उमेदीची आशा

नववर्षातली आपली ही पहिलीच भेट. नवीन वर्षाच्या प्रारंभी शुभेच्छा देण्याची प्रथा पुष्कळ जुनी. तिच्यानुसार नवीन वर्ष सुखसमृद्धीचे व समाधानाचे जावो, अशा शुभेच्छा अर्थातच मनात आहेत. परंतु, मन 100 टक्के प्रफुल्लित नाहीये एवढं निश्चित. सरत्या वर्षाच्या शेवटी दिल्लीत घडलेल्या त्या घटनेनंतर सर्वच भारतीयांची मने हेलावून गेली आहेत, अस्वस्थ आहेत. आपल्या आजूबाजूला हे नक्की काय चाललंय, याचा अंदाज कोणालाच येत नाहीये. ही परिस्थिती कशी सुधारता येईल, यावर देशभर अनेक पातळ्यांवर (राजकीय, सामाजिक, कायदेशीर, वैयक्तिक, नैतिक) विचारविनिमय सुरू आहे. ठिकठिकाणी होत असणा- जनतेच्या निदर्शनांमधून चीड, असहायता, निराशा, हार, सूड यांसारख्या मिश्र भावनांचा उद्रेक होतोय. या मंथनातून काही तरी सकारात्मक बाहेर येईल, तरुणांमध्ये जी अस्वस्थता, भविष्याबद्दल अनिश्चितता आहे तिची जागा निरोगी, सळसळती उमेद घेईल, अशी आशा आणि प्रार्थना करून या नवीन वर्षाच्या पहिल्या मधुरिमाकडे वळूया.

काही नवीन, तर काही परिचयाच्या लेखक/लेखिकांची सदरे आजच्या अंकापासून सुरू करतोय. बहुतेक सदरे पाक्षिक स्वरूपाची आहेत. मधुरिमा फक्त महिलाच वाचतात असे नाही, तर बहुतेक घरांमधील पुरुषही आमचे निष्ठावान वाचक आहेत, हे जाणून बहुतांश वाचकांना वाचायला आवडतील, अशीच ही सदरे आहेत. ज्येष्ठ नागरिक हा वाचकवर्गातला मोठा, परंतु काहीसा दुर्लक्षित असा गट. त्यांच्यासाठी खास सदर पुढच्या आठवड्यात सुरू होईल. कायदाविषयक काही माहिती, मार्गदर्शन असावे, ही अनेक वाचकांची मागणी होती. त्यानुसार एक सदर या अंकापासून वाचता येईल. पुण्याच्या श्रीकांत पोहनकरांचे आयुष्याचे पासबुक व मुंबईच्या राजीव तांबे यांचे निमित्त ही दोन सदरे त्यांना मिळणा- प्रचंड प्रतिसादामुळे नवीन वर्षातही सुरू ठेवतोय. ही सर्वच सदरे तुम्हा वाचक मित्रमैत्रिणींच्या पसंतीस उतरतील व सर्वांना त्यातून एक सकारात्मक ऊर्जा मिळेल अशी आशा आहे. या सर्वांना तुम्ही पत्र/ई-मेल वा फोनद्वारे भरघोस प्रतिसाद द्याल, याची खात्री आहे.

पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

Comments