सत्तेचा खेळ

महिनाभरापासून जिकडेतिकडे महिलांवरच्या अत्याचाराच्या कानावर पडणा-या नि डोळ्यांत घुसणा-या बातम्यांमुळे ती अगदी निराश होऊन गेली. सतत तेच तेच विचार करून ती आतल्या आत अगदी मोडून गेली. कोलमडून गेली. त्यातच राजकीय नेते, बाबा/महाराज/बापू व तत्सम लोकांची या विषयावरची (म्हणजे महिलांनी कसं 1000 वर्षांपूर्वीसारखं चूल आणि मूल असं आयुष्य जगलं पाहिजे, असा सल्ला देणारी) मुक्ताफळं ऐकून तिची चिडचिडही होऊ लागली.

नातलगांचा आणि मित्रमैत्रिणींचा मोठा गोतावळा असलेली ती, मुलं घराबाहेर पडायची तेव्हा काळजीत पडू लागली, येतील ना नीट घरी या विचाराने. एका संध्याकाळी मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसोबत एका लग्नाला चालली होती तेव्हा तिने पहिल्यांदाच स्पष्ट शब्दांत तिला सांगितलं, ‘ओळखीच्या/अनोळखी कोणत्याही मुला/पुरुषासोबत कुठेही जायचं नाही, पाच मिनिटांसाठीसुद्धा नाही. ताईचा हात सोडायचा नाही.’ मग एकेदिवशी तिची जवळची मैत्रीण म्हणाली, मला पहिल्यांदा असं वाटलं की मी नोकरी करत नाहीये ते किती चांगलं आहे.

हे आठवून तिला जाणवलं की, काय करतोय हे आपण? नोकरी करत नाहीये म्हणजे ती मैत्रीण सुरक्षित आहे हे जसं पूर्ण सत्य नाही तसंच नोकरी करणारी प्रत्येक स्त्री असुरक्षित आहे, हेही. मग अशी भीती घालून किती दिवस आपण मुलीला सांभाळणार आहोत? अशा अविश्वासाच्या वातावरणात मुलगी कोणाशीही नॉर्मल नाती कशी काय अनुभवू/टिकवू, जोपासू शकेल? मुलीला जिवाभावाचा मित्र आणि मुलाला जवळची मैत्रीण असणं, मुलामुलींचा एकत्र ग्रुप असणं हे नॉर्मल जगण्यासाठी किती आवश्यक असतं, ते तिला कसं काय कळेल? कसं समजणार तिला की समाजात वावरताना पुरुष आणि स्त्रिया एकत्रच असणार, आपापल्या स्वतंत्र कुलूपबंद सुरक्षित जगात नाही राहू शकत माणसं. नाही तर सर्वांनाच धर्माची दीक्षा घेऊन लौकिक संसारातून संन्यास घ्यावा लागेल.

बलात्कार हा सत्तेचा खेळ असतो, असं म्हणतात. कुठून येते ही सत्ता गाजवण्याची इच्छा? आपल्या घरातून. लहानपणापासून. आई/आजी/बहीण यांना घरातले पुरुष कसं वागवतायत ते पाहून. म्हणजे हा खेळ संपवायचा तर सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे. ते तर आपल्या सर्वांच्या हातात आहेच. हो ना?

Comments