हां हां म्हणता, दिवाळी आली की. उद्या वसुबारस. आत्ता कुठे गणपतीला निरोप दिला असं वाटतंय तर चक्क नवरात्र, दसरा संपून दिवाळी आलीसुद्धा. तरी दिवाळी यंदा अधिक महिन्यामुळे थोडी लांबलीच. तर मग, फराळ झालाच असेल करून. की तयारी झालीय सगळी आणि ऐन दिवाळीच्या दिवशी सकाळी गरमागरम चकल्या आणि शेवेचा बेत आहे? घरचं पांढरंशुभ्र ताजं लोणी आणि तळणीतून अश्शा काढलेल्या खुसखुशीत चकल्या! वा, तोंडाला पाणी सुटलं ना? होहो, लाडू, करंज्या, अनारसे, शंकरपाळे, चिरोटे वगैरे गोडाधोडाचेही पदार्थ हवेतच की. वर्षभरात एरवी कितीही वेळा चकल्या केल्या, बाजारातून आणून खाल्ल्या तरी या दिवाळीला केलेल्या चकल्यांची रंगत काही वेगळीच असते ना? तीच गोष्ट इतर फराळाचीही. कदाचित तो अजूनही ब-याच घरांमध्ये आवर्जून तयार केला जातो, प्रसंगी रात्री जागूनही, मुलाबाळांच्या मदतीने. नवरोजीही अनेक वेळा हातभार लावतात म्हणूनही असेल ना. अनेकांना रोजच पहाटे उठावं लागतं आणि आवरून घाईघाईत कामासाठी बाहेर पडावं लागतं. पण म्हणून अभ्यंगस्रानाची मजा काही कमी होत नाही ना?

दिवाळीच्या निमित्ताने ‘मधुरिमा’चा आजचा कथा आणि कविता विशेषांक आहे. म्हणजे आज लगेच कामाच्या गडबडीत वाचायला वेळ नाही मिळाला तर दिवाळीची धामधूम संपल्यावर वाचायला राखून ठेवता येईल, नाहीतरी नंतर एक विचित्र रिकामपण येतंच ना तेव्हा? पण नंतर नक्की वाचा आणि आम्हाला कळवा, आवडला की नाही ते.

‘मधुरिमा’च्या सर्व वाचक मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आदल्या रात्री जागून कंदील तयार करा. सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन, आनंदाने, हसत गप्पांचा फड रंगवत, फराळाचा फडशा उडवत पुढचे चारपाच दिवस साजरे करा. दारासमोर छान रांगोळी काढा. नवेकोरे कपडे घालून मस्त मिरवा. थोडं प्लॅनिंग करून काहीतरी वेगळ्या भेटी द्या जीवलगांना आणि मिळालेल्या भेटींना, आवडल्या नसल्या फारशा तरी, भरभरून दाद द्या. म्हणजे पुढचे अनेक दिवस हा आनंद पुरेल पाहा तुम्हाला. (तेवढं फटाक्यांचा आवाज आणि धूर होणार नाही एवढं मात्र बघा.)

तर मग, सलमान खान ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये म्हणतो तसं मेरी दिवाली. हॅप्पी दिवाली. शुभ दीपावली. दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ. आणि दिवाली मुबारकसुद्धा.

Comments