विदूषकाची मुलगी


समर्थ रामदासांनी ‘टवाळा आवडे विनोद’ असे लिहून ठेवल्याने सर्वसामान्य माणसाला वाटत असते की विनोद हा काही क्षणांपुरता, फारसा महत्त्वाचा नसलेला आणि अजिबात गंभीरपणे न घेण्याचा विषय. अनेक तथाकथित मोठ्या माणसांना विनोद आणि हसणे यांचे वावडे असते. अशा सर्वांसाठी अनुष्का शंकर यांच्या ‘बापी : द लव्ह ऑफ माय लाइफ’ या त्यांचे वडील पं. रविशंकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकातील एक उतारा वाचनीय ठरेल. पंडितजी कुठेही हसल्या आणि हसवल्याशिवाय राहूच शकत नसत. विमानात, घरात, गाडीत किंवा अगदी व्यासपीठावर कार्यक्रमादरम्यानदेखील.

कार्यक्रमाच्या वेळी कधी ते अनुष्काची ओळख ही माझी आई अशी करून देत, तर कधी ओरडणार्‍या मांजराचा किंवा रडणार्‍या बाळाचा आवाज त्यांच्या सतारीतून काढत. कधी एखादी विशिष्ट सुरावट परत-परत वाजवत, जणू काही त्यांच्या हातांवर त्यांचे नियंत्रणच नव्हते. मग ते सतारीवर लटक्या रागाने चापट मारत आणि त्यांच्या वादनाकडे वळत.


या त्यांच्या विनोदबुद्धीमुळेच त्यांना आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीवर मात करता आली असावी. काही वर्षांपूर्वी ते रुग्णालयात दाखल होते. त्यांना खूप वेदना होत होत्या आणि त्यांच्यावर औषधांचा मारा सुरू होता. तशातही त्यांचे अनुष्काशी बोलणे चालू होते. ते तिला म्हणत होते की जो मॉनिटर त्यांच्या बोटाला जोडलेला होता तो एखाद्या परग्रहावरच्या प्राण्यासारखा दिसत होता, बोटे हलवून त्या प्राण्याने अनुष्काला हलोदेखील म्हटले. मग त्यांनी एका परिचारिकेचा विचित्र आवाज काढून सर्वांना हसवले. त्या अवस्थेतही अनुष्काचे लाडके बापी इतरांना हसवत होते.
अनुष्काने यातून हाच धडा घेतला की जीवनातला प्रत्येक क्षण अनुभवला पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे.

सतारवादन असो की कोणतेही काम, त्याचा आनंद घेता येत नसेल तर ते करण्यात मतलब नाही. आपण कितीही मोठे सेलिब्रिटी झालो तरी पाय जमिनीवर हवेत. या पुस्तकात ती म्हणते की मला रविशंकर यांच्यासारख्या विख्यात सतारवादकाची मुलगी असल्याचा अभिमान आहेच, पण एका विदूषकाची मुलगी असल्याचाही तितकाच अभिमान आहे.
अधिक बोलणे न लगे.

Comments